लोकसभा निवडणुकीत तरुणाईचं मत महत्त्वाचं ठरलं होतं. प्रथमच देशातील नवमतदाकरांचं अस्तित्त्व आणि त्यांचा प्रभाव यावर बोललं गेलं. सोशल मीडियावरचा प्रचार आणि तरुणाईला केलेलं आवाहन याचा परिणाम दिसून आला होता. आता हेच नवमतदार विधानसभेच्या निवडणुकीचा कशा पद्धतीनं विचार करताहेत? हे जाणून घ्यायचा प्रयत्न.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा कल निर्णायक ठरला असे म्हणतात. तरुणाईला बदल हवा होता आणि त्यासाठीच त्यांनी मतदान केले, हे निकालावरून स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही राजकीय पक्षांनी तरुणाईला आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आता विधानसभेला तरुणाईचा कल नेमका कुठे आहे, ते कुठल्या विचाराने मतदान करणार आहेत, त्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे कोणते आहेत आणि त्यांना राज्याचा नेता कसा हवाय, हे जाणून घेण्यासाठी ‘व्हिवा’ने एक छोटा सव्‍‌र्हे केला.
‘भारत म्हणजे तरुणांचा देश. आज तो जगातील सर्वात तरुण देश झाला आहे. हीच तरुण पिढी म्हणजे देशाचे भविष्य आहे.’ या आणि अशा प्रकारच्या बाता आपण नेहमीच सर्व माध्यमांतून आणि सभांमधून ऐकतो. आज देशात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेव्हा साहजिकच ही पिढी म्हणजेच  राजकारण्यांची ‘व्होट बँक’ आहे. प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकारणी या तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आजकाल अनेक प्रकारची माध्यमेही वापरली जातात. पण खरंच यातून तरुणांचे प्रश्न मांडले जातात का? याबद्दल आजच्या तरुण पिढीला आणि विशेषत: नवमतदाराला काय वाटते हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही राज्यातल्या शहरी भागातील ७५ तरुण मुला मुलींशी संवाद साधून सव्‍‌र्हे केला. सव्‍‌र्हे सँपल शास्त्रीय पद्धतीने निवडलेले नसले तरी तरुणांच्या मनाचा वेध घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे.
मे महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली आणि नवीन सरकार अस्तित्वात आले. वयाची साठी पार केलेले नरेंद्र मोदी तरुणांना आकर्षति करू शकले, पण काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले राहुल गांधी मात्र पिछाडीवर राहिले. तेव्हा या पिढीला नेमके काय हवे, यावर चर्चा घडल्या. मोदींच्या प्रचाराचाही फोकस तरुणाईवरच होता. नवीन सरकार आले, विजयी गुलाल उतरू लागला आणि तितक्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि पुन्हा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली.
मत पक्षाला की उमेदवाराला?
लोकसभा निवडणुकीचे स्वरूप काहीसे अध्यक्षीय निवडणुकीसारखे झाले होते. दोन व्यक्तींभोवती निवडणुकीचा विषय फिरत होता. पण महाराष्ट्रात चित्र तसे मुळीच नाही. आघाडी आणि युती तुटल्यानंतर तर जास्तच संभ्रम निर्माण झाला आहे का, असा प्रश्न पडू लागतो. महाराष्ट्रातील निवडणुकीत अनेक बलाढय़ नेते एकमेकांसमोर उभे राहिल्याने निवडणुकीची चुरस वाढल्याचे काहींनी मत नोंदविले. विधानसभेला मात्र स्पर्धा मुख्यमंत्री कोण होणार याची नसून सत्ता कोणत्या पक्षाकडे जाणार याविषयी जास्त आहे. तेव्हा पक्षाकडे बघून मत देणार की उमेदवाराकडे, हा प्रश्न तरुणाईला विचारला. याबाबतीत आजची तरुणाई मतदानाविषयी काही प्रमाणात जागरूक होताना दिसत आहे. पक्ष महत्त्वाचा आहेच, पण आमचा आमदार कोण व्हावा हे ठरविणेही महत्त्वाचे असल्याने पक्षाने दिलेला उमेदवार चांगला असेल तरच त्याला मत देऊ, असे बहुतांश मुलांनी सांगितले. मुंबईची यशश्री भुरके म्हणते, ‘मोदी आणि राहुल गांधी यांच्यात लढत असल्याचं चित्र लोकसभेच्या वेळी होतं. आता तशी परिस्थिती नाही. राज्याचं नेतृत्व कोण करेल हे निश्चित नसल्यानं जी स्पर्धा होईल ती पक्षामधे होईल, नेतृत्वामध्ये होणार नाही, असं मला वाटतं. आपल्या भागातला आमदार कोण हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्ष कोणता याबरोबरच त्यांचा उमेदवार कोण, हेदेखील मी विचारात घेईन.’
देश तरुण झाला आहे, पण तरुण पिढी राजकारणापासून दूर जात आहे, अशी चिंता आज व्यक्त केली जात आहे. घराणेशाही, वशिलेबाजी अशी अनेक कारणे आजच्या तरुण पिढीला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवत असल्याचे चित्र आहे. आजच्या तरुण पिढीमध्येही हीच भावना दिसून आली आहे. निवडणुकांच्या राजकारणात खऱ्या तरुण कार्यकर्त्यांला तिकीट देण्यात सर्वच राजकीय पक्षांनी हात आखडता घेतल्याची भावना तरुणाईमध्ये आहे. जर तरुण आमदारच कमी असतील, तर तरुणांचे प्रश्न विधान भवनात मांडणार कोण, असा प्रश्नही यामुळे उद्भवला आहे. आजपर्यंत तरुणांना भेडसावणारे प्रश्न खरंच मांडले गेले का, यावर मात्र अतिशय संमिश्र प्रतिक्रिया तरुणांनी नोंदविल्या.
विकासाच्या कार्यक्रमाऐवजी जागावाटपावरच जास्त खल
विधानसभा निवडणुकीत खरंच विकासाच्या मुद्दय़ाची चर्चा किती झाली आणि जागावाटपाची चर्चा किती झाली, यावर तरुणाईचे मत मात्र फारच ठाम असल्याचे जाणवते. जवळजवळ सर्वच पक्ष नुसत्या जागावाटपाबद्दल बोलत बसले आणि खरे मुद्दे बाजूलाच राहून गेल्याची खंत ही तरुणाई व्यक्त करते. पण या तरुणाईला काही मुद्दे अगदी महत्त्वाचे वाटतात. त्यात ‘भ्रष्टाचार’ आणि ‘महागाई’ हे मुद्दे आघाडीवर राहिले आहेत. तर शिक्षणविषयक प्रश्नही फार गंभीर असल्याचे काहींचे म्हणणे आहे. स्त्रियांची सुरक्षा हादेखील महत्त्वाचा मुद्दा म्हणून नमूद केला गेला. याशिवाय पाणीप्रश्न, रोजगार, अन्न सुरक्षा, झोपडपट्टी पुनर्वसन आणि उद्योग धंद्यांचा खुंटलेला विकास, असे काही प्रश्नही तरुणांना महत्त्वाचे असल्याचे भासत आहे. पण गेल्या निवडणुकीपर्यंत प्रकर्षांने चíचला जाणारा ‘शेतकरी आत्महत्यांचा’ मुद्दा फार कमी जणांना यंदा महत्त्वाचा वाटला.

