News Flash

ओपन अप : खरं सांगायचं तरी कसं?

मी पूनम, बीबीए करते आहे. माझी आई देवाघरी गेली आहे, वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. लहान भाऊही नेहमी त्याच्या स्टडी आणि फ्रेंड्समध्ये बिझी राहतो. माझा मोठा

| July 11, 2014 01:03 am

मी पूनम, बीबीए करते आहे. माझी आई देवाघरी गेली आहे, वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. लहान भाऊही नेहमी त्याच्या स्टडी आणि फ्रेंड्समध्ये बिझी राहतो. माझा मोठा दादा माझ्यासाठी सर्वकाही आहे. तो नेहमी माझी खूप काळजी करीत राहतो. दोन र्वष झाली मी एका मुलावर प्रेम करते. एकदा माझ्याकडून चुकून माझं फेसबुक अकाऊंट चालू राहून गेलं. दादानं आमचे सर्व चॅट मेसेजेस वाचले व मला त्याबद्दल विचारलं. मी घाबरून त्या वेळी खोटं बोलले, की माझं त्या मुलावर प्रेम नाहीये, तो माझा फक्त फ्रेंड आहे. दादानं पण विश्वास ठेवला. आता माझ्यासाठी घरचे मुलगा शोधतायत. मला दादाला सर्वकाही सांगायचंय खरं तर. मी आजपर्यंत कधीच खोटं बोलले नाहीये दादासोबत आणि लपवलं पण नाहीये. मी कसं सांगू दादाला, की मला त्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे ते? मला फार भीती वाटते आहे आता. अभ्यासही होत नाही. पूर्णपणे एकटी होऊन गेले आहे. प्लीज हेल्प मी.

हॅलो पूनम,
तुझ्या पत्रात एक लोभसवाणा बालिश सूर आहे. त्यातून तुझा दादावर असलेला विश्वास आणि प्रेम स्वच्छ दिसतंय. त्याच्या तुझ्यावरच्या मायेची तुला असलेली जाणीवही त्यात डोकावतेय. असं असूनही तू त्याला त्या मुलाविषयी आणि तुमच्या रिलेशनशिपविषयी खरं काय ते सांगू शकली नाहीस. थोडा विचार करून बघ बरं हे का घडलं? याची कारणं अनेक पदरी असू शकतील. तुझ्या वतीनं मी ही काय कारणं असतील याचा अंदाज बांधतेय.
जेव्हा आपण एखादी गोष्ट लपवतो तेव्हा बऱ्याचदा त्या गोष्टीविषयी आपल्यालाच पुरती खात्री पटलेली नसते. अगदी उघड काही कारण नसलं तरी मनाच्या आत खोलवर कुठे तरी पुढे जाण्याविषयी हुरहुर, अनिश्चितता वाटते. नक्की काय खुपतं हे मात्र कळत नाही. किंवा काही वेळा कळतं पण वळत नाही. सत्याला सामोरं जायची आपली तयारी नसते. खरं काय ते आपल्याला जाणवलं तर आपल्याला ते सहन होणार नाही असं वाटतं. ही भीती अनाठायी असते अनेकदा. आपण आपल्या मनाला कुठल्याही गोष्टीला समोरासमोर फेस करण्यापेक्षा त्यापासून पळ काढण्याची सवय लावलेली असते, कारण ते त्या वेळी अधिक सोपं वाटतं. कालांतरानं ते तसं नसतं हे कळतं. तू तुझ्या बॉयफ्रेंडविषयी फारसं काही लिहिलेलं नाहीस. तुला त्याच्याबरोबरच्या रिलेशनशिपबाबत पुरती खात्री वाटत नाहीये का? काही शंका मनात ठुसठुसतेय का? त्याच्या स्वभावातल्या एखाद्या पैलूविषयी, फायनॅन्शियल बाजूविषयी, जातीविषयी किंवा शैक्षणिक पात्रतेबद्दल? अशी शंका मनात असली तर तू तुझ्या भावाला नीट कन्टिन्स करू शकणार नाहीस. त्यामुळे स्वत:ला खडसावून हे क्लिअर करून घे.
तू तुझ्या भावापासून आत्तापर्यंत काही लपवलेलं नाही असं सांगितलंस. हे त्याच्याविषयीच्या धाकामुळे की तुमच्या नात्यातल्या मोकळेपणामुळे? धाक आला की परिणामांविषयी धाकधूक आली. होणारे परिणाम आपल्याला न पचणारे असतील तर टाळणं, लपवणं आलं. कदाचित भाऊ तुला अजून एखाद्या निरागस, लहान मुलीसारखं वागवत असेल. बऱ्याचदा आई-वडिलांचं किंवा त्यांची भूमिका वठवणाऱ्यांचं असं होतं. मुलांचं मोठं होणं त्यांच्या लक्षात येत नाही. तू असा काही निर्णय घेण्याइतकी मोठी झालीस हे त्याला खरं वाटत नसेल अजून. त्यामुळेही हा विषय काढायला तू बिचकत असशील.
मला वाटतं, आत्तापर्यंतच्या चर्चेतून तुझ्या लक्षात आलं असेल की, तुला हा विषय त्याच्यासमोर स्पष्टपणे मांडायला तर हवाच; तोही लवकरात लवकर, लग्नासाठीचे प्रयत्न फार पुढे जाण्याआधी! आधी तुझ्या मनाची खात्री करायला लागेल. भावाशी कोणत्या शब्दांत बोलायचं याची मनोमन उजळणी करणं, चांगला मूड, चांगली वेळ पाहून फेसबुकच्या वेळेची लपवण्याची तुझी चूक मोकळेपणानं कबूल करणं आणि शांतपणे त्याच्याशी बोलणं असं तुला करता येईल. हळूहळू विषय पुढे ने, सुरुवातीला त्याची एकदम निगेटिव्ह रिअ‍ॅक्शन झाली तरी खचून न जाता त्याला पटवून दे. त्याला हे समजून घ्यायला वेळ दे. एकदम काही तरी टोकाची भूमिका किंवा अ‍ॅक्शन घेणं टाळ.
The truth may sometimes hurt for a moment, but the pain you experience from a lie can last forever.

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 1:03 am

Web Title: experience from a lie
टॅग : Guidance,Life Problem
Next Stories
1 खावे त्यांच्या देशा : मोरोक्कोतला ईफ़्तार
2 क्लिक : तेजस कोपटे, भांडूप
3 सेलेब्रिटी ब्रॅण्डिंग
Just Now!
X