News Flash

फूडमौला : घाटकोपरच्या खाऊगल्लीची सफर

या खाऊगल्लीत युरोपियन डिशेसपासून ते अगदी नेहमीच्या साऊथ इंडियन डिशेसपर्यंत सगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळते.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गोडसे

खाऊगल्ली म्हटलं की डोळ्यासमोर अगदी आपले सगळे आवडते पदार्थ एकापाठोपाठ एक उभे राहतात, त्यांच्या विविध प्रांतातील चवी जिभेवर घोळत असतात. हे मनातलं चित्र घाटकोपर खाऊगल्लीत प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं. अगदी खरोखरच या खाऊगल्लीत युरोपियन डिशेसपासून ते अगदी नेहमीच्या साऊथ इंडियन डिशेसपर्यंत सगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळते.

‘मुंबई’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येते ती रात्रीची नयनरम्य दुनिया. खरेदी करणाऱ्यांसाठी गजबलेला क्रॉफर्ड मार्केटचा परिसर, क्वीन्स नेकलेसच्या दिव्यांमध्ये चमकणारा मरिन ड्राइव्हचा रस्ता आणि खवय्या लोकांसाठी चमचमीत आणि स्वादिष्ट पदार्थानी भरलेल्या ‘खाऊगल्लय़ा’. मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी असल्यामुळे इथे विविध प्रांतातून लोक स्थलांतरित झाले आहेत. साहजिकच येताना त्यांनी आपापली खाद्यसंस्कृतीसुद्धा मुंबईत आणली आहे, इथे रुजवली आहे. या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणजे ‘घाटकोपरची खाऊगल्ली’. खाऊगल्ली म्हटलं की डोळ्यासमोर अगदी आपले सगळे आवडते पदार्थ एकापाठोपाठ एक उभे राहतात, त्यांच्या विविध प्रांतातील चवी जिभेवर घोळत असतात. हे मनातलं चित्र इथे प्रत्यक्षात दिसतं. अगदी खरोखरच या खाऊगल्लीत युरोपियन डिशेसपासून ते अगदी नेहमीच्या साऊथ इंडियन डिशेसपर्यंत सगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थाची चव चाखायला मिळते.

मला मुळातच खायची आणि खिलवायची दोन्हीची आवड आहे. आईला रोज किचनमध्ये स्वयंपाक करताना पाहून हळूहळू मलादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थ खाऊन बघावेत, ही इच्छा सातत्याने मनात डोकावत राहायची. अखेर या इच्छेने उसळी घेतली आणि मग सुरू झाला तो माझा खवय्येगिरी करण्याचा अनोखा छंद. सध्या मुंबई भागातील विविध हॉटेल्समध्ये बऱ्याच प्रकारचे नवनवीन चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत. अशा पदार्थाच्या चवी घेत, त्यांची माहिती इतरांना सांगत माझा फूड ब्लॉगिंगचा प्रवास सुरू झाला. ‘thechubbyfoodie36’ या नावाने मी इन्स्टाग्रामवर अनेक ब्लॉग्ज लिहिते. तसंच माझं यू-टय़ुब चॅनेलदेखील मी सुरू केलं आहे.

कॉलेजची विद्यार्थिनी असल्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबर नवनवीन जागा शोधत ‘स्वस्त आणि मस्त’ खावं हे माझं धोरण कायम ठेवलं होतं. आणि त्यातून मला शोध लागला तो प्रसिद्ध अशा ‘घाटकोपरच्या खाऊगल्लीचा’. ही खाऊगल्ली घाटकोपर पूर्वेकडील सिंधुवाडीमध्ये आहे. या खाऊगल्लीमध्ये शाकाहारी आणि बऱ्याच प्रमाणात जैन पदार्थ खायला मिळतात. अगदी पास्ता, पिझ्झा, डोसा, दाबेलीपासून ते मलई गोळा इथपर्यंत विविध टेस्टी फूड तुम्हाला एकाच जागी चाखायला मिळते. अशा या खाऊगल्लीतील वर्दळ दुपारी साडेचारला सुरू होते ती थेट रात्री अकरा वाजता संपते. तिथे मी खाल्लेले आणि मुळात मला स्वत:ला आवडलेले असे पदार्थ तुम्हाला सांगते, जे तुम्ही नक्की खाऊ न बघायला हरकत नाही.

आपल्या जनरेशनला ब्रेडचे पदार्थ तसे आवडतातच. त्यातही सॅंडवीच तर जवळपास सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. ‘जयश्री सॅंडवीच’ हा खाऊगल्लीतील स्टॉल कायम गर्दीने भरलेला असतो. त्यांच्याकडे पंधरा ते वीस प्रकारचे किंबहुना त्याहून जास्त प्रकारचे सॅंडवीच खायला मिळतात. त्यांच्याकडचा नॉन ब्रेड सॅंडवीच हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. या सॅंडवीचचा बेस ब्रेड नसून टोमॅटोचे स्लाइसेस असतात. बाकी बटाटा, त्यावर दोन प्रकारच्या चटण्या हे कायम असतं. त्यामुळेच ते नॉन ब्रेड सँडवीच म्हणून प्रसिद्ध आहे.

