29 March 2020

News Flash

‘मी’लेनिअल उवाच : लव इज लव भाग  १

माणसाला ज्या गोष्टीची माहिती नसते त्याला माणूस घाबरतो किंवा मग तो त्याचा द्वेष करू लागतो

(संग्रहित छायाचित्र)

जीजिविषा काळे

प्रिय वाचक मित्र,

आजचा विषय जरा संवेदनशील आहे. लैंगिकता अणि लैंगिक आवड; अनेक घरांमध्ये हा विषय मुळातच निषिद्ध आहे, हे आपल्या सर्वाना माहितीच आहे. त्याचमुळे मला या विषयाला हात घालावा असे एक मैत्रीण म्हणून वाटते. पण हा विषय एका पत्रात संपणारा नसल्याने आजच्या पत्रापासून निदान या विषयावरची सुरुवात करते आहे. त्यामुळे मी दोन टप्प्यांत जमेल तितक्या प्रमाणात विस्ताराने माहिती द्यायचा प्रयत्न करते आहे. तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की आठवी आणि नववीतल्या विज्ञानाच्या पुस्तकातल्या आकृत्या बघून फिदीफिदी हसला असाल तर तसे आता हसणार नाहीत. पूर्वग्रह न बाळगता हे वाचाल.

तर सुरुवात करूयात लैंगिकतेच्या बाराखडीने..

एल. जी . बी . टी . क्यू + म्हणजे काय?

एल आणि जी म्हणजे समलैंगिक – ‘लेस्बियन’ आणि ‘गे’. म्हणजे आपण ज्या लिंगाचे आहोत त्याच लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होणे. आणि ‘बी’ म्हणजे बायसेक्शुअल. म्हणजे आपण ज्या लिंगाचे आहोत त्याच आणि विरुद्ध लिंग अशा दोन्ही लिंगांच्या व्यक्तींकडे आकर्षित होणे. ‘टी’ म्हणजे ट्रान्स (ट्रान्सजेंडर)  – म्हणजे अशा व्यक्ती ज्या स्वत:ला आपण आहोत त्या लिंगाच्या ऐवजी विरुद्ध लिंगाच्या मानतात, त्याहीपेक्षा फील करतात. म्हणजे तृतीयपंथी. पण हे लोक प्रत्येक समाजात, जातीत, आर्थिक श्रेणीत / इकॉनॉमिक क्लासमध्ये असू शकतात, पण सामान्य माणसांपुढे फक्त एकच समाज येतो.. असो..

‘क्यू’- क्यूकडे तुम्ही एका छत्रीसारखे बघा. ‘कूय’ म्हणजे क्वीअर. म्हणजे अशा व्यक्ती ज्या एकतर स्ट्रेट  (म्हणजे आहोत त्या लिंगापेक्षा फक्त विरुद्धच लिंगाच्या व्यक्ती आवडणे) किंवा ‘सीसजेंडर’ (म्हणजे आहोत त्याच लिंगाने स्वत:ला ओळखणे) नाहीत. वरील एल, जी, बी  आणि टी ह्य़ा छत्रीखाली येतात, परंतु तरीही काही लोकांना यातले कोणतेच ‘लेबल’ लावायचे नसल्यास, ते क्वीअर म्हणवतात,

‘+’ म्हणजे प्लस ह्यात अजून अनेक प्रकार आहे. आणि पिढय़ा जातील तसे अजून प्रकार यात वाढूही शकतात.

जसं की,

आय – इंटरसेक्स म्हणजे पुन:उत्पादक अवयव (रीप्रोडक्टिव्ह ऑर्गन) हे दोन्हीही लिंगांचे असू शकतात.

ए – असेक्शुअल / एसेक्शुअल / एस म्हणजे ज्यांची प्रेमाची व्याख्या ही शरीर संबंधाविरहित आहे.

पी – पैनसेक्शुअल म्हणजे ज्यांचे आकर्षण हे लिंगाच्या आधारित नसते. आणि असे अनेक..

ट्रान्स आणि नॉन बायनरी (एनबी) व्यक्ती या स्वत:ला कुठल्या पद्धतीचे लेबल असावे हे स्वत: ठरवतात. ट्रान्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितले. नॉन बायनरी म्हणजे ज्यांचे लिंग ही त्यांची ओळख नाही. स्त्री-पुरुष याहीपलीकडे ते आहेत.

अशा पद्धतीची वेगवेगळी लैंगिकता असलेले अनेक लोक आपल्या समाजात आपल्याबरोबर जगत आहेत. तुम्हाला हे सांगण्याचे कारण हेच.. तुमच्या मनात बिंबवून घ्या की हे सर्व नैसर्गिक आहे. कुणीही कुणालाही गे ‘बनवू’ शकत नाही. आणि ही कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. माणूस हा आत्यंतिक कॉम्प्लिकेटेड आणि सुंदर प्राणी आहे. आणि त्याच्या अनेक छटा निसर्गात आहेत. धर्म, भाषा, जात-पात हे सर्व मनुष्यघटित आहे, परंतु लैंगिकता ही मात्र नैसर्गिक आहे आणि असते.

तुमच्या आयुष्यात अनेक टप्प्यांवर तुम्हाला या समुदायातील अनेक माणसं भेटतील. तेव्हा हे वाक्य घोकून घ्या, लिहून ठेवा, कोरून ठेवा. – हे सर्व नैसर्गिक आहे. माणसाला ज्या गोष्टीची माहिती नसते त्याला माणूस घाबरतो किंवा मग तो त्याचा द्वेष करू लागतो. आपल्या वरच्या पिढय़ांनी हेच के ले. पण म्हणून आपणही सुशिक्षित असून असे वागायचे का? ज्याबद्दलचे अज्ञान आहे त्याची माहिती घेणे हेही आपलेच कर्तव्य आहे. तुमच्या हातात फोन आहेत. त्याचा योग्य वापर करा. माहिती मिळवा आणि भेदभाव करू नका.

तुम्हाला प्रश्न पडतील की मग काय करायचे? कसे वागायचे? शॉर्टमध्ये सांगायचे झाले तर सांगेन की कुठल्याही माणसाशी माणसासारखे वागा. आता याबद्दल आणखी सविस्तर पुढच्या पत्रात लिहीन.

तोवरची टीप –  जे तुम्हाला तुमच्याशी वागलेले अवडणार नाही, ते तुम्ही इतरांसोबत करू नका, वागू नका. बेसिक!

कळावे,

जीजि

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 4:08 am

Web Title: love is love viva millennial uvach abn 97
Next Stories
1 बुकटेल : ब्रिडा
2 डाएट डायरी : महिलांचे दीन दिन
3 वस्त्रांकित : पदर ‘माया’
Just Now!
X