तिच्याशी बोलताना मला राहून राहून कवी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेंवालों की कभी हार नहीं होती’ या ओळी सातत्यानं आठवत होत्या. बोलता बोलता तिनं खूप गोष्टी शेअर करत आपलं मन मोकळं केलं. परिस्थितीशरण न होता उलट जिद्दीनं तिला सामोरं जाणारी ही आहे प्रियांका िशदे
प्रियांका िशदे ‘एस.आय.ई.एस. कॉलेजमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम.एस.सी- पार्ट-वन करत्येय. दिवसभरच्या बिझी शेडय़ुलमध्ये त्यांचे सतत सेमिनार, प्रॅक्टिकल्सही असतात. तिची अकरावी-बारावी कोळीवाडय़ाच्या केंद्रीय विद्यालयात झालीय नि पदवी एस.आय.ई.एस. कॉलेजमधून घेतलीय. तिचा पुढं पीएच.डी. करताना जॉबही करायचा विचार चाललाय. तिनं नेटसेटचा फॉर्म भरला असून पुढच्या वर्षी ती परीक्षा देणारेय. वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी तिच्यावर पडलीय. तिच्या आईला तिनं जॉब करावा नि पुढचं शिक्षणही घ्यावं असं वाटत होतं. ती बारावीला असताना त्यांच्या अडचणी वाढल्या. शिक्षण थांबवावं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. किमान पदवी तरी मिळवी असं तिला वाटत होतं. त्याच सुमारास शीतल ढापरे या तिच्या कार्यकर्ता पालकांनी तिचं नाव ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’, ठाणे अर्थात ‘व्हीएसएम’मध्ये नोंदवलं.
इच्छा असूनही शिक्षण न घेता येणाऱ्या या मुलांचा शोध घेऊन त्यांना ‘मंडळा’तर्फे मदतीचा हात दिला जातो. व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, करिअर गाइडन्सादी विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही मुलं एकत्र जमतात. आपल्या महिन्याभराच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल त्यांनी संवाद साधल्यानं आपोआपच सभाधीटपणा येतो. या सुसंवाद नि सत्संगामुळं प्रियांकाचाही व्यक्तिमत्त्व विकास होतोय. ती सांगते की, ‘सुरुवातीला मला प्रश्न पडला होता की, हे सगळे कार्यकत्रे नि संस्था आम्हा मुलांसाठी एवढी निरलसपणं का झटताहेत? मग जाणवलं की, आपल्या चार िभतींच्या जगापेक्षा कितीतरी वेगळं जगही आहे. मंडळ जॉइन केल्यावर एक आजोबा माझ्या शिक्षणाचा खर्च करणारेत, असं कळलं. त्या आजोबांना समक्ष भेटल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं.. मला कळलं की, माझ्यासारखी अनेक मुलं इथं आहेत.. पुढं मी मंडळातर्फे सोमनाथचं श्रमसंस्कार शिबीर, बदलापूरच्या सेवांकुर संस्थेच्या शिबिरात सहभागी झाले. तिथं लांबूनलांबून आलेल्या अनेकांशी गाठभेट झाली. विविध समस्यांवर काम करणाऱ्या या मंडळींमुळं प्रेरणा मिळाली. एकाकडून कळलं की, काही मुलांना वर्गात केलेला अभ्यास खोडून त्यावरच गृहपाठ करावा लागतोय.. ते ऐकल्यावर वाटलं की, आपली परिस्थिती तुलनेनं बरी आहे. जे आहे त्यात समाधानी राहावं. मनाशी ठरवलंय की, आपणही गरजूंना असाच मदतीचा हात द्यायचा..’
प्रियांका सांगते की, ‘सुरुवातीला आमची परिस्थिती व्यवस्थित होती. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला होते. ती केंद्रीय विद्यालयात सातवीत असताना वडील गेले. तेव्हा शेजारी नि ओळखीच्यांनी सर्वतोपरी मदत केली. पण परिस्थिती बदलल्यानं अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ लागलं. अभ्यास न केल्यानं नापास होईन असं वाटू लागलं. यंदा पास कर, मी मेहनत करेन, अशी प्रार्थना देवाकडं केली. तेव्हा विचार केला की, आपली क्षमता वाढवायची. आधी पोटापुरते गुण पुरे, हा विचार बदलला. तेव्हापासून माझ्या करिअरचा ग्राफ वरच गेलाय. वडिलांच्या हयातीत हाती असलेल्या गोष्टींची किंमत कळत नव्हती, ती आता कळत्येय.’
यंदा तिनं ‘राहुल अ‍ॅकॅडमी’ जॉइन केलीय. या अ‍ॅकॅडमीत अकरावी-बारावीला केमिस्ट्री शिकवतेय. सुरुवातीला ती मुलांशी स्ट्रिक्ट वागायची. कारण आजकालची मुलं शिकवताना किती सतावतात, हे तिला माहिती होतं. पण बारावीची मुलं घाबरून डाऊट विचारत नाहीत, हे दिसल्यावर ती थोडी मवाळ वागू लागल्यावर मुलं जणू तिच्या डोक्यावरच बसली. पण यात त्यांचा नाही, तर भोवतालच्या परिस्थितीचा दोष आहे, याची तिला कल्पना आहे. त्यांच्या मस्तीला कंटाळून काही शिक्षकांनी क्लास सोडला. पण ती त्यांना अभ्यासासोबत चांगली शिकवण द्यायचा प्रयत्न करणारेय.
