29 March 2020

News Flash

लेडी ‘बाइक’ राइडर्स

अनेक मुद्दय़ांविषयी या लेडी बाइक राइडर्सकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

(संग्रहित छायाचित्र )

विपाली पदे

अनेक मुली आज सर्रास बाइक चालवताना दिसतात. मग ती स्वत:च्या पैशांनी घेतलेली असते किंवा आई-बाबांनी दिलेली असते. सुट्टी, वीकेंड अशा कुठल्याही संधी न चुकवता त्या सकाळी बाइक घेऊन निघतात आणि परत येतात ते मनसोक्त विहार करूनच!

आजकाल ट्रेण्ड आहे तो स्कूटी, बाइक यांसारख्या वाहनांचा वापर करून वाट मिळेल तिथे भटकायला जायचा. मग ग्रुपने असो अथवा सोलो ट्रिपिंग. अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दुचाकीचा वापर करून भटकायला जायची नवीन पद्धत आहे. तरुण मुलं कितीही अशा रोड ट्रिप्सबाबतीत पुढे असली तरी मुलीसुद्धा त्यांच्याहून कमी नाहीत! मुलीही आता बाइक घेऊन मनमुराद भटकंती करताना दिसतात. ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटातील बाइक घेऊन सगळीकडे फिरणारी शर्वरी जमेनीस असो किंवा ‘बकेट लिस्ट’मधील बाइक चालवायला शिकणारी माधुरी दीक्षित असेल.. सिनेमामध्ये दिसलेले हे वेड आज प्रत्यक्षांतही दिसते. अनेक मुली आज सर्रास बाइक चालवताना दिसतात. मग ती स्वत:च्या पैशांनी घेतलेली असते किंवा आई बाबांनी दिलेली असते. सुट्टी, वीकेंड अशा कुठल्याही संधी न चुकवता त्या सकाळी बाइक घेऊन निघतात आणि परत येतात ते मनसोक्त विहार करूनच!

लहानपणापासून आपल्याला उत्सुकता असते ती पहिली सायकल आपल्याला आईबाबा कधी घेऊन देतील याची. जशी ती सायकल आपल्या हातात येते तशी मग आपण पडत-धडपडत ती चालवायला शिकतो. मग आपल्याकडे थोडे मोठे झाल्यावर स्कूटीसारखी दुचाकी घरी येते. पण अचानक रस्त्याने जाताना एखाद्या मुलीला बाइक चालवताना पाहिलं की आपले डोळे आपोआप मोठे होतात. आणि ‘ए, ती बघ बाइक चालवते’ असे उद्गार आपण क्षणात काढतो. अशा या बाइक राइडर्स केवळ स्कूटीवरच न थांबता ‘बुलेट चालवायची आहे यार!’ या विचाराने डायरेक्ट बाइक विकत घेतात. मग ती बाइक नवीन असो किंवा सेकंड हॅण्ड ती चालवून मिळणारा आनंद फार अवर्णनीय असतो. त्यांचे बाइकवरील प्रेम इतके असते की, त्याला त्या नाव देतात. मैत्रिणीप्रमाणे काळजीदेखील घेतात. त्याच्यावर बसून देशभर भ्रमंती करून येतात. बाइक चालवण्याचे हे वेड त्यांच्यात कुठून येते? चित्रपटावरून त्या प्रेरित होतात का?, अशा अनेक मुद्दय़ांविषयी या लेडी बाइक राइडर्सकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी मुंबई येथे राहणाऱ्या जाई ठाणेकर हिला बाइकचे वेड हे लहानपणी नव्हते. तिला गाडी शिकायची आहे अशी इच्छा तिने तिच्या वडिलांसमोर बोलून दाखवली आणि तिच्या बाबांनी तिला वयाच्या १४ व्या वर्षी डायरेक्ट बाइकच शिकवली. मग तेव्हापासून तिला लागलेलं बाइकचं हे वेड डोक्यातून जात नाही आहे. आता तिला सगळ्या प्रकारच्या बाइक चालवायच्या आहेत. साधारण शिक्षणासाठी ती पुण्यात राहत असल्याने तिने मुंबई-पुणे हा प्रवास बाइकवरून केला आहे. आणि मुंबईमधील बराचसा परिसर तिने बाइकने ढुंडाळला आहे. पण आता तिला तिची बाइक घेऊन जायचंय ते कोकणात आणि लेह लडाखला. आणि मुख्य म्हणजे त्या दृष्टीने ती आता तयारीही करते आहे. अशी ही राइडर तिच्या मैत्रिणीबरोबर मनसोक्त हिंडायची स्वप्न रोज बघते.

