07 December 2019

News Flash

भटकंती महाराष्ट्राबाहेरची

महाराष्ट्राबाहेर थोडंसं दक्षिणेकडे लक्ष दिलं तर पावसाळ्यातील ट्रेकिंगचे उत्तम पर्याय सापडतात.

(संग्रहित छायाचित्र)

नाजुका सावंत

आषाढ संपत आला आणि श्रावण सुरू  झाला की एकाच वेळी निसर्गाची दोन्ही रूपं पाहायला मिळतात. ऊनपावसाचा खेळ काहींना निसर्गाकडे आकर्षित करतो. मग त्यासाठी गड-किल्ले-रान, वन सफारी इत्यादींची आखणी केली जाते. महाराष्ट्रातील जंगलं, गडकिल्ले  सर केल्यावर तरुणाईची पावले महाराष्ट्राबाहेरच्या वाटा शोधताना दिसतात. काही ट्रेकर्सशी बोलून देशभरातील वेगळ्या ट्रेक्सचा घेतलेला धांडोळा..

महाराष्ट्राबाहेर थोडंसं दक्षिणेकडे लक्ष दिलं तर पावसाळ्यातील ट्रेकिंगचे उत्तम पर्याय सापडतात. मनमुराद भटकंतीचा आनंद देणारं शेजारील राज्यात असलेलं ठिकाण आहे कुद्रेमुख. कर्नाटकातील चिक्कमंगळूरु तालुक्यातील कुद्रेमुख डोंगररांग ट्रेकर्सच्या पसंतीस उतरते आहे. कुद्रेमुख हे कर्नाटकातील दुसरे उंच शिखर आहे. या कानडी शब्दाचा अर्थ घोडय़ाचे तोंड. एका ठरावीक बाजूने ही डोंगररांग घोडय़ाच्या तोंडासारखी दिसते म्हणून त्याचं नाव कुद्रेमुख असं पडलं. कुद्रेमुख येथे जाण्यासाठी जवळचे स्थानक म्हणजे मंगलोर. ५३ किलोमीटरवर. चिक्कमंगळूरु तालुक्यातच कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे जे सदाहरित वनक्षेत्रात येते. त्यामुळे ‘लायन टेल्ड मकाक’ ही चिंताजनक प्रजाती याच वनात अधिक आढळते. उद्यानाचा काही भाग डोंगराळ आहे. कदंबी धबधबा हे या ट्रेकचे आकर्षण. तुंगा, भद्रा आणि नेत्रावती या तीन मुख्य नद्यांमुळे या भागात हजाराहून अधिक प्रवाह तयार झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. वाघ, चित्ता, जंगली कुत्रे या तीन प्रजातींचे या भागात एकत्रित वास्तव्य आहे. या मोठय़ा प्राण्यांना शिकार म्हणून इतरही अनेक प्राणी या जंगलात आहेत.

कुद्रेमुख डोंगररांगेच्या मधोमध असलेला धबधबा करकालाच्या बाजूने रस्त्याने गेलात तरीही अनुभवता येतो. या ठिकाणी जाताना खाऊचे सर्व सामान सोबत असावे, कारण त्या संपूर्ण भागात काहीही खायला मिळण्याची शक्यता नाही. माहिती असणाऱ्या ठरावीक अस्सल ट्रेकर्ससोबत हा ट्रेक करायला हवा नाहीतर हरवून जाण्याची शक्यता असते. निसर्गसौंदर्य, खळखळणारे झरे, गर्द झाडी याबरोबरच हनुमान गुंडी धबधबा हेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा नोव्हेंबर ते जानेवारी या काळात या धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. डोंगरकडय़ांवरून सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरतात. जंगलातील आडव्या- उभ्या झाडांची रचना, दगडांचे दूरवरून भासणारे आकार, जंगलात दूपर्यंत दिसणारं धुकं, मध्येच दूरवरून पक्ष्यांचा आवाज ऐकायला, अनुभवायला कुद्रेमुखची सवारी एकदा झालीच पाहिजे.

