|| वेदवती चिपळूणकर

लहानपणापासून ती कोकणातच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यत आकेरी या गावी ती मोठी झाली, जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने शिक्षण घेतलं आणि टिळकांच्या कॉलेजमध्ये जायचं म्हणून ती पुण्याला गेली. पुण्यात यूपीएससी करायच्या विचाराने तिने अभ्यास करायला सुरुवात केली. ‘चाणक्य मंडल परिवारा’शी तिने स्वत:ला जोडून घेतलं. मात्र यूपीएससी करतानाही तिचा कल फोटोग्राफीकडेच होता. त्याच फोटोग्राफीच्या वेडाने तिला पुन्हा कोकणात नेलं. कोणतीही स्पर्धा परीक्षा न देता फोटोग्राफीतच काहीतरी करायचा निर्णय तिने घेतला आणि तिच्या कामाला सुरुवात झाली. कोकणातील गावातून फ्रान्समधील ‘कान चित्रपट महोत्सवा’पर्यंत मजल मारणारी ही मुलगी म्हणजे मानसी देवधर.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

कोकणातील गावात मोठं होत असताना आलेल्या अनुभवांबद्दल मानसी म्हणते, ‘अशा विशेष कोणी मित्र-मैत्रिणी मला कधीच नव्हत्या. घरी टीव्ही नव्हता. जुन्या कॅसेट ऐकायला कॅसेट प्लेअर मात्र होता. त्यामुळे पुलं कायम कानावर पडायचे, पण त्यातही गावात आठवडय़ातले तीन दिवस इलेक्ट्रिसिटी नसायची. त्यामुळे तेव्हा कॅ सेट किंवा रेडिओचा काहीच उपयोग नसायचा. अशा वेळी वेळ घालवायला फक्त पुस्तकं सोबत होती. पुस्तकंच माझं मनोरंजनही करायची आणि पुस्तकंच मला घडवतही होती. पुस्तकं वाचताना आपल्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर होतो. पुस्तक कोणतीच गोष्ट आपल्याला थेट भरवत नाही, तर ते आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे त्याचा विस्तार करायला भाग पाडतं. त्यामुळे पुस्तकातली पात्रं आपल्याशी बोलायला लागतात, आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवतं आणि वाचत असलेली प्रत्येक गोष्ट आपण डोळ्यांसमोर उभी करायला सुरुवात करतो. त्यामुळे आपोआपच कल्पनाशक्ती विकसित व्हायला मदत होते. कोकणातल्या एका गावात राहिल्यामुळे मला याचा खूप अनुभव मिळाला आणि स्वत:च्या क्षमतांना चॅलेंज करायची संधीही मिळत राहिली.’ लहानपणापासून पुस्तकं वाचत आल्याने हळूहळू तिच्या वाचनाचा आवाका वाढला. पुस्तकांशीच तिने घट्ट मैत्री केलेली असल्याने मानसीला वेगळं कधी कोणात मिसळायची गरजही भासली नाही. पुस्तकांनी तिच्या जाणिवा प्रगल्भ करायला मदत केली, उघडय़ा डोळ्यांनी जग बघायला शिकवलं.

टिळक शिकले त्या कॉलेजमध्ये जायचं असं मानसीने ठरवलं होतं. त्यामुळे दहावीला तिने कसून अभ्यास केला आणि पुण्याला फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजसाठी ती पुण्यात गेली, मात्र कोकण कायमच तिच्या डोक्यात ठाण मांडून बसलेलं असायचं. पुण्यातल्या शहरी वातावरणात तिला कोकणचा निसर्ग आणि आपलेपणा आठवत होता. तिच्याकडे असलेल्या अफाट वाचनामुळे बाकी कोणत्याच शहरी गोष्टीत तिचं मन रमत नव्हतं. तरीही एका बाजूला स्पर्धा परीक्षा देण्याच्या विचाराने ती चाणक्य मंडल परिवाराची एक सदस्य झाली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी म्हणून पुण्यातच येऊन राहायचा निर्णयही तिचा जवळ जवळ पक्का झाला होता. ‘मधल्या काळात उमेश कुलकर्णी सरांचं दोन दिवसांचं वर्कशॉप मी केलं. माझ्या फोटोग्राफीमध्ये मला जाणवत असलेल्या मर्यादा पार करून गोष्ट सांगण्याची माझी इच्छा चित्रपट या माध्यमातून पूर्ण होऊ  शकेल हे तेव्हा मला जाणवलं,’ मानसी सांगते. तिचं वाचन, फोटोग्राफीकडे असणारा कल आणि प्रत्येक प्रसंगात ‘कॅमेऱ्याची फ्रेम’ शोधण्याचं तिचं वेड ओळखून अविनाश धर्माधिकारी सरांनी तिला हा अभ्यास सोडून ‘तुझी दिशा क्रिएटिव्ह आहे, त्यातच प्रयत्न करून पुढे जाशील’, असं सांगितलं. त्यानंतर मात्र तिने स्पर्धा परीक्षेचा विचारच सोडून दिला. पुण्याहून फग्र्युसन सोडून ती तिच्या गावी परत गेली. ‘कोकणात आल्यावर मला कोणतीही कथा चित्रस्वरूपात लिहून काढायचा छंदच जडला होता. कोणतीही गोष्ट कॅमेऱ्यात कशी दिसेल हेच माझ्या डोक्यात सतत सुरू असायचं,’ मानसी म्हणते.

