|| मितेश रतिश जोशी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना रोज वेगवेगळे अंकुर फुटत आहेत. भारतात जवळपास ७० टक्के लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. या कष्टकरी क्षेत्रात तरुण-तरुणींचा वावर वाढतो आहे. तो नेमका कसा आणि त्यामागची त्यांची प्रेरणा जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
ग्रामविकासाची कहाणी

एका उक्तीनुसार ‘आयुष्यात वकील, डॉक्टरची गरज क्वचित जाणवेल, पण शेतकऱ्याची गरज दिवसातून तीन वेळा जाणवल्याशिवाय राहणार नाही’. शेती हे तसं शारीरिक कष्टाचं क्षेत्र आहेच, पण या क्षेत्रावर कायम तोटय़ाची तलवार टांगलेली असते. अचानक उभ्या राहणाऱ्या समस्यांना फार जिद्दीने तोंड द्यावं लागतं. नैसर्गिक घटकांचा वापर करून उत्पादन काढणारा शेतकरी याच जोरावर आर्थिक घडी उत्तम बसवू शकतो, मात्र त्यासाठी काय-काय बदल के ले पाहिजेत, शेती कशी समजून घेतली पाहिजे, याचा अभ्यास करून शेतीलाच आपले उदरनिर्वाहाचे साधन बनवणाऱ्या तरुण मंडळींचा टक्का वाढतो आहे. कुतूहलापोटी शेतीकडे वळलेला आणि आता मातीतच रमलेली अशी अनेक तरुण मनं आजूबाजूला पाहायला मिळतात.

बाजारात मिळणारा भाजीपाला घातक केमिकल्स वापरून पिकवतात. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतातच. यासाठी आपणच कुठेतरी छोटंसं शेत पिकवावं, निरोगी अन्न खावं व इतरांना यासाठी प्रवृत्त करावं म्हणून सुरभी वालावलकर ही तरुणी शेतीकडे वळली. ठाण्यातील ‘पर्यावरण दक्षता मंडळ’ ही संस्था गेले १० वर्ष सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्यरत आहे. त्यात सुरभी डिसेंबर २०१७ मध्ये सहभागी झाली. सध्या कळव्यातील ‘छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालया’च्या मागे संस्थेची छोटी जागा आहे. तिथे सेंद्रिय शेतीचे बरेचसे प्रयोग चालतात. रोज खाल्ल्या जाणाऱ्या पालेभाज्या म्हणजेच मेथी, पालक, लाल माठ, हिरवा माठ तसेच काकडी, दुधी भोपळा यांसारखी वेलवर्गीय फळांची शेती सुरभी करते. खायच्या पानांचे वेल व मिरीचा वेलही इथे आहे. छोटय़ा ट्रेमध्ये केलेली शेती, ओल्या कचऱ्यापासून तयार झालेल्या खताचा वापर इथे पाहायला मिळतो. या प्रकल्पासाठी कार्यरत असलेल्या दामू नामदास यांच्या शेतीतील अनुभवाचा सुरभीला वेळोवेळी उपयोग होतो. त्यांचे अनुभव, सुरभीचा अभ्यास आणि संस्थेशी संलग्न असलेल्या शेतीतज्ज्ञांचा येथे नवनवे प्रयोग यशस्वी करण्यात अत्यंत मोलाचा वाटा आहे.

रायगडची रसिका अनिल फाटक ही बावीस वर्षांची तरुणीही शेतीत वेगवेगळे प्रयोग करते आहे. घरची हलाखीची परिस्थिति असल्याने कमवा-शिका पद्धतीने तिने ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’तून कृषी पदविका घेतली. रायगड जिल्ह्य़ातील सुधागड, रोहा, माणगाव आणि खालापूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन, भातपिकांचे उत्पादन, गांडूळखत उत्पादन तसेच सेंद्रिय शेतीविषयी प्रत्यक्ष सल्ला देण्याच्या कामामध्ये तिचा सक्रिय सहभाग आहे. आतापर्यंत सुमारे ७५ शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन आणि १८० शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे कृषीसल्ला प्रदानाचे काम तिने केले आहे. वृक्षलागवड व वनसंवर्धन, पाणी अडवा-पाणी जिरवा, शेडनेट, पॉलीहाऊस मल्चिंग पेपरवरील विविध पिकं, सेंद्रिय शेती, गांडूळखत निर्मिती असे नाना उपक्रम ती शेतकऱ्यांसाठी आयोजित करते. रसिका स्वत: काकडी, भात आणि कडधान्यांची शेती करते. सुधागड तालुक्यातील धोंडसे गाव रसायनमुक्त करण्याचा संकल्प करून कामाला लागलेल्या रसिकाने नुकताच दिल्लीतील सेंद्रिय शेत अभ्यासदौराही पूर्ण केला.