डोंगरदऱ्यांबरोबरच सध्या तरुणाई कर्नाटकातील गोकर्ण बीच नाइट ट्रेकचा अनुभव घेते आहे. समुद्राच्या कडेकडेने रात्रीच्या वेळी अनेक चढउतार पार करत समुद्राचा आवाज आणि चंद्र चांदण्या साथीला. मुंबईपासून एका रात्रीचा प्रवास आहे. गोकर्ण हे एक छोटं शहर आहे ज्याला अनेक समुद्रकिनाऱ्यांची देण आहे.  हा ट्रेक करून नेहमीच्या ट्रेकिंग किंवा भटकंतीपेक्षा वेगळ्या प्रकारे आठवडय़ाचे शनिवार-रविवार घालवणे सध्या तरुणाईला भावते आहे. समुद्रकिनाऱ्यावर रेंगाळायला कोणाला नाही आवडत, समुद्रकिनाऱ्यावरून ट्रेक ही संकल्पना अगदीच नवीन नसली तरीही ती सुंदर त्याचबरोबर आव्हानात्मक असते हेही अनुभवण्यात मजा आहे.

हा ट्रेक सुरू करण्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणाहून पॅराडाइस बीचजवळ पोहोचायचं, हा बीच म्हणजे चित्रकार लोकांसाठी निसर्गचित्रांची मालिका उभी करतो. आजूबाजूला असलेलं पामचं बन, जास्त गर्दी नसलेला हा बीच आपल्याला एखाद्या हॉलीवूड चित्रपटाची आठवण करून देतो. पॅराडाइस बीचकडून हाफ मून बीच त्यानंतर ओम बीच आणि शेवटी कुडल बीचपर्यंतचा प्रवास करताना अनेक चढ लागतात. एक बाजूने समुद्राचा आवाज, दुसऱ्या बाजूला झाडांच्या रांगा, वर चंद्र असा अनेखा अनुभव घेता येतो. रात्री सुरू केलेला हा ट्रेक पहाट होण्यापूर्वी आपल्याला कुडल बीचपर्यंत पोहोचवतो. कॅम्पफायरची मजा, आकाशातील चांदण्यांची लूट आणि पहाटेच्या वेळी भोवताली होणाऱ्या रंगांचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही ट्रेकनंतर निघण्यापूर्वी जवळच असलेल्या मिरजन किल्ल्याला भेट देऊ  शकता. हा किल्ला पश्चिम भारताच्या समुद्र व्यापारासाठी प्रसिद्ध होता. सूर्योदयाच्या त्या एका दृश्यासाठी तर हा ट्रेक करायलाच हवा.

दक्षिणेकडील सौंदर्य आल्हाददायक वाटतं तसेच उत्तरेकडील निसर्गाची रंगसंगती कल्पनेपलीकडची आहे. सौंदर्याने नटलेल्या उत्तर भारतातील ट्रेक हे ट्रेकर्सच्या आयुष्यातील सुवर्णपर्व असते. स्पिती व्हॅली, नंदादेवी पर्वतरांग, लेह लडाख ट्रेक इत्यादी ठिकाणं प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये असतातच. सध्या रूपकुंड ट्रेक तरुणांना आपल्याकडे आकर्षित करतो आहे. उत्तराखंड राज्यातील समुद्रसपाटीपासून १५७०० फूट उंच असा हिमाचा एक रहस्यमयी तलाव आहे. याच्या चहुबाजूंनी हिमनद्यांनी भरलेले दगडी ग्लेशियर आणि बर्फाच्छादित पर्वत त्यामुळे रूपकुंड ट्रेकर्सच्या पसंतीस उतरतो आहे. रूपकुंड ट्रेकच्या वाटेवर आपल्याला केदारनाथ, चौखांबा, नीलकंठ, त्रिशूल आणि नंदा घुंटी या पर्वतांचे दर्शन होते. हा ट्रेक अनुभवी ट्रेकर्ससाठी असून मे-जूनबरोबरच सप्टेंबर-ऑक्टोबरही या ठिकाणी ट्रेक करण्यासाठीची योग्य वेळ आहे. रूपकुंडला रहस्यमयी तलाव म्हणतात, कारण त्या ठिकाणी ३०० मानवी सापळे सापडले आहेत जी गोष्ट अजूनही अभ्यासकांना खिळवून ठेवते आहे. ट्रेक दरम्यान सोबत असलेले त्या ठिकाणचे गाइड या मिस्ट्री लेकमागची मिस्ट्री सांगतात ते ऐकताना थकवा नक्कीच दूर जातो.

ट्रेक करताना आपल्याला सुरुवातीला ओकच्या गर्द झाडीमधून अचानक अली आणि बेडणी बुग्याल हे दोन भारतातील समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली सर्वात सुंदर कुरणं दिसतात, आणि ती संपतात तिथून बर्फाच्छादित उंचच उंच डोंगर. या कुरणांना पाहण्यासाठी हा ट्रेक नक्की करावा.

