च्यायला आपल्या तेंडल्याला पण ना काय झालंय, काय कळतं नाय यार, च्यायला गेल्या किती मॅचमध्ये सेंच्युरी नाही केली आणि मग हे सगळे मीडियावाले टपलेलेचं आहेत त्याच्यावर कमेंट करायला, च्यायला ह्यांनी कधी हातात बॅट घेतली नसेल पण च्यायला शंभर सेंच्युरी करणाऱ्या सच्चूला हे निवृत्ती होण्याचा सल्ला देत फिरतायंत, असं थोडंस चिडत चोच्याने आपल्या मनातलं ओकून टाकलं. सचिन आणि क्रिकेट हा तर कट्टय़ाचा फेव्हरिट विषय. त्यामुळे सर्वानीच या विषयावर आपली मतं मांडायला सुरुवात केली.
ए चोच्या हे बघ, तुम्हाला असा त्रास किंवा चिडचिड का होते माहितीए का, तुम्ही ना खेळाडूंना देव बनवता आणि त्यानंतर त्यांना बोललेलं तुम्हाला काहीच खपत नाही. हेच बघ ना, सचिनने सेंच्युरी गेल्या किती तरी मॅचमध्ये केली नाही, वर्ष होतं आलं त्याला, त्यामुळे त्याच्यावर टीका होतेय. का माहितीए का, कारण सचिन मैदानात उतरल्यावर प्रत्येक वेळी आपण त्याच्याकडून सेंच्युरीचीच अपेक्षा करतो, त्याच्या खाली काही आपल्याला नकोच असतं. तो काही देव नाही, प्रत्येक मॅचमध्ये येऊन सेंच्युरी ठोकायला. त्यामुळे जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार बघ, असं प्रॅक्टिकल मतं सुश्याने माडलं.
हे बघं मला तरी असं वाटतं की, सचिन हा एक महान खेळाडू असला तरी त्याने युवा खेळाडूंसाठी आतातरी रिटायर्ड व्हायला हवं. तो जेव्हा नवीन खेळायला आला तेव्हा जर असेच खेळाडू खेळत राहिले असते तर त्याला टीममध्ये जागा मिळाली असती का, असं म्हणत सुप्रियाने एका नवीन वादाला तोंड फोडलं.
ए हे बघ सुप्रिया, हे असं काही नाही. सचिन खेळत असला तरी नवीन प्लेयर्स येतायत ना टीममध्ये. पुजारा नाही का आला, मग. आणि मला एक गोष्ट सांग या ट्वेन्टी-२०च्या जमान्यात कोणता यंग प्लेयर तुला वाटतो की तो टेस्ट व्यवस्थित खेळेल. अजिंक्य रहाणे म्हणशील तर त्याला आताचा टीमचा फॉर्म पाहता संधी मिळेल. पण त्यासाठी सचिनने रिटायर्ड होण्याची गरज नाही. तुम्ही प्रत्येक वेळी सचिनवरच का येता, त्या धोन्याच्या किती रन्स झाल्या गेल्या दहा मॅचमध्ये यावर कोणी का बोलत नाही. आपल्या देशात इंग्लंड २-१ अशी मालिकेत लीड घेते आणि हा पठय़ा म्हणतो की, मी कर्णधारपद नाही सोडणार, याला काही अर्थ आहे का? हे सारं तुम्हाला चालतं, फक्त सचिनला धारेवर धरायचं एवढंच या मीडियाला माहिती, असं म्हणत चोच्याने पुन्हा एकदा शाब्दिक वार केला आणि लाडक्या सचिनला सेफ केलं.
हे बघं चोच्या, तू म्हणतोस ते खरं असलं तरी तू हा का नाही विचार करत की, सचिन २३ वर्षे इंटरनॅशनल क्रिकेट खेळलाय, आता तो थकलाय, त्याच्या पायांची मूव्हमेंट पाहिलीस का, त्याला बॉलवर जाऊन मोठा फटका मारता येत नाहीए. द्रविडने या साऱ्या गोष्टी ओळखल्या आणि वेळीच रिटायर्डमेंट घेतली का नाही? जर द्रविडने असाच विचार केला असता तर तुम्हाला आता पुजारा टीममध्ये दिसला असता का? सचिन ग्रेट प्लेअर आहे हे मान्य, पण कोणीही सांगण्यापूर्वी, टीका करण्यापूर्वी आपणच रिटायर्डमेंटचा निर्णय घेतलेला कधीही चांगला. त्यामुळे त्याने जे नाव कमावलंय ना, ते तसंच राहील, नाहीतर असाच तो खेळत राहिला की एक वेळ अशी येईल की, सिलेक्शन कमिटीच त्याला सांगेल, सचिन आता पुरे. अशी वेळ सचिनने स्वत:वर आणता कामा नये, असं मत अभ्याने माडलं आणि त्याला सर्वाकडूनच दुजोरा मिळाला. चोच्या मात्र अजूनही नाराज होता. त्याची विकेट मात्र या कट्टेकऱ्यांना काढायची होती. त्यासाठी संत्या पुढे सरसावला. ए चोच्या सचिन आम्हाला पण आवडतो यार, पण तू तर त्याचा डाय हार्ट फॅन आहेस, खरंच यार, असं म्हणत चोच्याला त्याने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. दुसरीकडे अभ्या मोका बघून चौका मारायला तयार झाला. अरे चोच्या सचिनचे फॅन बघ, त्याच्यासाठी पूजा, होम वगैरे करतात, तसं तू काहीच करत नाहीस. आपल्यामध्ये दान करण्याला किती महत्त्व आहे माहितीए ना. तसंच तू पण काही तरी दान करायला हवं सचिनसाठी. चोच्या ऐकताना थोडा भारावला, त्याच्या खिशातल्या पैशांची त्याला जाणीव राहिली नाही आणि तो बोलून गेला, मग मी काय दान करू, असं चोच्या बोलल्यावर सगळ्यांनी एका सुरात सांगितलं ‘कटिंग’.