राधिका कुंटे

‘तू केवढी, तुझा कॅमेरा केवढा नि त्यात केवढी छायाचित्रं काढली आहेस तू..’ (हे वाक्य लिखित असलं तरी ते वाचताना आपापल्या कौतुक किंवा टीकेच्या टोनमध्ये वाचावं). अशा दोन टोकांच्या प्रतिक्रिया ती छायाचित्रणासाठी जाते तेव्हा मिळतात. मात्र त्याने हुरळून न जाता किंवा निराश न होता ती तिचं काम करत राहते. इतरांना प्रेरणा देते. ही आहे ऐश्वर्या श्रीधर! वन्यजीव छायाचित्रकार (वाइल्डलाइफ फोटोग्राफर). ऐश्वर्यावर लेख लिहिण्याचं निमित्त आहे तिला मिळालेला पुरस्कार. अलीकडेच लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे जाहीर झालेल्या ५६व्या पुरस्कारांच्या घोषणेत ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर’ (हायली कमेंडेड अ‍ॅवॉर्ड इन बिहेवियर इन्व्हर्टेब्रेटस् कॅटेगरी) हा पुरस्कार ऐश्वर्याला मिळाला आहे. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. विविध विभागांतल्या एकूण आठ भारतीयांना हा पुरस्कार मिळाला असून त्यांच्यात ऐश्वर्या वयाने सगळ्यात लहान आहे. त्यापैकी ध्रीतीमान मुखर्जी, मसूद हुसेन, नयन खानोलकर ही काही नावं. या पुरस्कारासाठी जगभरातील ८० देशांमधून जवळपास ५० हजारांहून अधिक छायाचित्रं मागवण्यात आली होती. त्यातील फक्त १०० छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्यात ऐश्वर्याच्या ‘लाइट्स ऑफ पॅशन’ या शीर्षकाच्या छायाचित्राचा समावेश आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

जमिनीवर काजव्यांनी लगडलेलं झाड आणि आकाशातले तारेही तितक्याच जोरकसपणे प्रकाशमान झालेले दिसत आहेत, असा क्षण या छायाचित्रात ऐश्वर्याने टिपला आहे. किंवा आता पंधरवडय़ावर आलेल्या दिवाळीचा संदर्भ द्यायचा तर जणू निसर्गाने झाडावर काजव्यांची रोषणाई केलेली आहे. त्याविषयी ऐश्वर्या सांगते की, ‘मुळात हे छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवावं वगैरे विचार ते काढलं तेव्हा अजिबातच नव्हता. मी पनवेलकर. लहानपणी घराच्या गॅलरीत काजव्यांना चमकताना पाहिलं होतं. दरम्यान, पनवेलमध्ये विकास होत गेला आणि काही गोष्टी मागे पडत गेल्या.. गेल्या वर्षी वृत्तपत्रात भंडारदऱ्याच्या काजवा महोत्सवाविषयी वाचलं. तेव्हा लहानपणी पाहिलेल्या काजव्यांच्या आठवणीने डोकं वर काढलं. मग तिथे जायचं ठरवलं. मला छायाचित्र काढताना भोवताली गर्दी नको होती, कारण त्या कलकलाटात छायाचित्र नीट घेता आलं नसतं. शिवाय प्रकाशाचा विचार करता चंद्रप्रकाश नसेल, फक्त तारे असतील अशा स्थितीचा अभ्यास केला. स्थानिक मार्गदर्शकांसोबत बरीच चालत गेले. तेव्हा हे झाड दिसलं. आधी मी ते निरखलं. काही छायाचित्रं काढली, पण ती फारशी भावली नाहीत. मग एका क्षणी कसं काय ते शब्दांत नाही मांडता येणार, पण झाड, काजवे, आकाश, तारे हे सगळं समीकरण जुळून आलं नि मी पटापट क्लिक्स करत गेले. घरी परतल्यावर त्या छायाचित्रांवर थोडं काम केलं आणि त्यानंतर समोर दिसणाऱ्या छायाचित्राकडे पाहून मनोमन वाटलं की, हे एखाद्या स्पर्धेत पाठवता येईल. त्या सुमारास या स्पर्धेविषयी कळलं. या छायाचित्राखेरीज मी पाच इतर छायाचित्रंही पाठवली होती’. हा पुरस्कार मिळाल्यावर ऐश्वर्याने स्थानिक मार्गदर्शकांशी संपर्क साधून आपली कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न केला खरा, पण त्यांचा संपर्क क्रमांक लागत नसल्याने अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, याची खंत तिला वाटते आहे. पुरस्कार मिळाला आहे ही बातमी कळल्यावर आधी तिला खरंच वाटत नव्हतं. अजूनही कधी तरी खरंच हा पुरस्कार आपल्याला मिळालाय का? हा विचार तिच्या मनात चमकून जातो.

