vv12सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
अरुणाच्या वेदनेची गोष्ट
४२ वर्षांची वेदना, इच्छाशक्ती नि संवेदनेची गोष्ट संपली. केईएम हॉस्पिटलमधील अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची गोष्ट त्यांच्या मृत्यूमुळं पुन्हा एकदा उगाळली गेली. त्याचनिमित्तानं दयामरणाचा मुद्दा, बलात्कार करणाऱ्यांना होणारी शिक्षा, माणुसकी, आपुलकी नि निस्सीम सेवा-शुश्रूषेचा परिपाठ, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून झालेला वाद, त्या अपराध्याचं पुढं काय झालं आणि या प्रश्नाकडं पाहायची सामाजिक मानसिकता आदी मुद्दे सोशल मीडियावर चर्चेत होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की #अरुणा शानबाग हा हॅशटॅग अव्वल स्थानी होता. या बातमीच्या आदल्याच दिवशी मॉडेल शिखा जोशीच्या आत्महत्येची बातमी आली आणि तिचे शेवटचे शब्द मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेले सापडले. तिच्या रूम मेटनं हे कृत्य केलं. रुग्णालयात नेण्यापूर्वी असं चित्रीकरण करण्यामागच्या मानसिकतेची, असंवेदनशीलतेची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू होती.
 
#आस्क एसआरके
  ट्विटरवर अद्यापही आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारा एसआरके अर्थात शाहरुख खानला काही ना काही निमित्तानं चर्चेत राहायला आवडत असावं. म्हणूनच #आस्कएसआरके या हॅशटॅगनं ट्विटरवर अव्वल स्थान पटकावलं असावं. त्याच्यावर त्याच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला होता. त्याचे चित्रपट, त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचं ठिकाण कोणतं आहे, आदी प्रश्न त्यात होते. या बॉलीवूडच्या बादशहानं (आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या को-ओनरनं) २०१२नंतर पहिल्यांदाच मुंबईतल्या स्टेडियममध्ये जाऊन स्वत:च्या संघाचा सामना पाहिला, या घटनेवर सर्वाधिक कमेंट नि फोटो अपलोड केले गेले. वानखेडेवरचा वादग्रस्त प्रसंग नि त्यानंतरची बंदी ही घटनेची पाश्र्वभूमी होती.   
#महाराणा प्रताप
आपल्याकडं कोणती ऐतिहासिक व्यक्ती कधी नि कोणत्या निमित्तानं चर्चेत येईल, ते सांगता येणं कठीण आहे. प्रतापगड इथं महाराणा प्रताप यांच्या मूर्तीचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या वेळी त्यांनी मुघलसम्राट बादशहा अकबर यांना महान असं संबोधण्यात येत असेल, तर महाराणा प्रताप यांनाही महान ठरविण्यात अडचण का येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. इतिहासात योग्य ते बदल करण्याची गरज आहे. महाराणा प्रताप हे महान होते आणि आपण मनुष्यबळ मंत्रालयाला सीबीएसई अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्यावरील धडय़ाचा समावेश करण्याची मागणी करणार. महाराणा प्रताप यांची ४७५वी जयंती देशभरात साजरी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावरून #महाराणा प्रताप आणि #राजनाथ सिंह हे हॅशटॅग ट्रेण्डमध्ये होते. या संदर्भात नेटकरांनी महाराणा प्रताप यांच्या आठवणींना, कथांना उजाळा दिला. तर काही अतिउत्साहींनी थेट सोनी वाहिनीवरील महाराणा प्रताप या मालिकेतील फोटो अपलोड केले.

का धरिला परदेस..
viva16पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यादरम्यान चीनशी झालेले करारमदार आणि एकूणच पराराष्ट्रनीती आदी मुद्दय़ांखेरीज ट्विटर, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली-केकियांग यांच्यासोबत काढलेल्या सेल्फीची. वॉल स्ट्रीट जर्नलनं या सेल्फीला पश्चिमी देशातल्या माध्यमांमधला सर्वात शक्तिशाली सेल्फी म्हटलंय. त्याखेरीज मोदींच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य करणारे अनेक मेसेज, फोटोज व्हायरल होताहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्तानं अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. #नमोव्हिक्टरीडे हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर होता. खुद्द मोदींनी याच संदर्भात ट्वीट केलं. शिवाय सोशल मीडियावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या यशापयशाचीही चर्चा झाली. पाठोपाठ मोदींचा मंगोलिया नि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यांचे पडसादही ट्विटर, फेसबुकवर उमटलेत. एकुणातच सध्या मोदींचा परदेश दौरा हा अव्वल ट्रेण्डिंगचा विषय ठरलाय.

