26 February 2021

News Flash

गणराज रंगी..

पुण्यातील कावेरी कौस्तुभ अभ्यंकर ही तरुणी ‘फ्लोरेंन्स बिड इट युअर वे’ या नावाने हँडमेड ज्वेलरी बनवते

संग्रहित छायाचित्र

मितेश रतिश जोशी

गणेशोत्सवाला करोना आणि चक्रीवादळाचे गालबोट लागले आहे. अशा कठीण परिस्थितीतही अनेक तरुण-तरुणी गणेशाच्या पूजेशी संबंधित गोष्टी-वस्तू यांची निर्मिती करत समाजमाध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. करोनाकाळातील निर्बंध पाळून आधुनिक माध्यमं-तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्सवी परंपरा जपत आनंद द्विगुणित करण्याचे त्यांचे हे प्रयत्न निश्चितच वेगळे आहेत.

इच्छा तिथे मार्ग.. तसं जिथे संकटं तिथे नवीन वाटा फु टतात हे नवतेचा ध्यास घेतलेल्या आणि परंपरा जपण्याची ओढ असलेल्या तरुणाईला पक्कं  माहिती आहे. त्यामुळे एरव्ही दरवर्षी गणेशोत्सवात हरतऱ्हेने आपल्या कलागुणांना वाव देत अनेक कलात्मक वस्तूंच्या निर्मितीत मग्न असणारी ही पिढी या वर्षीही शांत बसलेली नाही. मराठी नवीन वर्षांची सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू होते. गुढीपाडव्यापासूनच सर्वच सण यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातल्या घरात अतिशय सध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. त्याचा परिणाम या सणांच्या निमित्ताने अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांत कार्यरत असलेल्या तरुणाईवर झाला आहे. पण या संकटातूनही वाट शोधत आपापल्या परीने ते त्यांचे काम पुढे नेत आहेत.

पुण्यातील कावेरी कौस्तुभ अभ्यंकर ही तरुणी ‘फ्लोरेंन्स बिड इट युअर वे’ या नावाने हँडमेड ज्वेलरी बनवते. या दागिन्यांसाठी लागणारे मणीसुद्धा ती हातानेच बनवते. टाळेबंदीच्या काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेचा फायदा करून तिने ‘मिनिएचर सेट्स’ ही एक आगळीवेगळी संकल्पना बाजारात आणली. मिनिएचर वस्तूंचा ट्रेण्ड सध्या बऱ्यापैकी रुळला आहे, याच संकल्पनेंर्तगत गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू तिने छोटय़ा स्वरूपात बनवायला सुरुवात केली. गणपतीसाठी औक्षणाचं ताट, ड्रायफ्रूट्स, फळं ही चिमुकल्या रूपात तिने पेश केली. या सर्व चिमुकल्या वस्तू पेंटिंग न करता जर्मन व्हिनाइल मटेरिअल वापरून हाताने बनवल्या जातात. कावेरीच्या या चिमुकल्या वस्तूंना फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर गाझियाबाद, हुबळी, कॅनडातूनही मागणी आहे. असाच सजावटीचा आगळावेगळा ट्रेण्ड डोंबिवलीच्या अबोली खाडिलकर या युवतीनेही सुरू केला आहे. गौरीगणपतीच्या उत्सवात देवांचे लाड करू तितके कमीच. मग हे लाड कोणी नैवेद्याच्या ताटाभोवती मोत्यांची महिरप ठेवून करतं तर कोणी समईच्या बाजूने गोलाकार मोत्यांची प्रभावळ ठेवून सजावटीत अधिकाधिक भर घालून करतं. मोत्यांची तोरणं, महिरप, प्रभावळ या वस्तू म्हणजे घरातील जुन्याजाणत्या स्त्रियांकडून आलेली परंपरा. मोत्यांची ही नाजूक कला आपल्या आजीकडून शिकून घेऊन अबोलीने टाळेबंदीच्या काळात स्वत:चा लघुउद्योग थाटला आहे. घरगुती क्लासेस घेणाऱ्या अबोलीने आपल्या आजीकडून मोत्यांच्या वस्तू बनवण्याची बरेच महिने शिकवणी घेतली. टाळेबंदीच्या कठीण परिस्थितीत प्रपंच चालवायचा कसा हा पेच पुढय़ात उभा राहिला असताना अबोलीने आपल्या या कलेतूनच अर्थार्जनाची सुरुवात केली. नैवेद्याच्या ताटाभोवती व समईभोवती लागणारी महिरप, मोत्यांचे तोरण, मोत्यांचे लटकन, मोत्यांची रांगोळी, मोत्याचा करंडा या वस्तू अबोली ‘रुद्र क्रिएशन्स’ या तिच्या स्वत:च्या फेसबुक पेजवरून विकते. या सर्व वस्तूंमध्ये ४५ शुभ वस्तूंनी युक्त अशा मोत्याच्या चैत्रांगण रांगोळीला जास्त मागणी असल्याचे तिने सांगितले. रांगोळी व सजावटीला उत्तम कलात्मक पर्याय अबोलीने उपलब्ध करून दिला असल्याने तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