कोकणातील तरुण मोठय़ा प्रमाणावर मुंबई आणि गोव्यासारख्या शहरांकडे वळला आहे. तेथील शेतजमिनी, खासगी जंगले विकासाच्या नावाखाली विकली जात आहेत. जागतिक तापमान वाढ, बदलते ऋतुचक्र, वन्य-प्राणी पीक नुकसानी, कामगारांची कमतरता, वाढती मजुरी, पाणीप्रश्न, बाजारभावाची अशाश्वतता असे अनेक प्रश्न समोर उभे असताना कृषीक्षेत्रातील शाश्वत आर्थिक विकासाच्या पुस्तकी संकल्पना जमिनीवर आणायला हव्यात. यासाठी पारंपरिक बांबू शेतीचा अभ्यास करणे गरजेचे वाटले म्हणून कुडाळचा मिलिंद पाटील हा तरुण बांबूची शेती करतो. कोकणातील इतर पिकांच्या अर्थकारणाचा तौलनिक अभ्यास केल्यावर त्याच्या असे लक्षात आले की, आंबा, काजूसारख्या नगदी पिकांपेक्षा पारंपरिक बांबू लागवडीतून प्रति एकर दीड ते दोन लाख रुपये आर्थिक नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांना गुणवंत बांबू रोपे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सन २०१४-१५ मध्ये मिलिंदने स्वत:ची बांबू रोपवाटिका सुरू केली. शेतकऱ्यांना बांबू लागवड मार्गदर्शन आणि बांबू रोपनिर्मितीचे प्रशिक्षण कार्यक्रमही त्याने सुरू केले आहेत. ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’  (UNDP)अंतर्गत ‘ग्रीन क्लायमेट फं डा’साठीच्या (GCF) प्राथमिक अहवालात कोकणातील कृषी क्षेत्राचे अर्थशास्त्र मांडण्याची संधी मिलिंदला मिळाली. गेली दोन वर्षे कोकणातील स्थानिक फणस, कोकम व जांभूळ या पिकांवर तसेच कोकणातील पारंपरिक ‘होम गार्डन’ या पीकपद्धतीवर त्याचा विशेष अभ्यास सुरू आहे. आजच्या तरुण मुलांचा या क्षेत्रातील वावर नेमका कसा आहे, याबद्दल तो म्हणतो, ‘तरुण पिढीने कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळण्याची गरज आहे. लहान वयात पालकांनी देखील मुलांना माती, शेण, गाईगुरं, शेतीची कामे, चिखल वगैरे म्हणजे ‘शी शी’ असे शिकवू नये. पालकांनी तरुणांच्या डोक्यात भरून ठेवलेल्या जीवनाबद्दलच्या भ्रामक कल्पना काढून टाकायला हव्यात. आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा अभ्यास करून कृषी क्षेत्रात अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून काम करून, गावात राहूनदेखील उच्च जीवनमूल्य, उत्तम आरोग्य व पुरेसा पैसा मिळवता येतो. खेडय़ात राहून असे तरुण स्वत: सोबत इतरांसाठी देखील रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करू शकतात.’

