व्हिवाच्या प्ले लिस्टमध्ये ‘मराठी पाऊसगाणी’ वाचून इतरही काही गाणी आठवली आणि ऐकायची इच्छा झाली. ‘अंगणी माझ्या मोर नाचू लागले..’ हे वैशाली सामंतने गायलेलं अवधूत गुप्तेचं गाणं म्हणजे प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या तरुणीच्या भावनांचे प्रतीकच. असंच एक ‘आईशपथ’ चित्रपटातील, मानसी साळवीवर चित्रित झालेलं गाणं म्हणजे ‘ढग दाटुनी येतात मन वाहुनी नेतात..’ या गाण्याचं बरंचसं चित्रण समुद्रकिनारी असल्याने या गाण्याला एक वेगळाच लुक व फील आहे. कवी सौमित्र यांनी रचलेल्या सुंदर काव्याला अशोक पत्कींचा स्वरसाज असून साधना सरगम यांनी गायले आहे. आणखी एक शंकर महादेवन आणि अमृता नातूच्या आवाजातील सुपरहिट पाउसगाणं म्हणजे ‘चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे’. या गाण्याचा ताल प्रत्येकाला ठेका धरायला लावणारा आहे. गीतकार प्रवीण दवणे यांचे शब्द, अजय-अतुलनी स्पेशल टचने या गाण्याला सदाबहार केले आहे.
ओंकार जोशी

योगाचे नवे ट्रेंड
२६ जूनच्या पुरवणीत योगाचे नवे रुपडे दाखवल्याबद्दल धन्यवाद. पतंजलींनी ‘भारतीय मानसशास्त्र’ या ग्रंथात योग म्हणजे चित्त व वृत्तीचा निरोध अशी व्याख्या केली आहे. त्या दिशेने घेऊन जाणारी सर्व साधने, क्रिया योग या शब्दात सामावतील. योग या शब्दाला साधना हा शब्द जोडताना त्याच्यातील आचरण सातत्य राखावे लागेल. आपण सांगितलेला वॉकिंग योग विशेष आवडला, कारण तो सहज, साधा व सोपा आहे. बिनखर्चाचा आहे. बहुतेक सगळे वैद्यकीय व्यावसायिक या योगाचा अंगीकार करावा असा सल्ला देतात. रुग्ण अर्थात तो नाइलाजाने मानतात पण आपल्या पद्धतीने. ते साथी सोबती निवडतात व चालावयास लागतात. गप्पा-गोष्टी करत आनंद मिळतो पण उपचार मागे पडतो. सर्वानी शब्दही न उच्चारता चालायचा पण केला तर गोष्ट वेगळी. सहसा तसे घडत नाही. व्यक्तिगत पातळीवर आपला योगाभ्यास झाल्यावर मग गप्पाष्टकाचा योग साधावा.
रामचंद्र महाडिक, सातारा</strong>

सुरांचा किमयागार
जसराज जोशी याची प्ले लिस्ट वाचनीय असते. २६ जूनच्या अंकातील ‘सुरांचा किमयागार’- मदनमोहन यांच्यावरील लेखही आवडला. काही अजरामर गाणी माझ्याकरता  bliss of  solitude असतात. एक छोटीशी गोष्टखटकली. लताजी आणि मदनमोहन यांची काही सुरेल गाणी होती, त्यातील एक ‘उनको ये शिकायत है ’ हे अवीट सुरावटींचे गाणे ‘उनको’ ऐवजी ‘उन्को ये..’ असं लिहिलं गेलं आहे. त्याने रसभंग होतो. प्रत्येक भाषेची लय असते, उर्दू खूप गोड व नजाकत असलेली भाषा आहे. असे रसभंगाचे प्रसंग टाळता आल्यास आनंद होईल.
अनुराधा जामदार, भोपाळ

या वर्षीपासून ‘व्हिवा’ पुरवणीत काही नवी सदरं सुरू केली होती. बघता बघता अर्ध वर्ष संपलं देखील. आजपासून काही नवीन सदरं आणि लेखक तुमच्या भेटीला येत आहेत. ती कशी वाटतात ते अवश्य कळवा. कुठले लेख भावले, पटले तेदेखील आवर्जून लिहा. त्याच्याशी निगडित तुमचे किस्से, आठवणी आमच्यापर्यंत पोचवा.
आमचा पत्ता – viva.loksatta@gmail.com किंवा viva@expressindia.com