दादरलाच राहणारी सई सावंतही बाइक घेऊन खूप ठिकाणी भ्रमंती करत असते. ती सातवीत असताना तिच्या बाबांनी तिच्या मोठय़ा भावाला बाइक शिकवली. आणि तिथून तिलाही बाइक शिकायची उमेद निर्माण झाली. एके दिवशी बाबांनी तिला सरळ गाडीवर बसवून ती चालव असे संगितले. भावाला शिकवताना तिने अगदी निरखून पाहिले होते आणि तेव्हाच ती बाइकवर स्वार झाली होती. मुळात पहिल्यांदा तिला वेस्पा फार आवडायची. तिच्या कपाटावर त्याचा फोटो लावलेला होता. पण नंतर जेव्हा तिच्या वडिलांनी बाइक विकत घेतली तेव्हापासून तिची भटकंती त्यावर बसूनच चालू झाली. ती ब्रह्मगिरी, कसारा, संधान व्हॅली, कश्यपी धरण, भंडारदरा, खारघर धबधबे अशा अनेक ठिकाणी जाऊन आली आहे. मुंबई, नाशिक यांसारखी शहरं तिने पिंजून काढली आहेत. अशा प्रकारे बाइक ही तिची नवीन ओळख बनली आहे. दररोजच्या आठवडय़ात अभ्यास वगैरे सांभाळून नवीन जागा शोधून तिथे फेरफटका मारायला जातेच.

पेशाने डॉक्टर असलेल्या, परंतु बाइकवर जीवापाड प्रेम करणारी पवई निवासी अपर्णा बांदोडकर ही एक नावाजलेली बाइक राइडर. ‘बिजली’ या नावाच्या तिच्या बुलेटच्या सहाय्याने ती गिरगावच्या शोभायात्रेतून सगळ्यांसमोर आली. इतकंच नाही तर ‘झी मराठी’ या चॅनल वरदेखील तिच्या बिजलीवर बसून ती मोठय़ा कौतुकाने मिरवताना दिसतात. लहानपणी जेव्हा अपर्णाने मनात ठरवलं की दुचाकी शिकूया अगदी तेव्हापासून ती बाइक चालवायला लागली. स्वत:कडे प्रथम पैसे नसल्याने स्वत:ची बाइक घेता आली नाही, पण जेव्हा ती डेंटिस्ट झाली त्यानंतर तिने काही काळाने बुलेट विकत घेतली. त्यावर स्वार होऊन तिने जवळजवळ १५ राज्यांत अगदी दोन-तीन आठवडे राहून भ्रमंती केली आहे. तिला आता मुख्यत: लेह-लडाखसारख्या हिमालयीन भागात बाइक घेऊन जायचे आहे. तिच्याबद्दल सांगायची खास गोष्ट म्हणजे २०१३ पासून ती नियमित गिरगावच्या शोभायात्रेत तिची बिजली नावाची बुलेट घेऊन सहभागी होते. आणि तिच्यामुळे आता मुलींनीदेखील बाइक, स्कूटी घेऊन छान सजूनधजून शोभायात्रेत जायचे असा नवीन ट्रेण्ड सुरू केला आहे.

अनुष्का करमाकर ही बाइक राइडर राहते कळव्याला. लहानपणी तिची आई तिला बाइकच्या टाकीवर बसवून घेऊन जायची तेव्हा जणू मीच बाइक चालवते आहे, असे तिला वाटायचे. पुढे मित्रांच्या बाइक ती आवडीने चालवायला लागली आणि मग तेव्हापासून मनात तिने ठरवले की गाडी घेतली तर बाईकच! तिची बाइक चालवायची इच्छा तिने १२ वी झाल्यावर तिला तिच्या पालकांनी भेटवस्तू बाइक घेऊन दिली तेव्हा पूर्ण झाली. या बाइकवरून ती महाराष्ट्रातले सगळे कोपरे फिरली. पण याव्यतिरिक्त तिच्या कामानिमित्ताने ती १७ राज्यांमध्ये फिरून आली. आणि त्यातील एकूणएक गाव तिने पाहिले. तिच्या मते तो तिच्या आयुष्यातील अवर्णनीय अनुभव आहे.

ती आवर्जून सांगते बाइक चालवताना मी पूर्णपणे मजा  करते, पण तितक्याच शिस्तीत ती गाडी चालवते. नियमांचे पालन करते. तरी अनुष्काला स्वत:ची अशी नवीन बाइक घ्यायची आहे. ज्यावर स्वार होऊन ती संपूर्ण देश फिरू शकेल. या अशा लेडी बाइकर्सकडे पाहिलं की आपल्यालाही त्या क्षणी असं वाटतं की आपल्याला बाइक चालवता येत नसेल तर शिकावी, शिकून घेतल्यानंतर निघावं आणि वाट मिळेल तिथे बाइक पळवावी. या लेडी बाइक राइडर्सच्या बकेट लिस्टमध्ये अजून अशा अनेक जागा आहेत, जिथे त्यांना त्यांच्या लाडक्या बाइकवर स्वार होऊन पोहोचायचं आहे. नवनवीन अनुभव घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे बघून बाइक चालवायची इच्छा मनात असेल तर ती पूर्ण करायला आताच तयारीला लागा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:13 am

Web Title: article on lady bike rider abn 97
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : चला ‘अपग्रेड’ होऊ या
2 रॅम्पवरची टॉक टॉक फॅशन
3 संशोधनमात्रे : भाषेच्या राज्यात नांदू चला!
Just Now!
X