हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com  सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
‘माझ्या मराठी भाषेचा, लावा कपाळास टिळा..’ असं आपण सारे मराठीजन नेहमीच म्हणतो. पण या ‘माय मराठी’बद्दल आपल्याला कितीशी नि केवढी माहिती असते हो? मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठवाडी, मालवणी, झाडीबोली, नागपुरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, बेळगावी या मराठीतील बोली भाषा आहेत. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता मराठी भाषा अभ्यास परिषद, राज्य मराठी विकास संस्था, मराठी विश्वकोश निर्मिती, भाषा संचालनालय, मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी अनेक संस्था कार्यरत असून त्यांचं योगदान मोठं आहे.
सध्या संगणकाच्या व्यवहारात ‘युनिकोड’सारख्या सॉफ्टवेअरचा वापर वाढलाय. अनेक देशी-विदेशी बनावटींच्या भ्रमणध्वनींमध्ये मराठी शब्दफलकाची सोय झालेली आहे. विविध सोशल साइट्सच्या माध्यमातून व्यक्त व्हायची भाषा मराठीच आहे. चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या अमराठी तारे-तारकांच्या मराठी शिकण्याच्या बातम्यांमध्ये आता नावीन्य उरलेलं नाहीये. मराठीविषयीचा सार्थ अभिमान व्यक्त करणाऱ्या कौशल इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘मराठी अभिमान गीता’ला आजही तेवढीच जोरकसपणं पसंती मिळत्येय. विविध ब्लॉग्ज आणि वेबसाइट्सच्या माध्यमांतून अनेक मंडळी मराठीतून व्यक्त होणं पसंत करताहेत. त्याखेरीज तरुणाईची ‘िमग्लिश भाषा’ही रुळायला लागल्येय. हे सगळं आहे नि होतंय, ते केवळ मराठी माणसांच्याचबाबतीत, असं मात्र मुळीच नाही. आपण ते सहज करतोय कारण मराठी आपली मातृभाषा आहे. ज्यांची मातृभाषा मराठी नाही, त्यांचं काय? त्यांना मराठी भाषेविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला. ही अमराठी भाषिक तरुणाई आपल्याइतक्याच जिव्हाळ्यानं मराठीविषयी भरभरून बोलली. त्यातल्या काहींनी मराठीला आपला ‘लिहिता हात’ केलंय तर काहींनी मराठी साहित्याचाही आस्वाद घेतलाय. ‘मराठी भाषा दिना’निमित्त आपल्या आवडत्या मराठी भाषेविषयी काहीजणांनी आपलं मत ‘व्हिवा’च्या या सदराच्या माध्यमातून मांडलंय.

रितेश सिंह
मला वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात. म्हणूनच पहिल्यांदा मराठी ऐकलं नि ते वाचायचा प्रयत्न केला, तेव्हा ही भाषा शिकण्यात मला रस वाटू लागला. गेली १२ र्वष मी मराठी बहुसंख्य असणाऱ्या भागात राहतोय. म्हणून मला मराठी शिकणं अधिक सोपं गेलं. मराठी नि िहदी भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जात असल्यानंही मराठी शिकणं नि लिहिणं फारसं अवघड गेलं नाही. या दोनही भाषांमधले बरेचसे शब्द एकसारखे आहेत आणि काही शब्दांचा अर्थ समान आहे. यामुळंही मराठी आत्मसात करताना कठीण गेलं नाही. दोन वर्षांत मी मराठी शिकलो. नागपूर नि पुण्यासारख्या शहरांत राहिल्यानं माझं मराठीवरचं प्रभुत्व वाढतंय. मराठी भाषा ही शिकायला साधीसोपी नि सरळ भाषा आहे.

अक्षया कवासिया
दादरसारख्या भागात जन्मल्यामुळे मराठी भाषेचे संस्कार आपोआप माझ्यावर झाले. मराठी भाषा लिहिता नि बोलता येते, याचा मला आनंद होतो. मराठी भाषेमध्ये सगळ्या भावना हुबेहूब समजावण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ खमंग थालीपीठ, खुसखुशीत अनारसा इत्यादी. हे वैशिष्टय़ माझ्या मातृभाषेत आणि मला येणाऱ्या इतर भाषांत जाणवलं नाही. मराठी नीट येत असल्यानं मी मराठी लोकांशी सहज संवाद साधू शकते. त्यामुळे आपसूकच मला मराठी भाषेतले विविध पलू शिकायला मिळतात. ट्रेन किंवा बसच्या प्रवासात मराठी येत असल्यानं अडीअडचणीच्या वेळी मी चटकन कुणाशीही संवाद साधू शकते. मला मराठी ही भाषा खूप आवडते.