तिला लहानपणापासूनच वन्यजीव निरखण्याची आवड होती. तेव्हा पनवेल एखाद्या खेडय़ासारखं हिरवंगार होतं. किती तरी वन्यजीव दिसायचे. कधी कधी उरणला फिरायला जाणं व्हायचं. बाबांनी कॅमेरा घेऊन दिल्यावर सरसकट विविध छायाचित्रं ती काढत असे. पण तिच्या आकलनाचा, ज्ञानाचा आणि प्रवासाचा परीघ वाढल्यावर आपल्याकडे असलेली जैवविविधता तिच्या लक्षात आली. वन्यजीवांचं पर्यावरणातलं महत्त्व तिने जाणले. त्याचबरोबर या सगळ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही दिसला. ऐश्वर्या सांगते की, ‘आपल्या हातातून गोष्टी पुरत्या निसटून जायच्या आत, पुढच्या पिढय़ांच्या भल्यासाठी म्हणून आताच काही धडपड केली तर या साऱ्यातून मार्ग दिसू शकेल आणि त्यासाठी छायाचित्र, माहितीपटांसारखं अन्य माध्यम निवडलं.’ खरं तर लहानपणी सी.ए. व्हायची तिची इच्छा होती, पण ते तेवढंच राहिलं. तिने ‘पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’मधून मास मीडियाचा अभ्यासक्रम केला. छायाचित्रणाची कला ती स्वत:च चुकतमाकत, प्रयोग करत शिकली. ‘सॅच्युरी एशियाज यंग नॅचरलिस्ट अ‍ॅवॉर्ड’, ‘इंटरनॅशनल कॅमेरा फेअर अ‍ॅवॉर्ड’, युकेमधील ‘यंग डिजिटल कॅमेरा फोटोग्राफर ऑफ द इअर’ (स्मॉल वर्ल्ड) तिला मिळालं आहे. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील विविध छायाचित्र प्रदर्शनांत तिची छायाचित्रं प्रदर्शित होतात. गेल्या वर्षी तिला ‘प्रिन्सेस डायना फाऊंडेशन’तर्फे ‘डायना अ‍ॅवॉर्ड’ मिळालं आहे. नऊ ते २५ वयोगटांतील तरुण चेंजमेकर्सना हा पुरस्कार दिला जातो. राधिका रामस्वामी, अश्विका कपूर, कल्याण वर्मा तिचे रोल मॉडेल्स आहेत.

‘लाइट्स ऑफ पॅशन’ या छायाचित्राला पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकींनी तिचं समाजमाध्यमांवरून भरभरून अभिनंदन तर केलंच, पण ती त्यांच्यासाठी प्रेरणा ठरल्याचंही आवर्जून कळवलं. अगदी करिअर नाही तर छंद म्हणून वन्यजीव छायाचित्रणकला जोपासण्याचा मानस काहींनी व्यक्त केला. त्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा लोकांना मी काढलेल्या छायाचित्रामुळे प्रेरणा मिळते आहे, हे पाहून मला समाधान वाटतं, असं ती सांगते. एक मुलगी म्हणून तिच्या वाटय़ाला कौतुक आलं तसंच टीकाटिप्पणीही वाटय़ाला आली. पण त्याकडे लक्ष न देता ती तिचं काम करत राहिली. सध्या भोवताली मुली-स्त्रियांबाबत घडणाऱ्या घटना वाचल्या-ऐकल्यावर कधी कधी मनात कुठे तरी किंचितशी भीती वाटते. पण अगदी खेडेगावात, निर्मनुष्य ठिकाणी जायचं झालं तर तिचे वडील तिच्यासोबत असतात. ऐश्वर्या सांगते की, ‘मुलगी आहे म्हणून माझी आवड जोपासू शकत नाही, हा विचार मनातून काढून टाका. मुलगी-मुलगा कुणीही असलात तरी मनापासून आवडणारं काम नक्की करायला हवं. पॅशन जोपासायला हवं. या क्षेत्रात यायचं असेल तर रोजच्या सरावाला न्याय द्यायलाच हवा. कायम कौतुकाची अपेक्षा ठेवू नका, पण कुणी छायाचित्राविषयी एखादी गोष्ट निदर्शनास आणली, ती सुधारता येणं शक्य असेल तर त्यासाठी जरूर प्रयत्न करा. पण उगीचच कुणी खुसपट काढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं.’ छायाचित्रांखेरीज स्विमिंग, लिखाण, वाचन, बॅडमिंटन हे तिचे छंद आहेत. ‘पांजे द लास्ट वेटलॅण्ड’ हा तिचा पहिला माहितीपट डीडी नॅशनलवर प्रसिद्ध झाला होती. गेल्या वर्षी तिने टेडेएक्सवर टॉक दिला होता. लॉकडाऊनच्या काळात तिने अनेक वेबिनार्स, कार्यशाळा घेतल्या. कॅननसाठी कार्यशाळा घेतली. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया’तर्फे ओरिगामीच्या माध्यमातून प्राणी तयार करायला शिकवले. ‘डिस्कव्हरी चॅनेल इंडिया’च्या फेसबुक पेजवर ‘नेचर फॉर फ्युचर’ ही आठ भागांची सीरिज केली होती. प्रत्येक भागाला लाखांहून अधिक व्ह्य़ूअर्स मिळाले होते. सध्या माहितीपटांवर काम सुरू आहे. ऐश्वर्याला तिच्या ध्येयाच्या प्रवासात अधिकाधिक यश मिळो आणि त्यायोगे पर्यावरणाचं संवर्धन होऊन अनेक उत्तम छायाचित्रं आपल्याला बघायला मिळोत, या शुभेच्छा.

viva@expressindia.com