ती सांगते की, ‘कॉलेजमध्ये कडक शिस्तीचं पालन केलं जातं. रफ नि फेअर जर्नलमध्ये अभ्यास करावा लागतो. उद्या करायचा अभ्यास आज रफ जर्नलमध्ये लिहून घ्यावा लागतो. होमवर्क करावाच लागतो. कारण होमवर्क केल्याशिवाय एन्ट्री मिळत नाही. माझ्याकडं नेटचं कनेक्शन नसल्यानं पुस्तकंच रिफर करावी लागतात. लायब्ररीतली माझ्या अभ्यासविषयासाठीच्या यादीतली पुस्तकं रिफर करायचं टास्क मोठं असतं. काहीवेळा आमचा ग्रुप एकत्र अभ्यास करतो, नोटस् शेअर करतो. दिवसभर आमची लेक्चर्स ‘सोमय्या’मध्ये नि ‘एस.आय.ई.एस.’मध्ये प्रॅक्टिकल्स असतात. घरी आल्यावर क्लासमध्ये शिकवायला जाते. तिथून घरी आल्यावर रात्री जागून अभ्यास करते.’
शाळेत असताना तिनं भरतनाटय़ममध्ये भाग घेतला होता. डान्स करायला आवडतं तरी सवड नाहीये. ती सांगते की, ‘बी.एस्सी.ला आल्यापासून इतरांचं बघून मीही वाचायला लागले. पुस्तक वाचायला घेतल्यावर झोप यायची. पण पुस्तक वाचायचा निश्चय केला नि तेही जमू लागलं. चेतन भगतची पुस्तकं, शेरलॉक होम्सच्या कथा नि प्रेरणादायी पुस्तकं मी सध्या वाचतेय. पुस्तकं वाचून मन फ्रेश होतं. रात्री झोपताना थोडा वेळ वाचन करून सत्संगात शिकवलेली प्रार्थना म्हणते. त्यामुळं सकारात्मक ऊर्जा मिळते. माझ्या बिझी शेडय़ुलमुळं इच्छा असूनही घरकामात लक्ष देता येत नाही. सुट्टीच्या दिवशी ही कसर भरण्याचा प्रयत्न करते. मला अ‍ॅिक्टगची आवड असली तरी कधी परफॉर्म केलेलं नाहीये. मत्रिणीच्या एकांकिका-नाटकं पाहायला सुट्टीत आवर्जून जाते.’ एस.वाय.ला असताना तिनं काही काळ केटिरगमध्ये काम केलं होतं, पण तो अनुभव चांगला नसल्यानं ते काम करणं थांबवलं.
एस.वाय.पासून ती सरकारी परीक्षांची सुपरव्हिजन करत्येय. त्याबद्दल ती म्हणते की, ‘अभ्यासाचा वेळ सुपरव्हिजनला द्यायला माझ्या शिक्षकांचा माझ्याच चांगल्यासाठी विरोध होता. मग क्लास-अभ्यास नि सुपरव्हिजन मॅनेज करावं लागायचं. मी क्लासची फी देऊ शकत नसल्यानं क्लास सोडणार होते. पण त्यांनी तो कंटिन्यू करायला सांगितलं. माझा चांगला रिझल्ट त्यांना अपेक्षित होता. मी दिवसरात्र केमिस्ट्रीचा अभ्यास केला नि टी.वाय.ला ७४.३ टक्के मिळाले. पण शिक्षक मात्र थोडे नाराजच होते. कारण टी.वाय.चं वर्षभर मला सर्वाधिक गुण मिळाले होते. कॉलेजतर्फे एस.वाय.ला चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडून त्यांची सराव परीक्षा घेतली जायची. त्यात माझीही निवड झाली होती. पण फायनल परीक्षेला मला क्लास नि कॉलेजचं खूपच प्रेशर आलं. कॉलेज सुरू व्हायच्या आधीच माझा अभ्यास सुरू झाला होता. मला बर्डन घेऊन नाही तर मन लावून अभ्यास करायची सवय. तेव्हा सतत कोणत्या ना कोणत्या टेस्ट देतच होते. त्या प्रेशरमुळं गुण कमी पडले. एवढे की, मी कॉलेजमध्ये पहिली आले होते, ती चौथी आले. या अनुभवानं खूप शिकायला मिळालं. भोवतालची मुलं सारखी ‘इस का तो स्टडी हो गया,’ असं म्हणायची. नि अभ्यासाचाही ओव्हरडोस झाला असावा.’ प्रियांकाकडं पाहून वाटतं की, परिस्थिती माणसाला बदलते, ते आपल्याला कळत नाही. स्वत:ला सावरून तो बदल स्वीकारावा लागतो. उभं राहावंच लागतं.. कारण ‘कोशिश करनेंवालों की, कभी हार नहीं होती..’