मराठवाडा व विदर्भात गेल्या काही वर्षांपासून साथीचा रोग पसरावा, तशा आत्महत्या वाढत आहेत. तरीही शेतकरी आपापल्या कल्पकतेने ठिकठिकाणी नवे प्रयोग करताना दिसतात. चंदनाचे जंगल ही अशीच एक कल्पना. चंदनाची शेती करून बक्कळ आर्थिक लाभ मिळवता येतो, याचा प्रसार लातूरजवळील पाखरसांगवी गावच्या धनंजय राऊ त या तरुणाने केला आहे. धनंजयने महाराष्ट्रातली पहिली चंदन रोपवाटिका सुरू केली आहे. सुरुवातीला धनंजयने तळेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन कें द्रात आधुनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले. सगळ्यात पहिल्यांदा शेतात टोमॅटोची लागवड केली. एक एकरमध्ये सात महिन्यांत साडेचार लाख रुपयांचे टोमॅटोचे उत्पादन निघाले. काही जणांनी त्याला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. सुभाष पाळेकर यांनी आयोजित केलेल्या शिबिरात त्याने सहभाग घेतला होता. शेती करायची असेल तर गोठय़ात गाय अन् शेतात झाड आवश्यक असल्याचे पाळेकरांचे वाक्य धनंजयच्या डोक्यात पिंगा घालत होते. घरी गाय आहे, पण शेतात झाड नाही हे डोक्यात ठेवून त्याने २००४ साली एक नाही दोन नाही तब्बल २१० केशर आंब्यांची झाडे लावली. मराठवाडय़ाचाच भाग तो, पाण्याची अडचण निर्माण झाली. दोन वर्षे टँकरने पाणी घेऊन त्याने झाडे जगवली. दोन किलोमीटर अंतरावर अर्धा एकर जमीन खरेदी करून त्यात विहीर घेतली व त्या विहिरीचे पाणी दोन किलोमीटर पाइपलाइनने शेतात आणले व सर्व दहा एकर जमीन ठिबकवर पाण्याखाली आणली. ज्वारी, गहू, बाजरी यांसारख्या पिकांनाही ठिबकनेच पाणी देऊन उत्पन्न घेतले. काही जणांच्या चर्चेतून चंदनशेतीचा प्रस्ताव त्याच्यासमोर आला व त्यातून त्याने चंदनशेतीचा अभ्यास करण्यासाठी बंगळूरु, म्हैसूर, शिमोगा या कर्नाटक प्रांतातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. म्हैसूर सँडल साबणाचा कारखानाही पाहिला. तिथे चंदनाच्या झाडाची मागणी किती आहे याची माहिती घेतली. पाच हजार टन गरज असताना १०० टनांच्या आसपासही चंदन उपलब्ध होत नसल्यामुळे कारखाने अडचणीत आहेत. कितीही उत्पन्न घेतले तरी आम्हाला ते लागणारच आहे, अशी माहिती त्याला मिळाली. चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. चंदनाच्या गाभ्याची किंमत ६५०० रुपये किलो असून एका झाडात १५ ते ५० किलो इतका गाभा तयार होतो. फांद्या, साल, मुळे या सर्वाचे पैसे येतात. ५ ते १५ वर्षे या झाडाची जोपासना करावी लागते. त्याने प्रारंभी बंगळूरु येथून रोपे खरेदी केली व दोन एकरवर त्याची लागवड केली. केंद्र सरकारने चंदनाच्या शेतीसाठी हेक्टरी ४४ हजार रुपयांचे अनुदान देऊ  केले आहे. एकटय़ा लातूर जिल्ह्य़ात सुमारे १६० एकर क्षेत्रावर चंदनाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

