13 July 2020

News Flash

टेकजागर : समाजमाध्यमांवरील प्रभावाचा भाव

रायन काजी हा जेमतेम आठ वर्षांचा मुलगा. आई व्हिएतनामी आणि वडील जपानी वंशाचे.

(संग्रहित छायाचित्र)

|| आसिफ बागवान

गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमाद्वारे उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी कंपन्यांनी ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ना हाताशी धरलं आणि म्हणता म्हणता या मंडळींचं आर्थिक विश्वच बदलून गेलं. जाहिरातींपेक्षा अशा प्रकारच्या प्रसाराचा प्रभाव जास्त पडत असल्याने कंपन्यांचा भर या ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’कडे वाढत चालला आहे.

रायन काजी हा जेमतेम आठ वर्षांचा मुलगा. आई व्हिएतनामी आणि वडील जपानी वंशाचे. कॅलिफोर्नियात जन्मलेला रायन चार वर्षांचा असताना त्याला त्याच्या आईने यूटय़ूबवरील खेळण्यांचे व्हिडीओ दाखवले. सध्याच्या कोणत्याही लहान मुलांप्रमाणे रायनही ते व्हिडीओ पाहून हरखून गेला. खेळण्यांच्या बाजारात वेगवेगळय़ा कंपन्यांकडून दाखल केल्या जाणाऱ्या खेळण्यांची सादरीकरण आणि प्रसिद्धी करणारे हे व्हिडीओ पाहून चिमुकल्या रायनने आपल्या आईला प्रश्न विचारला, ‘मी कसा यूटय़ूबवर नाही?’. रायनचा हा बालसुलभ प्रश्न त्याच्या आईने भलताच गांभीर्याने घेतला आणि एका हायस्कूलमधील शिक्षिकेची नोकरी सोडून तिने चक्क रायनच्या व्हिडीओंचे यूटय़ूब चॅनेल चालवण्याचा निर्णय घेतला. रायनचे विविध खेळणी हाताळतानाचे व्हिडीओ या चॅनेलवरून प्रसारित होऊ लागले आणि म्हणता म्हणता या व्हिडीओंचा प्रेक्षकवर्ग वाढत गेला. आठ वर्षांचा रायन काजी आज ऑनलाइन आणि सोशल मीडिया जगतातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये आघाडीवर आहे. रायनच्या व्हिडीओंना आतापर्यंत ३५ अब्जाहून अधिक ‘व्ह्य़ूज’ आहेत. बरं हे सगळं केवळ प्रसिद्धीपुरतंच मर्यादित नाही तर, वॉलमार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या मोठमोठय़ा कंपन्या रायनने त्यांची नवीन खेळणी उत्पादने हाताळून त्यांचे परीक्षण करणारे व्हिडीओ प्रसारित करावेत, म्हणून झटत असतात. त्या कंपन्यांसोबतच्या करारापोटी गेल्या वर्षी, २०१८मध्ये रायनने तब्बल सव्वा दोन कोटी डॉलरची कमाई केली आहे. यूटय़ूबवरील सर्वाधिक कमाई करणारा ‘व्लॉगर’ (व्हिडीओ ब्लॉगर) म्हणून गेल्या वर्षी रायनची नोंद झाली आहे. हे कमी म्हणून की काय, याच वर्षी रायनने स्वत:च्या नावाची टूथपेस्ट आणि टूथब्रश अमेरिकेच्या बाजारपेठेत आणलं आहे. हे सगळं वयाच्या फक्त आठव्या वर्षी!

रायन काजीची ही यशोगाथा आपल्यापैकी अनेकांना स्वप्नवत वाटत असेल. पण सोशल मीडियावरील अस्तित्वाद्वारे सेलिब्रिटी बनलेला रायन काजी हा काही एकमेव नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूब, ट्विटर, टिकटॉक अशा वेगवेगळय़ा समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरून रातोरात प्रसिद्ध झालेले अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियातील सेलिब्रिटी अशी त्यांची सर्वसाधारण ओळख असली तरी, व्यावसायिक भाषेत त्यांना ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ म्हटले जाते. रायन काजी हाही असाच एक ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’.

समाजमाध्यमे ही आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यमे आहेत. कोणताही राजकीय मुद्दा असो की सामाजिक चळवळ किंवा अगदी कुणाचे व्यक्तिगत मतप्रदर्शन असो, समाजमाध्यमांवरून प्रसारित होणारी प्रत्येक पोस्ट वापरकर्त्यांवर छाप सोडून जाते. पण एकाच वेळी हजारो, लाखो, करोडो वापरकर्त्यांवर छाप सोडण्याइतका प्रभाव क्वचितच काही व्यक्तींमध्ये असतो. सर्वसाधारणपणे नेते, अभिनेते आणि वेगवेगळय़ा क्षेत्रांतील नामांकित मंडळी ही लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे असा प्रभाव पाडत असतात. परंतु, यातली कोणतीही पाश्र्वभूमी नसताना केवळ एखादा व्हिडीओ, एखादे छायाचित्र किंवा एखाद्या पोस्टमधून काही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि रातोरात त्यांना एक वलय प्राप्त होते. त्या लोकप्रियतेच्या जोरावर ही मंडळी तशाच धाटणीच्या पोस्टमधून आपलं अस्तित्व विस्तारत जातात. त्यातून त्यांची लोकप्रियता झपाटय़ाने विस्तारत जाते आणि सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॅन/ फॉलोअर्स निर्माण होतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. केवळ भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ‘प्लस साइज’ कपडय़ांची फॅशन आयकॉन बनलेली नितिका भाटिया व्हिग, ऐतिहासिक वारसास्थळांची ऑनलाइन सफर घडवून आणणारा अमोल गोयल, कविता-गोष्टी किंवा भाषणांतून लाखोंची मने जिंकणारा रिषभ कोहली अशी इन्स्टाग्रामवरील ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ची काही उदाहरणे.

