देशाच्या बॅडमिंटन विश्वाची स्टार म्हणजे सायना नेहवाल.. सायनाची घोडदौड सुरू असतानाच देशाभरात अन्य काही युवा खेळाडूही या खेळात आपली छाप पाडत आहेत. त्यातली एक म्हणजे आपल्या मुंबईची तन्वी. तन्वीनं नुकतंच स्वीस इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं. सायनाच्या अढळपदाप्रमाणेच आपलंही स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नव्या ताऱ्याविषयी..
सायना नेहवालच्या यशाने भारतीय बॅडमिंटनचा परीघ जनमानसात विस्तारला. सायनाची घोडदौड सुरू असतानाच देशभरात काही युवा खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत. मुंबईकर तन्वी लाड हे नाव याच मांदियाळीतलं. गेल्या वर्षी कनिष्ठ गटाचं राष्ट्रीय जेतेपद पटकावून वरिष्ठ गटात संक्रमण करणाऱ्या तन्वीने मनामा, बहरिन येथील इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत जेतेपदाची कमाई केली. विशेष म्हणजे गेल्या आठवडय़ात बहरिनमध्येच झालेल्या स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवाने हार न मानता, चुकांतुन शिकत तिने थेट जेतेपदावर कब्जा केला.
मुंबईतच बॅडमिंटनचे धडे गिरवलेल्या आणि आंतरशालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्त्व सिद्ध केलेली तन्वी आता आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी सज्ज झाली आहे. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने कनिष्ठ गटातील सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराने तिला सन्मानित केलं होतं.
ऑक्टोबर महिन्यात सायनासह वरिष्ठ खेळाडू आधी डेन्मार्क आणि नंतर फ्रान्समधल्या स्पर्धामध्ये खेळत होते. प्रसिद्धीचा झोत तिकडे राहणं साहजिक होतं. त्याच काळात स्विस चॅलेंजर स्पर्धेत तन्वीने एकेका फेऱ्यांचा अडथळा पार करत अंतिम फेरी गाठली. या टप्प्यात तिने अव्वल मानांकित खेळाडूला चीतपट केलं. उपांत्य फेरीची लढत जिंकल्यावर अवघ्या तासाभरात तिला अंतिम सामन्यासाठी तयार व्हाव लागलं. तयारी आणि विश्रांती दोन्हीलाही वेळ मिळू शकला नाही. मात्र वेळापत्रकातील ढिसाळपणामुळे चार तास प्रतीक्षा करण्यातच गेले. अंतिम सामना प्रत्यक्षात सुरू झाला तेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा ती चांगलीच दमलेली होती. सर्वोत्तम खेळ करण्याचा तिने प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला. मात्र अन्याय झाला असा पाढा वाचण्याऐवजी या अनुभवातून खुप काही शिकले असं तन्वी सांगते. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या खडतर स्वरुपासाठी काय बदल करायला हवेत ते समजलं असं ती सांगते. डेन्मार्क आणि पॅरिस स्पर्धामध्ये सायनाचं आव्हान प्राथमिक फेऱ्यांतच संपुष्टात आलं. मात्र त्याचवेळी तन्वीच्या यशाने विचार करणाऱ्या, प्रगल्भ आणि खेळाप्रती जबरदस्त निष्ठा असणारे बॅडमिंटनपटू तय्यार आहेत हा विश्वास दिला. आतापर्यंतच्या वाटचालीत तन्वीला यश सहजतेने मिळालेलं नाही. तिने मेहनतीने ते कमावलं आहे. वडील टेनिसपटू आणि आई बॅडमिंटनपटू, घरातूनच खेळाची रुजवात झालेली. बॉम्बे जिमखाना येथे रवी कुंटे सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने खेळायला सुरुवात केली. अंतराच्या दृष्टीने सोयीचं म्हणून तन्वीने ज्येष्ठ प्रशिक्षक उदय पवार यांच्याकडे जायला सुरुवात केली आणि हाच तिच्या कारकिर्दीचा टर्निग पॉइंट ठरला. स्पर्धात्मक फॉरमॅटसाठी फिटनेस, विविध फटके, कोर्टवरचा वावर, प्रतिस्पध्र्याचा अभ्यास, शिस्त या सगळ्या मूलभूत गोष्टी तन्वी पवार सरांकडे शिकली. आतापर्यंत जे यश मिळालंय त्याचं श्रेय सरांना आहे असं तन्वी नम्रपणे सांगते. सरांच्या मार्गदर्शनामुळेच २०१० वर्षांत तन्वीने १६ वर्षांखालील गटाच्या चार राष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदं नावावर केली.