एक वेळ अशी आली की तिच्या आईबाबांनी तिला करिअरबद्दल विचारलं. त्या क्षणाबद्दल सांगताना मानसी म्हणते, ‘एकदा बाबाने मला जरासं रागावूनच विचारलं की आयुष्यभर हेच करणार आहेस का! त्यावेळी मी अगदी सहजपणे हो म्हटलं. तेव्हा माझ्या आणि आईबाबांच्याही लक्षात आलं की मी हे खरंच आयुष्यभर करू शकते. मी सीरियसली उत्तर दिल्यावर आईबाबांनीही ‘करून तर बघ’ असं म्हणून प्रोत्साहन दिलं. त्या दोघांच्या पाठिंब्याशिवाय एवढं मोठं पाऊल उचलणं मला शक्य नव्हतं. कोणताही मोठा निर्णय घेताना आईबाबांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. त्यांच्या खंबीर असण्याने बाकीच्या जगाला तोंड द्यायला आपण तयार होतो आणि त्यासाठी आपल्याला बळ मिळतं,’ असं मानसी सांगते. माझ्या पहिल्या शॉर्टफिल्मला त्यांनी फायनान्स करायची तयारी दाखवली. आमचा या क्षेत्रावर फारसा विश्वास नसला तरी आमचा आमच्या मुलीवर आणि आमच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, या त्यांच्या भूमिकेने मला प्रचंड धीर मिळाला आणि माझ्या मनाची तयारी पूर्ण झाली. आत्मविश्वसाने एखादी गोष्ट करायला घेणं आणि त्यात आपले आईबाबा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणं ही खूप मोलाची गोष्ट माझ्याकडे होती. त्यामुळे माझं संपूर्ण लक्ष मला माझ्या कामात देता आलं, असं तिने सांगितलं. मानसीच्या सगळ्या कामात तिच्या घरच्यांनी आपापल्या परीने वाटा उचलला आणि तिला सर्वतोपरी मदत केली. लोकेशन शोधण्यापासून ते घरालाच लोकेशन बनवण्यापर्यंत सगळ्या कामात तिच्या बरोबरीने सगळ्यांनी मेहनत घेतली.

तिच्या पहिल्या शॉर्टफिल्म ‘चाफा’बद्दल बोलताना मानसी म्हणते, ‘कोकणातला एलिमेंट दिसेल असं काही मला करायचं होतं. माझं कोकण अतिशय सुंदर आणि बोलकं आहे. प्रत्येक वेळी ते स्वत:च काही गोष्टी सांगत राहतं, थीम्स देत राहतं. ‘चाफा’ ही सायलेंट फिल्म आहे. एकही संवाद नसताना सुगंध मला माझ्या कामातून समोरच्याला पडद्यावर जाणवून द्यायचा होता. काम खरंच कठीण होतं. मात्र माझ्या कामातला बराचसा भार कोकणच्या निसर्गाने कमी केला होता. संधीप्रकाश दाखवण्यापासून ते लँडस्केपमधून गोष्ट सांगण्यापर्यंत बरीचशी मेहनत कोकणाने जणू स्वत:च माझ्यासाठी घेतली होती.’ एखाद्या संवेदनेची आपल्याला झालेली जाणीव आपलं अख्खं आयुष्य बदलू शकते हा ‘चाफा’चा गाभा होता. पुण्यात एका स्क्रीनिंगच्या वेळी आयुष्याची सत्तर वर्षपुण्यात काढलेल्या मात्र मूळच्या कोकणच्या असलेल्या एका आजींनी ‘तुझ्यामुळे पुन्हा कोकणची आठवण झाली’ म्हणून मायेने जवळ घेतलं तेव्हाच्या भावना व्यक्त करायला मानसीला शब्द सापडत नाहीत.

आपली कथा बघणाऱ्यापर्यंत पोहोचली म्हणजे आपल्या कामाची पावती मिळाली हे गणित असणाऱ्या मानसीला ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या क्युरेटरना ‘चाफा’ दाखवताना स्वत:च्या कामाबद्दल किंचितही शंका वाटली नाही. स्वत:च्या खंबीरपणातून मिळवलेल्या या आत्मविश्वासाच्या बळावर तिची नवीन शॉर्टफिल्म ‘भैरु’ तयार झाली आणि तिनेही ठिकठिकाणी प्रेक्षकांची पसंती मिळवलेली आहे. कोकण ते कान अशी मोठी झेप वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी घेणारी अनेकींचा प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही !

‘कर के देखो या एका लाइनवर मी माझ्या आवडीचं काम करायला सुरुवात केली. आपण करून पाहत नाही तोपर्यंत आपली आवड आणि आपल्या क्षमता यांच्याबद्दल आपण पूर्ण एक्सप्लोर करूच शकत नाही. आपल्याला ज्याची आवड आहे त्याची स्किल्स आपल्याकडे प्रत्येक वेळी असतीलच असं नसलं तरी ती डेव्हलप करता येतात. त्या दिशेने प्रयत्न केल्याशिवाय आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापरच होणार नाही.’   – मानसी देवधर