मासिक पाळी म्हणजे लपवून ठेवायची गोष्ट. त्याचा उच्चारही नको चारचौघात. सॅनिटरी नॅपकिन्सही काळ्या पिशवीत गुंडाळून गुपचूप आणायचे. हा चोरीचा मामला कशाला? या नैसर्गिक गोष्टीबाबत लाजायचे किंवा लपवायचे कारण नाही, असे सांगणाऱ्या कँपेन्स सुरू असून त्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतोय.
पाळीसंबंधी काही जाहिराती आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. त्यातील एकामध्ये दुकानातून काळ्या पिशवीतून संशयास्पद गोष्ट घेऊन जाणाऱ्या मुलीला पोलीस अधिकारी अडवतो आणि बॉम्ब स्क्वॉडला बोलावतो. तपासणीत ते सॅनिटरी नॅपकिन असल्याचं समोर येतं. तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये सॅनिटरी नॅपकिनवर दुकानदाराने बांधलेल्या कागदाचे त्याच्यासमोर विमान बनवून उडवणारी मुलगी दाखवलेली आहे. बघताना साध्या, सरळ काहीशा विनोदी ढंगाच्या वाटल्या तरी सॅनिटरी नॅपकिन विकत घेतानाची ही लपवाछपवी प्रत्येकीने अनुभवलेली असते आणि त्याच मुद्दय़ावर या जाहिराती बोट ठेवतात.
खरं तर इंटरनेटवर थोडं सर्च केल्यास अनेक वेबसाइट्स सापडतील ज्यावर मासिक पाळी आणि त्या संबंधित शंकांचं निवारण करतील. या काळात स्वच्छतेसंबंधी घ्यायची काळजी, बदलत्या मूड्सवर आळा घालण्याचे उपाय यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शनही हल्ली उपलब्ध असतं. तरीही अजूनही पाळीवरचा ‘टॅबू’ काही हटलेला नाही.
सॅनिटरी नॅपकिनचा ब्रॅण्ड ‘व्हिस्पर’नी ‘टच द पिकल’ ही मोहीम राबवून मासिक पाळीच्या संबंधांतील गैरसमजांना पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री परिणिती चोप्रा या मोहिमेचं नेतृत्व करत होती. परिणिती चोप्राने सांगितले, ‘मी स्वत: अंबालासारख्या छोटय़ा गावातून आले आहे, तेव्हा लहानपणी मीसुद्धा हे सर्व प्रकार सहन केले आहेत. पण आज विचार केल्यावर लक्षात येतं, मासिक पाळी हा बाऊ करण्यासारखा विषय नाही. उलट पाळी येते म्हणजे देवाने मुलीला आईत्व बहाल केल्याचे चिन्ह आहे. ही साजरी करण्याची गोष्ट आहे, लपवण्याची नाही.’
आपण कितीही आधुनिक म्हणत असलो तरी आजसुद्धा आपल्या घरी किंवा आजूबाजूला जुन्या रीती सांभाळणारे लोकं दिसतात. घाटकोपरची शीतल साठय़े सांगते, ‘नाशिकला आमच्या गावी माझ्या मैत्रिणीकडे अजूनही पाळी आल्यास मुलीला घराबाहेर वेगळ्या खोलीत ठेवले जाते. तिला जेवण, पाणी वेगळे दिले जाते. अगदी त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कोणाला पाळी आली असल्यास त्यांनाही हीच वागणूक दिली जाते. न राहवून मी एकदा त्यांना याबद्दल विचारले असता या दिवसात मुलगी अपवित्र असते असे त्यांचे म्हणणे होते.’ देवानेच आपल्याला पाळीचे चक्र दिले आहे, तर मग आपण अपवित्र आहोत हे पटत नसल्याने शीतल आपण स्वत: पाळीच्या दिवसात घरात देवपूजा करत असल्याचे सांगते. ‘अजूनही पाळीच्या दिवसात माझ्या जैन मैत्रिणीला तिच्या घरी जमिनीवर बसावे लागते, या दिवसात तिच्या बोलण्यावरसुद्धा या दिवसात बंधने असतात. पाळीबद्दलची भीती तिच्या मनात इतकी आहे की, या दिवसात ती आम्हालाही तिला हात लावू देत नाही’, असे वाशीच्या अनुश्री मिरीकरने सांगितले.
आज विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. अशा वेळी केवळ पाळी आली म्हणून महिन्यांतील चार दिवस स्वत:ला कोंडून घेणे तिला शक्य नाही. कित्येकदा पाळीसंबंधीची नकारात्मक भावना अज्ञानातून येते. त्यामुळे वेळीच यावर बोलतं होणं आवश्यक आहे. ‘हल्लीच्या मुलांनाही या बाबतीत माहिती असते. तेही या गोष्टीकडे खूप सहजतेने बघतात. आम्ही काही गुन्हा करत नाही आहोत, हे त्यांना पटणेपण गरजेचं आहे,’ असे माहीमची रुचिरा आरेकर सांगते. थोडक्यात, बोलण्याने अनेक उत्तरे सापडू शकतात. आता मनातील अढी बाजूला सारून बोलायला सुरुवात केली पाहिजे.
मृणाल भगत- viva.loksatta@gmail.com