निशांत शहा
माझं बारावीपर्यंतचं शिक्षण मराठीत झालंय. मी काव्यलेखनही मराठी भाषेतूनच केलं आहे. मराठी भाषेशी असलेलं माझं नातं, मला माझ्या मायबोलीशी आहे, तसंच दृढ आहे. मला गुजराती भाषेएवढाच गोडवा मराठी भाषेतही वाटतो. मला भारतातील सर्वच भाषांबदल अभिमान वाटतो.

कार्तिक नायडू
मी मराठमोळ्या वातावरणात राहतो. मराठी बोलता येत असेल तर आपण समोरच्याशी मोकळेपणानं संवाद साधू शकतो. मी इथल्या मराठी आणि इतर भाषिकांच्या सगळ्याच सणवारांत सामील होत असल्यानं त्या त्या संस्कृतीची नि परंपरांची माहिती होते. वेळ मिळाला तर मी अधूनमधून मराठी पेपर वाचतो. शेजारी आणि मित्रमंडळींशी नेहमी मराठीत बोलतो. या जिवाभावाच्या माणसांसोबत मराठमोळ्या तीर्थक्षेत्रीही जातो. शेजारच्यांमुळे आता मी मालवणीही शिकलोय.

दर्शना खत्री
शाळेत असल्यापासूनच मी मराठी भाषा शिकते आहे. शेजारीपाजारी वातावरण मराठमोळं असल्यानं मराठी ही जणू माझी दुसरी मातृभाषाच झाल्येय. मी एवढं चांगलं मराठी बोलते की, कधी कधी लोकांना खरंच वाटत नाही की, मी गुजराथी आहे. मराठी भाषा खूप समृद्ध आहे. िहदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटाचा बाज काही वेगळाच आहे. मराठी चित्रपट अधिक हृदयस्पर्शी असल्यानं ते बघायला मला आवडतात. माझ्या मराठी मित्रमत्रिणी आणि परिचितांना माझा अभिमान वाटतो.

ज्योती शिरसंगी
मराठी भाषा मला एकदम आपलीशी वाटते. डोंबिवलीकर असल्यानं मला पहिल्यापासूनच मराठीबद्दल क्युरॉसिटी होती. आम्ही दाक्षिणात्य असल्यानं शेजारी आमच्याशी मराठी बोलत नसत. पुढं शाळा-कॉलेजमधल्या मराठी विषयामुळे मराठीतली गोडी वाढली. कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज कवींच्या हृदयस्पर्शी कवितांनी ही गोडी व्दिगुणित केली. मराठी बोलण्याच्या-गाण्याच्या प्रयत्नाला यश आलं ते मुग्धा घैसास यांच्या संगीत प्रशिक्षणादरम्यान. तिथं भाषांतराचा पर्याय उपलब्ध असतानाही मी मन:पूर्वक मराठीचीच निवड केली. फिजिओथेरपीचा प्रोफेशनल कोर्स जॉइन केल्यावर मराठी मित्रमंडळींमुळे आत्मविश्वासानं मराठी बोलायची सवय झाली. आता माझं मराठीशी जवळचं नातं निर्माण झालंय. मराठी भाषा अत्यंत अपीिलग असून त्यातच आपण कुठलीही भावना सहजपणं व्यक्त करू शकतो. मराठी माझ्या जिभेवर एवढी सहजपणे रुळल्येय की, मी अमराठी आहे, हे कुणाला खरं वाटत नाही.

त्रिशिता चक्रवर्ती
मी कोलकाता येथे राहते; माझी मातृभाषा बंगाली आहे. पण काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी महाराष्ट्रात-(मुंबईमध्ये) आले आणि इथे असलेल्या काही मराठी मित्र-मत्रिणींमुळे मराठी भाषेची ओळख झाली आणि मला ती भाषा आवडायला लागली. मला जमेल तसं थोडंफार मी त्यांच्याशी मराठीत बोलते. कोलकात्याला असल्यामुळे पूर्वी कधीच मराठी भाषा ऐकता किंवा बोलता आली नाही; परंतु आता मला हळूहळू मराठी भाषा जाणून घेता येतेय. त्यामुळे चुकत चुकत का होईना मी मराठी बोलायलाही शिकते आहे.

निधी पटेल
मी सुरतची आहे. मराठी भाषा मला खूप आवडते. शिक्षणासाठी जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा मराठी भाषेशी जास्त संपर्क आला. मला मराठी भाषा शिकण्याची खूप इच्छा आहे. माझ्या आईला मराठी बोलता येतं. त्यामुळे कधी कधी तिच्याकडून मराठी शब्द ऐकायला मिळतात. गुजराथी भाषेतले काही शब्द मी मराठीशी रिलेट करते. त्यामुळे ही कोणती वेगळी भाषा आपण ऐकतोय असं वाटत नाही. मराठीतला एखादा शब्द मला समजला नाही तर तो त्वरित मी माझ्या मित्रांना विचारते. मराठी भाषेतला गोडवा मला खूप भावतो.