पुरोगामी महाराष्ट्र?
महाराष्ट्रात इतके गंभीर प्रश्न असतानाही ‘फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र’ अशा मोठमोठय़ा बाता आपण प्रत्येक पक्षातल्या नेत्यांकडून ऐकतो. पण हा महाराष्ट्र खरंच पुरोगामी राहिला आहे का, याविषयी तरुणाईसुद्धा साशंक असलेली दिसून येते. एकाही प्रमुख पक्षाने पितृपंधरवडय़ात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, हे अनेकांनी बोलून दाखवले. वाढती अंधश्रद्धा, जातीयवाद यात महाराष्ट्राचे पुरोगामित्व हे फक्त भाषणबाजी आणि जाहिरातबाजी यातच मर्यादित झाल्याची भावना तरुणाईच्या मनात असल्याचे या सर्वेक्षणादरम्यान प्रकर्षांने जाणवले.
मुख्यमंत्री कोण?
मुख्यमंत्री कोण व्हावा याविषयी प्रश्न विचारला असता – उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांचे पर्याय असताना अनेकांनी सांगता येत नाही, असंही उत्तर दिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना समसमान म्हणजे २५ टक्के पसंती मिळाली आहे. ‘राज ठाकरे चांगले उमेदवार नक्कीच आहेत, तरीही ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे त्यांनी लक्षात ठेवावे,’ असे स्न्ोहल देशमुख म्हणाली. नारायण परब म्हणतो, ‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून चांगला माणूस आहे. पण काँग्रेस- राष्ट्रवादी काळातील भ्रष्टाचाराचं काय? एक माणूस चांगला असून उपयोग होत नाही.’ भाजपचे देवेंद्र फडणवीस या स्पध्रेत आघाडीवर राहिले असून, त्यांना ३० टक्के मते मिळाली आहेत. तर पृथ्वीराज चव्हाणांचा ‘स्वच्छ’ कारभार काहींना भावला असून त्यांना १६ टक्के पसंती मिळाली आहे.