महाराष्ट्र बॅडमिंटन लीगमध्येही (एमबीएल) तन्वीचं नशीब थोडं उशिरानेच उघडलं. नुकत्याच झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमागची मूळ प्रेरणा एमबीएलची. २०११ साली झालेल्या पहिल्यावहिल्या एमबीएल स्पर्धेत तन्वीला कुठल्याच संघात स्थान मिळाले नाही. मात्र सेन्सेशनल स्कायलर्क्स संघाची प्रमुख खेळाडू अदिती मुटाटकरला दुखापत झाली. बदली खेळाडू म्हणून स्कायलर्क्स संघाने तन्वीला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. बदली खेळाडूचा शिक्का असूनही तन्वीने जबरदस्त प्रदर्शन करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तांत्रिक कारणांमुळे गेल्यावर्षीच्या एमबीएल स्पर्धेत तन्वीचा लिलाव होणाऱ्या खेळाडूत समावेश झाला. मात्र पहिल्यावहिल्या स्पर्धेत तिची कामगिरी फ्रँचाइजींच्या चांगलीच लक्षात होती. तन्वीला संघात समावेश करून घेण्यासाठी चुरस पाहायला मिळाली आणि स्कायलर्क्स संघानेच मोठी रक्कम देऊन तिला ताफ्यात दाखल करून घेतले. संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाला पात्र ठरत तन्वीने स्कायलर्क्सच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलला.
हाच फॉर्म कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कायम राखण्याची तिची इच्छा होती. मात्र स्पर्धेपूर्वी स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने तिला खेळताच आलं नाही. कुठल्याही खेळाडूसाठी राष्ट्रीय स्पर्धा हुकणं त्रासदायकच. मात्र यातून सावरण्याचा तिने निश्चय केला आणि वर्षभरातच दणक्यात पुनरागमन केलं. गेल्यावर्षी जयपूर येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातल्या अव्वल खेळाडूंना नमवत तन्वीने जेतेपदावर कब्जा केला. हे यश तिच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारं ठरलं. विशेष म्हणजे कनिष्ठ गटातून खेळण्याचं तन्वीचं हे शेवटचं वर्ष होतं.
मुंबईत प्रवासात प्रचंड वेळ जातो तसंच एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवू शकणारी अकादमी नसल्याने तन्वी आता हैदराबादच्या गोपीचंद अकादमीत अॅडव्हान्स्ड ट्रेनिंग घेते. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू,अरूंधती पनतावणे यांच्यासह देशभरातल्या गुणवान खेळाडूंसाठीच्या विशेष प्रशिक्षणार्थी गटात तिला स्थान मिळालं आहे. आईबाबांच्या भरीव पाठिंब्यामुळे इथपर्यंत मजल मारता आली आहे परंतु प्रायोजकांची साथ नसल्याने अनेक गोष्टींवर मर्यादा येत असल्याचे तन्वीने सांगितलं. स्विस इंटरनॅशनल स्पर्धेसाठी ‘जाणं-येणं-राहणं’ हा सगळा खर्च खेळाडूंना आपला आपण करायचा होता. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तन्वी सध्या ६०व्या स्थानी आहे. इथे स्थिरावण्यासाठी, यशासाठी पदलालित्य, कोर्टवरचा वावर, फटक्यांमधली विविधता, फिटनेस या सगळ्यासह कामगिरीत सातत्य राखणं महत्त्वाचं आहे असं तन्वी सांगते. या जाणिवेतच तिच्या यशाचं रहस्य दडलं आहे.