कथगोदाम स्थानकापासून १० तासांच्या अंतरावर असलेल्या लोहाजंग गावातील बेस कॅम्पवरून हा ट्रेक सुरू होतो. साधारण ९ दिवसांचा हा ट्रेक आपल्याला अनेक वेळा कुरणांमध्ये तंबू ठोकून राहण्याची संधी देतो. सिप्रस, ओक, रोडोडेंड्रोनची वृक्षं; अक्रोड, पेअरची झाडं त्याचबरोबर हिमालयीन गुलाब असे निसर्गाचे विविध रंग पाहायला मिळतात. घोरा लोटानी या कुरणापर्यंतच घोडे आपली साथ देतात त्यापुढे बर्फ आणि आपण. जंगल, पक्षी, वृक्ष, बर्फ असं पॅकेज अनुभवायचंय तर नक्की जा.

असंच पॅकेज ईशान्य भारतपण ट्रेकर्सना ऑफर करतो. मेघालयातील खासी पर्वतरांगेतील मावरिंगखांग ट्रेकमध्ये इतर सर्व गोष्टींबरोबर त्या खासी लोकांच्या खास गोष्टींचा अनुभव घेता येतो. खासी पर्वतरांगेच्या पूर्वेला वाहखेन गाव आहे. त्या ठिकाणी खासी लोकांचे वास्तव्य आहे. संपूर्ण ट्रेकभर लागणाऱ्या नद्यांच्या वरून जाणारे बांबूचे पूल हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण ठरतात. त्यांच्या त्या स्थापत्य कलेच्या आखणीचा अंदाज आपल्याला तिकडे जाऊनच मिळतो. ट्रेक करताना पूल आणि आपण याचं गणित कळेपर्यंत आपण घाबरलेलेच असतो, पण आजूबाजूच्या आणि मुख्य म्हणजे शिखरावर पोहोचल्यावर दिसणाऱ्या निखळ सौंदर्यापुढे ते विसरून जायला होतं. पुलावरून हळू आणि सहजपणे जाणं हे तेथील खासींच्या डाव्या हाताचा खेळ आहे. तो शिकण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळते. उमरू नदीवरील बांबूचा पूल पार करताना मात्र कस लागतो. ट्रेकभर आपल्याला लपलेले धबधबे दिसत राहतात. पुलावरून चालताना चहुबाजूंना पसरलेली दरी हे दृश्य भारीच.

मावरिंगखांगची कथाही आहे, मावरिंगखांग म्हणजे दगडांचा राजा, त्याचे मावपतोर राजाच्या राजकन्येवर प्रेम जडते. त्या दोघांमध्ये युद्ध होतं त्यात मावरिंगखांग जिंकतो. आज मावरिंगखांग एक प्रसिद्ध दगड आहे आणि मावरिंगखांगच्या शिखरावरून मावपतोर राजाचे धडापासून अलग केलेले शिर खाली दरीत पाहायला मिळते. नेहमीची ठिकाणं आणि पर्यटकांच्या गर्दीला टाळण्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. ईशान्य भारतात फिरायला गेलात तर हा एक दिवसाचा ट्रेक तुम्हाला नेहमीपेक्षा आणखी सुंदर मेघालयाचे दर्शन घडवतो. या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचे साधन नाही त्यामुळे वाहखेन येथे पोहोचण्यासाठी स्वत:ची गाडी किंवा भाडय़ाने गाडी करून गुवाहाटीवरून पहाटे निघालात तर वेळेत ट्रेक पूर्ण होतो.

वाहखेन गावही पर्यटकांच्या नजरेत आले आहे. या गावातील लोक पारंपरिक पद्धतीने संगीत शाळा खासी झोपडय़ांमध्ये चालवतात. वेगवेगळ्या संगीत वाद्यांचा वापर करतात. सध्या शहरांमधील ढासळत्या स्थापत्याचा अनुभव तर घेतच आहोत तर भारतातीलच एका वेगळ्या भारताचा अनुभव घ्यायला ईशान्य भारत सज्ज आहे. पावसाच्या सरी अजून बरसत आहेत, अशा वेळी आपल्या नेहमीच्या जागांची भटकंती सोडून देशभरातील या वेगळ्या ट्रेकवाटा धुंडाळायला हरकत नाही!

viva@expressindia.com

First Published on July 19, 2019 1:55 am

Web Title: wandering is outside maharashtra abn 97
Just Now!
X