डिजिटल प्रचाराचा प्रभाव
तरुण मतदारांच्या मतावर कशाचा प्रभाव आहे, हे जाणून घेण्याचाही एक प्रयत्न आम्ही केला. यात टीव्ही आणि इंटरनेटचा, त्यावरच्या प्रचाराचा प्रभाव आजच्या शहरी तरुणाईवर सर्वात जास्त असल्याचे दिसले. वृत्त वाहिन्यांवरून होणाऱ्या चर्चा किंवा व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी माध्यमातून होणारा प्रचार यावर आजच्या तरुण पिढीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. मात्र व्हॉट्स अॅपसारख्या माध्यमातून येणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवणे अनेकदा कठीण जात असल्याचेही काहींनी म्हटले आहे. हे मेसेजेस फसवे असू शकतात अशी शंका काहींच्या मनात आहे. पण यातील सर्वात महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे आजची तरुणाई कुटुंबातील इतर व्यक्ती कोणाला मतदान करतात याचा फारसा विचार न करता स्वत:ला काय वाटते त्याप्रमाणे मतदान करत असल्याचा दावा करीत आहेत. ‘जातीवर आधारित’, ‘परंपरागत मतदार’, ‘एकगठ्ठा मते’ यासारख्या लोकशाहीला मारक संकल्पना ही पिढी निकालात काढू इच्छिते. पूर्वीची ‘परंपरागत’ एका पक्षाप्रती असलेली कुटुंबाची निष्ठा या संकल्पनेला छेद दिला जात असून, तरुण मतदार स्वत: विचार करू लागला आहे, हा लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा बदल म्हणावयास हवा.  

स्थिर आणि कार्यक्षम सरकारची अपेक्षा धरणारी तरुणाई नेमका कसा विचार करतेय, प्रचारातले कोणते मुद्दे त्यांना खटकत आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटे सर्वेक्षण केले. भ्रष्टाचार आणि महागाई हेच मुद्दे तरुणाईच्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाचे ठरणार आहेत, असे यातून दिसले.

vv07आमच्या आई बाबांच्या पिढीपेक्षा आमच्याकडे संवादाची माध्यमे जास्त आहेत. आम्हाला विचार स्वातंत्र्यही जास्त आहे आणि त्याचा उपभोग घेण्यासाठीची माध्यमं सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या पिढीपेक्षा आम्ही जास्त स्वतंत्र विचार करतो. मित्रांसोबत होणारी चर्चा असेल, टी व्ही आणि सोशल मिडीयावर होणारा उहापोह असेल यामुळे आम्ही स्वतंत्र विचार करायला प्रोत्साहित होतो. त्यामुळेच आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींना काय वाटतं. आमचं घर पारंपारिक मत कुणाला देतं,  त्यापेक्षा आम्हाला काय वाटतं हे महत्वाचे आहे. घरात चर्चा तर करतोच, पण  स्वतची विवेकबुद्धी वापरून मतदान करतो.
सुयश देसाई

 vv06महाराष्ट्रात यंदा सर्वच पक्षांची अवस्था विचित्र आहे. कोणाकडे चेहरा आहे तर धोरणे नाहीत. ज्यांच्याकडे धोरणे आहेत, आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे चेहरा नाही. लोकसभा निवडणूकीत मोदी हे खूप ताकदवान उमेदवार होते. त्यामुळे निवडणूक एकांगी झाली होती. महाराष्ट्रात मात्र तसे नाही. कोण निवडून येईल याची खात्री नाही. कोणी एक तगडा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही. तेव्हा मत देताना पक्षासोबत स्थानिक उमेदवाराचा विचारही करावाच लागेल.
– प्राजक्ता भिडे
(संकलन साहाय्य – कोमल आचरेकर, गार्गी गीध, निकिता वाघ, प्रियांका खानविलकर, भक्ती तांबे, तेजल सप्रे, लीना दातार)