गणपती आणि मोदक यांचं अतूट नातं आहे. गणपतीच्या दर्शनाला जाताना हमखास लोक मोदकांचं पाकीट घेऊन जातातच. पेशाने साहाय्यक प्राध्यापक असलेल्या रत्नागिरीच्या देवेन केतकर या तरुणाने कल्पक विचार करत आपल्या घरच्या व्यवसायाला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या घरी कोकणी खाद्यपदार्थांचे उत्पादन केले जाते. गणपतीच्या निमित्ताने आंबा मोदक,काजू मोदक,आंबा काजूमिश्रित मोदक आदींची विक्री दरवर्षी होते. यावर्षीही नेहमीसारखा प्रतिसाद मिळेल की नाही अशी शंका मनात न आणता देवेनने थेट समाजाध्यमांचा आधार घेत तब्बल १००० किलो मोदकांची विक्री रत्नागिरीहून संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअरच्या साहाय्याने केली. दरवर्षी श्रावण महिन्यात आमची मोदक बनवायची लगबग सुरू होते. आंबा आणि काजूच्या स्वत:च्या बागा असल्याने आमच्या मोदकांना मागणी भरपूर असते. करोनामुळे घराबाहेर पडून कोणी खरेदी करत नाही हे लक्षात घेऊन रत्नागिरीतून थेट घरपोच मोदक मिळतील, अशी जाहिरात समाजमाध्यमांवरून केली, असं तो सांगतो. अनेक नामांकित मिठाई उत्पादकांनी माझ्याकडून मोदक घेऊन त्याची पुन:विक्री केल्याने आपल्यालाही चांगलाच फायदा झाल्याचे त्याने सांगितले.

मूर्तिकार गौरी-गणपतीची तयारी सहा महिने आधीपासून सुरू करतात. पुण्याची अश्विनी नानल ही युवती पेशाने कमर्शियल आर्टिस्ट आहे. गौरींचे सुबक मुखवटे रंगवण्याचं काम अश्विनी करते. अश्विनीकडे १५० ते २०० वर्ष जुने पारंपरिक मुखवटे पुन्हा रंगवण्यासाठी येतात. इतरांच्या मुखवटय़ांमध्ये व तिच्या मुखवटय़ांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे गौरींचे बोलके डोळे. याव्यतिरिक्त अश्विनी तांब्यांवरच्या पारंपरिक लाल गौरीसुद्धा उत्तम रंगवते. छोटय़ाशा गौरींवर सर्व आभूषणे रंगवून भारतीय संस्कृतीतील शुभ चिन्हे काढलेल्या या गौरी अतिशय बोलक्या वाटतात. गौरीचे हे काम जोरात सुरू असून तिच्या कलेमुळे आपसूकच तिला नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गणेशोत्सवात मखर ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्यात सातत्याने वैविध्य आणण्याचा प्रयत्न तरुण कलाकार करत असतात. मूळची बेळगावची पण कामानिमित्ताने पुण्यात असलेली प्रीती कुलकर्णी मुतालीक ही युवती ऑस्ट्रेलियन मंडला आर्ट्सचे क्लासेस पुण्यात घेते. तसेच पेंटिंग बनवून विकते. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात बऱ्याच जणांनी प्रीतीला ऑर्डर देऊन पेंटिंग्ज बनवून घेतले व गणेशमूर्तीच्या मागे लावले. तेव्हाच प्रीतीच्या डोक्यात कल्पना आली की आपण या पेंटिंग्जचा वापर मखरासाठी करू या. टाळेबंदीत क्लासेस बंद असल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग करत ‘मंडला आर्टस् पेंटिंग डेकोरेशन’च्या कल्पनेवर काम केले आणि ती यशस्वी झाली. हे पेंटिंग मखर सध्या भारतातच उपलब्ध आहे. बॉक्समध्ये दिलेल्या स्टँडवर पेंटिंग ठेवून त्याच्या पुढय़ात गणपती बसवला की झालं. इतकं सहजसोपं मखर उपलब्ध करून दिलेल्या प्रीतीला हळूहळू कलारसिक ग्राहकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. आपले  कलागुण, पिढीजात व्यवसाय, कलापरंपरेचा वारसा अशा विविध प्रकारे आलेल्या पारंपरिक गोष्टींना नवतेचा साज देत या तरुणाईने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कल्पनांना व्यावसायिक रूप देत उत्तम नवनिर्मितीच्या त्यांच्या ध्यासामुळे गणेशोत्सवाच्या बाजारपेठेत काही नव्याच गोष्टी लोकांना पाहायला मिळत आहेत.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:25 am

Web Title: article on kaveri kaustubh abhyankar miniature sets are a unique concept abn 97
Next Stories
1 ‘बिनोद’ नाम तो सुना होगा..
2 क्षितिजावरचे वारे : सर्वमंगलाचा पाठपुरावा
3 शिक्षणाच्या विदेशवाटा
Just Now!
X