उन्हाळ्याची सुट्टी कधी येईल आणि आपण गोळा खाऊ.. या आशेवर आपण सगळं वर्ष काढतो. मॅंगो, कालाखट्टा ते अगदी पानशॉट गोळा इथपर्यंत सगळे प्रकार खातो. पण घाटकोपरच्या खाऊगल्लीत मिळणारा हा ‘मलई गोळा’ जरा हटके आहे. बर्फाच्या गोळ्यावर मलई घालून पुढे सिरप आणि किसलेले काजू घातलेले असतात. ज्या लोकांना गोड फार आवडते असे लोक हा गोळा नक्कीच एंजॉय करतील. इतकंच नाही तर तिथेच आजूबाजूला राहणारे अनेक लोक रात्रीच्या जेवणानंतर हा गोळा खाण्यासाठी येतात.

या खाऊगल्लीची खासियत म्हणजे तिथला ‘पास्ता’ आहे. ‘डब्ल्यूटीसी’ या दुकानात मिळणारा पास्ता तरुणाईचे चोचले पुरवायला अगदी योग्य आहे. खरं तर ही खाऊगल्लीची शान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इथे ‘पिंक चिझी पास्ता’ खायला तरुणवर्ग खास गर्दी करतो. आणि मुख्य म्हणजे तुमच्यासमोर गरमागरम पास्ता तो बनवून देत असल्यामुळे तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे चीज तुम्हाला भुरळ घालते. चीज लव्हर्सना इथे स्वर्गसुख नक्कीच अनुभवायला मिळेल.

साऊथ इंडियन स्पेशल ‘डोसा’ हा प्रकार ‘साई स्वाद डोसा’ इथे  खायलाच हवा. इथे केवळ डोशाचे चाळीस ते पंचेचाळीस प्रकार मिळतात. आणि सगळ्यात बेस्ट भाग म्हणजे तव्यावरून थेट ताटलीत असा त्याचा प्रवास असतो. ‘जिनी डोसा’ या नावाचा डोसा खाण्यासाठी त्याच्याकडे प्रचंड गर्दी होते. जेव्हा ते डोसा तयार करतात तेव्हा त्यातच मसालेदार भाजी बनवून, त्यात विविध चटण्या घालून ते स्मॅश करतात. आणि मग ती भाजी एका बाऊलमध्ये काढून बाजूला डोसा रोल करून छान प्रकारे सव्‍‌र्ह करतात.

घाटकोपर खाऊगल्लीतील ‘दाबेली’ हा पदार्थ म्हणजे मसाला मिश्रित चमचमीत असा स्वाद आहे. त्यात साधारण तीन प्रकारचे लेअर असतात. पहिला लेअर चटणीचा असतो, दुसरा लेअर भाजीचा तर तिसरा लेअर कांदा आणि दाणे यांचा असतो. अशा या तीन लेअर्स त्या दाबेलीच्या पावात दोनदा स्टफ केल्या जातात. म्हणूनच मला वाटतं अशी चमचमीत दाबेली खाल्ली तर पैसे वसूल होतील, असा विचार मनात डोकावला नाही तरच नवल आहे.

लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे ‘रोलर कोस्टर आईस्क्रीम’. हे आईस्क्रीम चवीला अतिशय भन्नाट असून खूप प्रसिद्ध आहे. याची खासियत म्हणजे या आईस्क्रीमच्या दुकानात एक मोठा बर्फाचा रोल असतो. ज्याला तो आईस्क्रीम बनवणारा पहिल्यांदा फ्रेश फ्रूट्सचा आणि मग त्यावर फ्रूट ज्यूसचा लेअर लावतो. आणि मग ते मिश्रण किसणीने किसून तो दुकानदार तुम्हाला सव्‍‌र्ह करतो. चवीपेक्षासुद्धा त्या आईस्क्रीम बनवण्याची प्रोसेस जास्त इंटरेस्टिंग असते. ती पाहायला आणि मग ती जिभेवर उतरवायला खवय्यांची गर्दी होते.

तर मग बघा असे हे मॉडर्न आणि चमचमीत पदार्थ खाण्यासाठी तरी तुम्ही एकदा का होईना या घाटकोपर खाऊगल्लीत जायलाच हवं. तिथले वेगवेगळे पदार्थ खाऊन बघायला हवेत. मुंबईचं स्ट्रीट फूड खायची ही अनोखी संधी तुम्ही अजिबात दवडू नका. शेवटी काय स्वस्त आणि मस्त असे हे पदार्थ असले तरी जिभेची चव शंभर टक्के बदलेल आणि मनही तृप्त होईल यात शंकाच नाही.

संकलन साहाय्य : विपाली पदे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:31 am

Web Title: ghatkopar khau galli abn 97
Next Stories
1 शेफखाना : ‘क्लाऊड किचन’चा ट्रेण्ड
2 मातीतील तरुण हात!
3 क्षण एक पुरे! : वाट तोलामोलाची
Just Now!
X