समाजमाध्यमांवर एखादा चेहरा असा प्रसिद्धीच्या झोतात येताच जाहिरात कंपन्या, उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची त्यांच्यावर लगेच नजर पडते. आपल्या उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी या कंपन्या अशा चेहऱ्यांच्या शोधात असतात, ज्यांचे अनुकरण लाखो लोक करत असतात. मग पर्यटनस्थळांची सफर करणाऱ्या एखाद्या ‘व्लॉगर’ला आपल्या कंपनीच्या पर्यटन पॅकेजेसची माहिती देण्यासाठी या कंपन्या आर्थिक मोबदला देऊ करतात. प्लस साइज कपडय़ांची फॅशन आयकॉन अशा प्रकारचे कपडे बनवणाऱ्या ब्रॅण्डचा प्रसार करणारी बनते. हे सगळं जाहिरातींसारखंच. फक्त ती जाहिरात म्हणून मांडली जात नाही. संबंधित व्यक्ती खरोखरच ती उत्पादने वापरते, असे भासवण्याचा प्रयत्न त्यातून केला जातो. जाहिरातींपेक्षा अशा प्रकारच्या प्रसाराचा प्रभाव जास्त पडत असल्याने कंपन्यांचा भर या ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’कडे वाढत चालला आहे.

गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमाद्वारे उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी कंपन्यांनी ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ना हाताशी धरलं आणि म्हणता म्हणता या मंडळींचं आर्थिक विश्वच बदलून गेलं. हा बदल किती लक्षणीय आहे हे सांगणारा एक अहवाल अलीकडेच ‘आयजिया’ नावाच्या एका विपणन विश्लेषक संस्थेने प्रसिद्ध केला. या कंपनीच्या पाहणीनुसार २०१४ ते २०१९ या काळात इन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल बारा पटींची वाढ झाली आहे. २०१४मध्ये इन्स्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सरच्या एका फोटोसाठी साधारण १३४ डॉलर मिळत होते. यात वाढ होऊन आता सरासरी एका फोटोसाठी एका इन्फ्लुएन्सरला तब्बल १६२१ डॉलर अर्थात जवळपास लाखभर रुपये मिळतात. गेल्या वर्षांशीच तुलना करायची म्हटलं तर, अशा मोबदल्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक आर्थिक मोबदला यूटय़ूबवरून व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या रायन काजीसारख्या इन्फ्लुएन्सरना मिळतो. यूटय़ूबरील एका व्हिडीओसाठी आजघडीला जवळपास सात हजार डॉलर इतका मोबदला मिळत आहे. रुपयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही रक्कम जवळपास पाच लाख रुपये इतकी भरते. फेसबुकवरील साध्या स्टेटस अपडेटला २०१४मध्ये आठ डॉलर मिळत होते. मात्र, आता या मंडळींना एका छोटय़ाशा अपडेटसाठी ३९५ डॉलर मिळतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या आर्थिक कमाईचे चित्र दाखवण्यासाठी या नोंदी पुरेशा आहेत.

अर्थात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणं, हे तितकं साधंसोपं काम नाही. एखाददुसऱ्या पोस्टने प्रसिद्धीचे शिखर गाठणारा अपवादाने एखादाच असतो. विशेषत: सध्या हे क्षेत्र इतकं स्पर्धात्मक झालं असताना तुम्हाला कोणत्या तरी एका क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवावं लागतं. केवळ दाखवावंच लागतं असं नव्हे तर, आपल्या स्पर्धकांपेक्षा अधिक उजवं ठरेल असं सादरीकरणही करावं लागतं. यासाठी अंगभूत गुण आवश्यक आहेत. पण नशिबाचा भागही आहेच. सोशल मीडियाचे सेलिब्रिटी बनल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रग्गड पैसा कमावता येईल, असा विचार करून या क्षेत्रात उतरणारे अनेक असतात. निव्वळ अर्थार्जन हा त्यांचा हेतू असतो. यातील काही जण मग चाहत्यांना खरेदी करू लागतात. म्हणजे, आपल्याला अधिकाधिक लोकांनी फॉलो करावं किंवा ‘लाइक’ करावं यासाठी ते पैसा मोजतात. या मंडळींना क्वचित यश मिळतंही. पण त्यांचा ‘भाव’ कायम राहण्याची शाश्वती नसते.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 3:12 am

Web Title: social media social media publicity video blogger twitter facebook instagram youtube akp 94
Next Stories
1 ‘इंटिरिअरवरही तत्त्वज्ञानाचा प्रभाव’
2 जगाच्या पाटीवर : अभ्यास  आहारशास्त्राचा
3 अराऊंड द फॅशन : फुलाफुलांच्या  बांधून माळा..
Just Now!
X