सारंग साठय़े

टीव्ही जेव्हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट होता, तेव्हा बरा होता का?..आजच्या रंगबेरंगी आणि ‘मास प्रॉडक्शन’मध्ये गळ्यापर्यंत रुतलेल्या टीव्हीकडे पाहिलं की वाटतं. काळी-गोरी चित्रं दाखवणारा तो टेलिव्हिजन बरा होता!! फार थोडय़ा जणांकडे टीव्ही होता. म्हणून कोणाचं काही अडलेलं नव्हतं. मनोरंजनाची मैफल दर रविवारी भरणार हे नक्की असायचं. ३०० भागांचं ‘महाभारत’ बघताना कधी कंटाळा आलेला नव्हता. त्याआधी ‘रंगोली’ या मनोरंजनात भर घालायची. हे इतकं सारं जबरदस्त होतं, की कधी एकदा रविवार येतोय, असं वाटायचं. बरं रविवार सोडला इतर दिवशीही टीव्हीसमोर बसायची हौस काही कमी नव्हती. रोज सादर होणारे कार्यक्रम हे दर्जेदारच असल्याने आम्ही सारे जण मांडी ठोकूनच त्याचा आस्वाद घ्यायचोच.

१९९२ पर्यंत हे सारं असं मजेत चाललं होतं. त्यानंतर आर्थिक उदारमतवादाचे वारे भारतात शिरले आणि टीव्हीवरले ‘प्रॉडक्शन’वाले ‘कंटेन्ट’च्या चिंतेत पडले. २४ तासांतले काही तास मनोरंजन ही सुसह्य़ व्यवस्था होती. पण ‘मास प्रॉडक्शन’च्या ‘रोलर कोस्टर’वर स्वार झालेल्या निर्मात्यांनी २४ तास मनोरंजनाचा अक्षरश: भडका उडवून दिला. त्याची झळ पहिल्यांदा मालिकांना लागली. म्हणजे रात्रंदिवस प्रेक्षकांना द्यायचं काय? हे वाक्य लिहिताना मला जराही वाईट वाटणार नाही. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे लेखक (?) लिहू लागले.. लिहू लागले. एखाद्या लेखकाच्या मनात अंकुरलेला अनुभवाचा कोंब जरा कुठे दिसू लागला, पण सतत लिहिण्याच्या हव्यासाने त्यातील आशयाचे रोप त्या लेखकानेच होरपळून नाहीसे केले. मालिकांचा, कार्यक्रमांचा आणि ‘रिअ‍ॅलिटी शो’चा तर अक्षरश: कारखाना तयार झाला आहे. आज या कारखान्यांमधून फक्त वाईट तेवढंच निर्माण केलं जातंय. दहापैकी एखादा ‘शो’ जरा बघावसा वाटतो, याला काय म्हणायचं?

सकस, आरोग्याला चांगलं खाणं म्हणून कोणी ‘मॅकडोनल्ड’ वा ‘डॉमिनोज’मध्ये जाणार असतील तर ते ‘सकस’ खाणं त्यांनाच लखलाभ!! तसं नाहीय नं, तुम्हाला कसदार खायचं असेल तर ‘पिझ्झा-बर्गर’ कसा काय पर्याय ठरू शकेल? त्यासाठी एखाद्या साध्या-जुन्या, पण दर्जेदार जेवण देणाऱ्या खानावळीतच जावं लागेल. तिथं तुमची जीभ समाधान पावणार नाही, पण पोटात नक्कीच काही तरी चांगलं पडलेलं असेल. तसंच टीव्हीचंही आहे. ‘मास प्रॉडक्शन’च्या या खेळात केवळ पैसा पाहिला जात आहे. पण यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे टीव्हीपासून आजचा तरुण दुरावत चाललाय, हे आज कुणाच्याही लक्षात आलेलं नाही. कारण आज तरुणाईकडे ‘हॉटस्टार’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘नेटफ्लिक्स’वरील निवडक मालिका तो पाहतो. तर मग त्यानं टीव्हीकडे का वळावं? हेच तर टीव्हीवाल्यांना कळत नाहीय ना आणि ते त्यांना जेव्हा कळेल, तेव्हा या साऱ्यातून ते बाहेर पडतील, असं म्हणायला हरकत नाही.

कथा, पटकथा, पात्र व घटनांची एकसंधता, मग त्यावर दिग्दर्शन आणि शेवटी अभिनय. या साऱ्या प्रमुख गोष्टींना तरी तुम्ही वेळ देणार आहात की नाही? की ऊठसूट आपलं ‘प्रॉडक्शन’. आजच्या मालिकांमध्ये रोज नवनवे चेहरे येतात. त्यांना रोजरोज दाखवलं जातं आणि एक दिवस तो कलाकार कुठच्या कुठे फेकला जातो. पुन्हा तो कधी टीव्हीवर दिसत नाही. म्हणजे इतकं ‘ओव्हरएक्स्पोजर’ त्याला सुरुवातीला मिळतं. ही ‘मास प्रॉडक्शन’ची परंपरा कुठे तरी खंडीत झाली पाहिजे.

मला आताशा टीव्ही आवडेनासा झाला आहेच. म्हणजे खरं सांगतो. मी टीव्ही बघतच नाही. त्यातही स्पोर्ट्स, बातम्या आणि डिस्कव्हरी पाहण्यातच वेळ घालवतो तेवढंच. मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एका हॉटेलात टीव्ही बघत होतो. तेव्हा एक कार्यक्रम सुरू झाला. त्यात एका चेटकिणीची मुलगी एका घरात सून म्हणून जाते आणि त्या घरातील साऱ्यांचा एक एक करून बदला घेते. अत्यंत भंपक असंच सारं होतं ते. थोडक्यात काय, आता सांगण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही. पण कशातही काहीही घुसडून ‘मास प्रॉडक्शन’वाले सांगत सुटले आहेत. अत्यंत वाईट ‘मॉरल व्हॅल्यू’ टीव्हीवाले लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

पण सारंच काही वाईट चाललंय असा याचा अर्थ नाही. यातील काही बरे लोक बरंच काही दर्जेदार देत आहेत. म्हणजे त्यातल्या ‘कंटेन्ट’शी स्वत:ला ‘रिलेट’ करतात, ही त्यातली एक चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे हिंदी सिनेमा याचं एक उत्तम उदाहरण द्यावं लागेल. गेल्या वर्षी तीन खानांनी म्हणजे आमीर, सलमान आणि शाहरुख यांनी आणलेले चित्रपट धडाधड कोसळले आणि आयुष्मान खुराणा, राजकुमार राव आणि विकी कौशल यांचे सिनेमे दणदणीत चालले. याचा अर्थ असा, की दर्जा असेल तर लोक ते बघतात. म्हणूनच टीव्हीसमोर लोकांना पुन्हा बसवायचं असेल तर ‘मास प्रॉडक्शन’च्या जोखडातून टीव्हीला मुक्त करावं लागेल.

शब्दांकन : गोविंद डेगवेकर

viva@expressindia.com