मितेश रतिश जोशी

मासिक पाळी दरम्यान वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची?, ही एक संपूर्ण जगासमोरील मोठी समस्या आहे. पण यावरही तोडगा काढला आहे. केतकी कोकिळ या तरुणीने..

मासिक पाळी या विषयावर आपल्याकडे आजही खुलेपणाने बोलले जात नाही, त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब आहे. सॅनिटरी पॅडचा कचरा हा त्याहून एक गंभीर विषय आहे. औरंगाबादमधील केतकी कोकिळने याच विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आणि तिने सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणाऱ्या मशीनची निर्मिती के ली. केतकीने ‘एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन इन इंडस्ट्रियल प्रॉडक्ट डिझाइन’मधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एका वर्षांसाठी डिझाइन फर्मचा अनुभव घेतला. सुरुवातीपासूनच महिला केंद्रित प्रकल्प घेण्याकडे तिचा कल होता. दुर्लक्षित समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यावर तोडगा काढण्यात ती पटाईत होती. महिलांच्या संदर्भातील असाच एक विषय म्हणजे मासिक पाळी. केतकीने या विषयावर तिच्यासोबत काम करणाऱ्या चमूसोबत चर्चा केली. तेव्हा तिला प्रकर्षांने जाणवले की, सॅनिटरी पॅडवर काहीतरी तोडगा काढणे आवश्यक आहे.

‘क्लीन इंडिया मिशन’ ही २०१४ ते २०१९ या काळातील एक देशव्यापी मोहीम होती. या मोहिमेने भारतातील तरुणाईबरोबर केतकीचीसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता वाढवली. या संकल्पनेवर काम करण्यासाठी केतकीने पहिले पाऊल उचलले ते महिलांना संघटित करू न त्यांच्याशी संवाद साधण्याचे. केतकी सांगते, ‘गेल्या दशकभरात स्त्रियांबद्दलचा आदर आणि त्यांची सुरक्षा या दोन्हीबद्दल समाजात मोठय़ा प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. याच दोन मुद्यांचा विचार करत असताना मला आणि माझ्या टीमला ‘झिरोपॅड’ ही संक ल्पना सुचली’.

‘झिरोपॅड’ हे असे उत्पादन आहे जे स्वच्छतेस प्रोत्साहित करते. मासिक पाळीच्या कोळात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची या मशीनद्वारे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. या मशीनचा विचार कसा सुचला?, याबद्दल बोलताना के तकी विस्ताराने सांगते, अनेकदा विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या वर्गात शिक्षक काही तरी गुंतागुंतीने भरलेले स्पष्टीकरण देत असतात. जे  विद्यार्थ्यांना बिलकुल समजत नाही, मात्र इतक्या विद्यार्थ्यांमधून केवळ एकच विद्यार्थी ते समजत नाही आहे हे सांगण्यासाठी धाडसाने उभा राहतो. माझी अवस्था ही अशीच काहीशी होती. महिलांच्या स्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेत या विषयावर धाडसाने बोलण्याची आणि कोम करून दाखवण्याची गरज आहे हे मला उमगले होते. मुळात ही फक्त वैयक्तिक समस्या नाही हे लक्षात घेतले पाहिजे, असे के तकी सांगते. सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न अनेक महिलांसमोर आ वासून उभा असतो, मात्र त्यांना यावर उपाय सापडत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा महिलांचे एक सर्वेक्षण केले.  या सर्वेक्षणातून सॅनिटरी पॅडची विल्हेवाट प्रत्यक्षात कशा पद्धतीने लावली जाते हे समजून घेण्याचा मी प्रयत्न के ला. माझ्या कामाची ही पहिली पायरी होती, असे ती म्हणते.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्याकरता पर्यायी व चांगल्या पद्धतींची माहिती नसल्याचे जवळपास सगळ्याच महिलांनी मान्य केले. त्यामुळे हे वापरलेले पॅड कचऱ्यातच जमा होतात. पॅड नष्ट व्हायला ४०० ते ५०० वर्ष लागतात. दुसरे म्हणजे त्यांची डिस्पोजल सिस्टीम नीट नसते. वापरलेल्या पॅडमध्ये अशुद्ध रक्त असते. कचरा वेचणारे लोक त्यांना हाताने वेगळे करतात आणि त्यामुळे त्यातून जंतुसंसर्ग किंवा त्वचेचे तसेच इतर रोग त्यांना होण्याची शक्यता असते. हे सगळे टाळायचे असेल तर प्रत्येक स्त्री आणि मुलीला मासिक पाळीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम केलचे पाहिजे, या विचाराने आपल्याला झपाटून टाकले होते, असे तिने सांगितले.