 आराध्याचं अनुकरण
viva17आराध्या अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्यानं आईचं अनुकरण केलेलं दिसतंय. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या पाया पडली. ते पाहून आराध्याही आपल्या आजोबांच्या म्हणजेच ऐश्वर्याच्या वडिलांच्या पाया पडली. कृष्णराज राय ऐश्वर्या आणि आराध्याला विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. या प्रसंगाचं चित्रण विमानतळावर उपस्थितांनी केलं आणि आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. ऐश्वर्या हिरव्या रंगाचा गाऊन घालून कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. त्याअगोदर मुलगी आराध्या आपल्या आईकडे कशी कौतुकानं बघत होती, हा फोटोही उत्साही ऐश्वर्याच्या फॅन्सनी भराभर शेअर केलाय. त्यामुळे हा फोटोही बराच व्हायरल झालाय.
 
एआयबीचं ऑनेस्ट वेडिंग
viva18तरुणाईमध्ये बहुतांशी वेळा लोकप्रिय ठरलेल्या ‘एआयबी’च्या व्हिडीओज्पैकी आणखी एक नवा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. भारतीय लग्न-परंपरेवर विनोदी आणि उपरोधिक शैलीत भाष्य करण्यात आलंय. कांदे-पोहय़ांच्या अर्थात मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्न लागेपर्यंतचे किस्से यात दाखवले गेलेत. आपल्याकडच्या लग्नसोहळ्यातला खर्चीक नि भपकेबाजपणा, दोन्ही घरच्यांची मानसिकता, आर्थिक गणितं, भोवताली वावरणाऱ्यांचीच टीकाटिप्पणी हे सगळं या स्टॅण्डअप कॉमेडियन्सनी एआयबी स्टाइलमध्ये मांडलंय. २ दिवसांत या व्हिडीओला १,१६४,७५० व्हय़ूज मिळाले.

क्वांटिकोमय प्रियंका
बॉलीवूडमधली गुणी अभिनेत्री म्हणून नावाजलेली गेलेली प्रियंका चोप्रा लवकरच ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजन सीरियलमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणारेय. प्रियंकानं क्वांटिकोत एका एफबीआय एजंट- अ‍ॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारलेय. व्हर्जिनियामधील क्वांटिकोमध्ये प्रशिक्षणादरम्यान आपलं ध्येयं गाठण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एफबीआय सदस्यांभोवती या मालिकेचं कथानक आधारलेय. स्वत: प्रियंका चोप्रानंच ट्विटवर याचा ट्रेलर अपलोड करून ही माहिती दिलेय. या ट्रेलरला अपलोड केल्यावर दिवसभरात ७०,१२३ व्हय़ूज मिळाले होते.  

स्टिव्ह जॉब्जवर फिल्म
जगभरातील तरुणाईचा यूथ आयकॉन ठरलेल्या स्टिव्ह जॉब्जवरील फिल्मचा फर्स्ट लुक रिलीज झालाय. अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड विजेता डॅनी बॉयलने दिग्दर्शित केलेल्या आणि अ‍ॅरोन सोरकिनलिखित या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेल्येय. ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटाच्या फर्स्ट टीझरला यूटय़ूबवर एका दिवसात १,३३७,९२७ वूाज मिळालेत.

पिकासोची चित्रकारी
#पाब्लो पिकासो हा हॅशटॅग चर्चेत आला तो १७.९४ कोटी डॉलर कलाकृतीच्या लिलावामुळं. विमेन ऑफ अल्जियर्स या नावानं ओळखलं जाणाऱ्या प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोच्या या चित्रावर चित्रकार युजिन देलाक्रॉइक्स यांचा प्रभाव दिसत असल्याचं मानलं जातं. या चित्राच्या विक्रीमुळं एक नवा उच्चांक प्रस्थापित झालेला दिसतोय. त्यापाठोपाठ अल्बर्ट जियाकोमेत्ती या ख्यातनाम शिल्पकाराचं ‘पॉइंटिंग मॅन’ हे शिल्प १४.१२ कोटी डॉलर या विक्रमी किमतीत विकलं गेलं. लुकिंग फॉरवर्ड टू द पास्ट या लिलावासाठीच्या कार्यक्रमात विसाव्या शतकातील कलाकृतींचा लिलाव केला गेला. त्यानिमत्तानं सोशल मीडियावर या चित्रांची, त्यांच्या लिलावाची नि कलाकारांबद्दलची चर्चा रंगली होती. कोण हा पिकासोपासून ते चित्राच्या किमती ठरवण्याच्या प्रोसेसपर्यंत अनेक मुद्दे या चर्चेत रंगले.  
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com