|| डॉ. शेखर चिंतामणी मांडे

भारत हा महासत्ता होणार म्हणजे काय होणार? २०२० सालापर्यंत भारत जगातील आणखी एक महासत्ता म्हणून उदयास आलेला असेल काय? या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे कारण एकच, की भारतीय पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य नेमके काय होते आणि ते  कशासाठी आखले गेले. याशिवाय भारत महासत्ता होण्यासाठीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्र ती दिशा मिळवू शकले आहे का? या साऱ्या प्रश्नांचे उत्तर हो किंवा नाही, असे एकाच पठडीत देता येणार नाही.

असे चित्र निर्माण होणे आणि ते स्पष्ट होणे यात आज तरी फरक आहे. पण गेल्या ६० वर्षांतील भारताची प्रगती पाहिली तर असे दिसते, की देशाची गरिबी हटविण्यात आपल्याला यश आले आहे. देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत लोकांना गरिबीतून बाहेर काढता आले आहे. म्हणजे समाजातील सर्वात खालच्या स्तरातील श्रमजीवी लोकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती. ती अलीकडे मिटल्याचे चित्र आहे. विविध क्षेत्रांत रोजगार वाढीस लागला. त्यामुळे किमान सुखसोयींपासून जे वंचित त्यांच्या हाती काही प्रमाणात आर्थिक स्वावलंबन आले आहे. हा भारताच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे.

दुसरी गोष्ट आहे रोजगाराची. नवउद्यमी अर्थात ‘स्टार्ट-अप’च्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत आहे. आणि भविष्यात रोजगार निर्मितीसाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणून स्टार्ट-अपकडे पाहावे लागेल. कारण नवउद्यमीतून तरुणांना संधींचे नवे क्षितिज निर्माण झाले आहे. म्हणजे त्यांना जे हवं ते करण्याचं माध्यम निर्माण झालं आहे. कारण त्यांना जे करणं शक्य आहे, ते करण्यासाठीचे व्यासपीठ येथे मिळालं आहे. त्यांनी त्यांच्या कौशल्याचा वापर यातून करावा. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचे तर नवउद्यमी म्हणून एका तरुणाने उद्योग सुरू केला तर त्यातून आणखी ५० जणांना त्यात रोजगार मिळू शकतो. याचा अर्थ असा आहे की येत्या काळात शिकून बाहेर पडणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतातील विविध टप्प्यांवरील आर्थिक सुधारणांचा विचार करताना तंत्रज्ञान क्षेत्रात आपण खूपच मोठी झेप घेतली आहे. याशिवाय अवकाश विज्ञानातील आपली गरुडझेप साऱ्या जगाला चकित करणारी आहे. २२ जुलै रोजी आपले चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. ही आपली सर्वात मोठी किमया म्हणावी लागेल. अत्यंत कमी खर्चात देशी तंत्रज्ञानाच्या जोरावर ही झेप आपण घेतली आहे. अर्थात हा सारा खर्च अमेरिका जितका खर्च करते, त्याच्या एक-तृतीयांश इतका आहे.

भारत महासत्ता म्हणून उभा राहत असताना त्याचा प्रवास कुठून कुठवर झाला आहे, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणजे ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर भारताची आर्थिक स्थिती हलाखीची होती. ती सारी उणीव भरून काढत आपण आज महासत्तांच्या पंगतीत बसण्यासाठी सज्ज आहोत. यासाठी अजून काही काळ जाईलच, खेरीज देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता भरून काढणे हे सर्वासमोरचे मोठे आव्हान असेल.

महासंचालक, कॉन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च भविष्यात रोजगार निर्मितीसाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणून स्टार्ट-अपकडे पाहावे लागेल. कारण नवउद्यमीतून तरुणांना संधींचे नवे क्षितिज निर्माण झाले आहे.