सुरुवातीला सर्वेक्षणाच्या टप्प्यात आलेले भलेबुरे अनुभवही ती सांगते. अनेक स्त्रियांनी तिला या विषयावर बोलण्यास नकार दिला. नकाराची ही भावना इतकी तीव्र होती की रागाच्या भरात काहींनी  केतकीला घरी जाण्याचासुद्धा सल्ला दिला. काहींनी स्वत:हून तिच्याशी चर्चा के ली, त्रासदायक वाटणाऱ्या काही गोष्टीही बोलून दाखवल्या. केतकी व तिची टीम अभियांत्रिकीच्या क्लॅग गर्ल्सच्या वसतिगृहातसुद्धा गेली होती. तिथेही तिने मुलींशी खुला संवाद साधला. या सगळ्या माहितीच्या आधारे तिच्या टीमने आणि तिने मिळून संशोधन करायचे ठरवले. या टीमचे रिसर्च हेड अक्षश कटारिया यांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि सॅनिटरी पॅम्डसाठी वापरण्यात येणारे साहित्य, त्याचे विघटन करण्यासाठी कोणती उत्तम पद्धत असू शके ल याचा अभ्यास के ला. त्यांनी थर्मल अभियांत्रिकी संदर्भातील ज्ञानाचा उपयोग केला आणि बाजारपेठेतील उपकरणांपेक्षा अधिक सक्षम डिव्हाइस विकसित के ले. या मशीनविषयी केतकी सांगते,आम्ही वापरलेले तंत्रज्ञान बाजारात कोणत्याही विकासक किंवा विक्रेत्याद्वारे वापरले जात नाही. या मशीनमधून सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावताना निघणारा धूर कमी होतो. याविषयीचे तंत्रज्ञान पेटंट केले गेले आहे, पेटंट प्रकाशित झाले असून आम्ही आता प्रतीक्षा कालावधीत आहोत, अशी माहितीही तिने दिली.

‘झिरोपॅड’ हे मशीन अत्याधुनिक तंत्रज्ञान व आकर्षक डिझाइन वापरून बनवण्यात आले आहे. या मशीनमध्ये पॅड जाळताना वातावरणाला कु ठल्याही प्रकारे नुकसान पोहोचत नाही, असा दावा के तकीने के ला. प्रेशर कु कर वापरण्यापेक्षाही सोप्या पद्धतीने हे डिझाइन करण्यात आले आहे. आम्ही डिव्हाइसला इतके स्मार्ट केले आहे की ते आत टाकलेल्या पॅडची गणना करते. मशीनची क्षमता एका वेळी ५ पॅड जाळण्याची आहे. जेव्हा गणना त्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचते तेव्हा मशीन आपोआप सुरू होते. मशीनमधली हीटिंग सिस्टम विषारी वायूंचे उत्सर्जन न करता पॅड पूर्णपणे जाळते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तीस मिनिटांचा कालावधी लागतो. शेवटी पॅडची जी राख उरते ती तुम्ही बागेत झाडांनाही घालू शकता, असेही तिने सांगितले. झिरोपॅड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करण्यात आले आहे.

बाजारात अजून काही  वेगवेगळे पर्याय आहेत, परंतु केतकीचा दावा आहे की झिरोपॅड मशीन इतरांपेक्षा वेगळे आहे. हे मशीन तयार करायला केतकीला साधारण वर्षभराचा अवधी लागला. ऑक्टोबर २०१९ मध्ये हे मशीन बाजारात आले. आतापर्यंत ५० मशीन तिने महाराष्ट्रात शाळा कॉलेज व कंपन्यांमध्ये पोहोचवल्या आहेत. हे मशीन जगभर पोहोचणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या पाहता दरवर्षी लाखो टन सॅनिटरी पॅडचा कचरा तयार होतो आहे. त्यावर के तकीने संशोधन आणि अभ्यासातून काढलेला हा तोडगा खरोखरच महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

viva@expressindia.com