मुंबई शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या नेरळमधील मालेगाव येथे ५५ एकर जागेत पसरलेले ‘सगुणा बाग’ हे कृषी केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा अचूक मिलाफ आहे. परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन वडिलोपार्जित शेती व्यवसाय सांभाळत त्यामध्ये नवनवीन यशस्वी प्रयोग करणारा चंदन भडसावळे हा एक आदर्श तरुण शेतकरी आहे. ‘एसआरटी’ (सगुणाबाग राइस टेक्नॉलॉजी) या पद्धतीनुसार चंदन शेती करतो. ज्यामध्ये तो शेतात जमीन न नांगरता पीक उभं करतो. याबद्दल तो म्हणाला, भातशेतीत नांगरणी आणि चिखलणीमुळे खूपच माती पाण्याबरोबर वाहून जाते. जो देश माती जपू शकत नाही, त्या देशाला भवितव्य नसते. माती वाहून गेल्यामुळे सुपीकता टिकवणारे आणि वाढवणारे सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू नष्ट होतात आणि जमीन कडक होत जाते. एसआरटी तंत्रामध्ये एकदाच नांगरून पावसापूर्वी ३ फूट रुंदीचे आणि ९ इंच ते एक फूट उंचीचे वाफे तयार केले जातात. पाऊस पडल्यावर त्यावर गवत उगवते. ते तणनाशकाच्या साह्य़ाने जागेवरच मारले जाते. त्यानंतर त्यावर पाण्यात रात्रभर भिजवलेले भाताचे बियाणे योग्य अंतरावर २ ते ४ बिया त्या रुंद वरळ्यावर पेरल्या जातात. योग्य मोजमापासाठी त्यांनी एक फ्रेम तयार केली आहे. भात उगवल्यानंतर परत एकदा निवडक तणनाशक फवारले जाते. भात तयार झाल्यावर ते कापून घेतले जाते. कापण्यापूर्वी मधल्या जागेत वाल, चवळी, मूग, मोहरी यांचे बी पेरले जाते. भाताची मुळे तेथेच शिल्लक राहतात. कडधान्यांना त्या जागेवर सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. काही वाफ्यांवर वांगी, मिरची, टोमॅटो, मका, फ्लॉवर, कलिंगड, कोबी, वाल अशी उत्पादने घेतली जातात, असं तो सांगतो.

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. या कमळफुलाची शेतीसुद्धा चंदन करतो. कमळफुलाची शेती ही कमी पैशात जास्त नफा देणारी आहे. ज्याप्रमाणे गुलाबांच्या पाकळ्यांचा गुलकंद तयार केला जातो. तसंच कमळाच्या पाकळ्यांचा कमळकंद तयार केला जातो. एवढंच नाही तर कमळाच्या फुलांचे सरबत, कमळ चटणी, कमळ पावडर, कमळांच्या बियांपासून मधुर खीर अशा नाना हटके पाककृतीही तो स्वत: करतो.

मराठी अभिनेता ओमकार कर्वेही शेतीत रमला आहे. पारंपरिक नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला आणि धान्यनिर्मिती करण्याचा संकल्प त्याने केला. त्याने नाशिक व सातारा येथे शेतजमीन घेऊन शेतीला सुरुवात केली. मधुमेही लोकांसाठी उपयुक्त असलेली खपली गव्हाची शेती तो करतो. सेंद्रिय पद्धतीने ज्वारी, गूळ, तूप आणि हळदीचे उत्पादनही तो घेतो. मेथी, कोथिंबीर, कोबी, मुळा, कांदापात अशा विविध भाजीपाल्यांची लागवडही तो करतो. इतकंच नाही तर भाज्या आणि पीक घेऊन ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा ओमकार यातून लाखो रुपयांची उलाढाल करतो आहे.

अवघ्या २४ वर्षे वयाचा बोईसर येथील वाणगाव या गावातील प्रसाद सावे हा तरुण वडील व काका यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू शेडनेटमधील विविध प्रकारच्या मिरच्यांची व काकडीची शेती यशस्वीपणे करतो आहे. शेतीचा व्यासंग वाढवत आधुनिक तंत्राचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास यातून ८० एकरावर त्याने प्रयोगशील शेतीचा विस्तार केला आहे. प्रसादला पहिल्यापासूनच शेतीची आवड होती. बारावीनंतर त्याने कृषी पदविका अभ्यासक्रम कोसबाड येथून पूर्ण केला. मिरचीच्या मसलिया, आचारी, ओमेगा व ज्वेलरी या चार जातींची त्याची शेती आहे. प्रसादच्या मिरच्यांना दिल्ली, हैद्राबाद, पुणे, बंगलोर, जयपूर येथून मागणी आहे.

मातीला आपलंसं करणाऱ्या आणि मातीत मनापासून राबणाऱ्या या तरुण शेतकऱ्यांची उदाहरणं ही पुरेशी बोलकी ठरावीत. अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणाचे भान, उत्पादनाची मागणी या सगळ्याचा मेळ घालत शेतमळा फुलवणे तरुणाईने शक्य करून दाखवले आहे.

viva@expressindia.com