माध्यमी : कपडेपटाची कमांडर

चैत्रालीने फॅशन डिझायनिंगचा गव्हर्न्मेंटचा डिप्लोमा केला आणि नंतर ‘ललित कला केंद्रा’तून ड्रामॅटिक्समध्ये पदवी घेतली.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

माणसाची पहिली ओळख त्याच्या कपडय़ांवरून होते असं म्हणतात. एखादी व्यक्ती काय कपडे घालते यावरून तिचा साधारण स्वभाव काय असेल, वागणं-बोलणं कसं असेल, संस्कृती काय असेल?, इत्यादी अनेक गोष्टींचे अंदाज बांधले जातात. माणसाच्या आयुष्यात कपडय़ांचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे की त्यावर अख्खी फॅशन इंडस्ट्री उभी आहे. याच कपडय़ांच्या दुनियेत प्रामुख्याने वावरणारी आणि त्याचबरोबर कास्टिंग व प्रॉडक्शनमध्येही स्वत:ची ओळख निर्माण केलेली चैत्राली डोंगरे. चित्रपट, नाटक, जाहिराती, मालिका अशा सर्वच क्षेत्रांत ती कार्यरत आहे.

चैत्रालीने फॅशन डिझायनिंगचा गव्हर्न्मेंटचा डिप्लोमा केला आणि नंतर ‘ललित कला केंद्रा’तून ड्रामॅटिक्समध्ये पदवी घेतली. ‘उत्तरायण’ या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. ‘असिस्टंट’ म्हणून काम केलेला चैत्रालीचा तो पहिलावहिला आणि एकमेव चित्रपट. त्यानंतर तिने सगळीच कामं पूर्णत: स्वतंत्रपणे करायला सुरुवात केली. कोणत्याही कलेच्या क्षेत्रात करिअर घडवायचं म्हटलं तर चैत्रालीच्या मते तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ‘कला क्षेत्रात धडपडू पाहणारे अनेकजण आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळेपण सिद्ध करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे टॅलेंट असलं पाहिजे. के वळ हौस आहे, आवडतंय असं वाटतंय वगैर म्हणून या क्षेत्रात येऊन टिकून राहता येत नाही. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, या क्षेत्रात तुमच्या रिलेशन्सना खूप महत्त्व आहे. इथे कामाची साखळी असते. एका कामातून पुढचं काम मिळत जातं आणि कोणीही तुमचं काम लक्षात ठेवून तुम्हाला पुढे काम मिळण्यात मदत करू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. तुमचं मानधन, तुमच्या अपेक्षा या मांडाव्यात हे नक्की, मात्र काही वेळेला थोडं मागेपुढे करूनही काम करता आलं पाहिजे. कारण या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सातत्याने काम करत राहणं. त्यासाठी एखादेवेळेस थोडय़ा कमी गोष्टींत समाधान मानावं लागत असेल तरी काम सोडू नये’, असे ती आग्रहाने सांगते. जवळजवळ सोळा वर्ष या क्षेत्रात काम करत असलेल्या चैत्रालीने दिलेले सगळे सल्ले हे तिच्या अनुभवातून आलेले आहेत.

चैत्रालीने केवळ कॉस्च्युम डिझाइनरच नाही तर काही प्रोजेक्ट्ससाठी तिने कास्टिंग डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव प्रोडय़ुसर म्हणूनही काम केलं आहे. कोणतंही काम स्वीकारताना स्वत:ला तपासून पाहिलं पाहिजे हे तिचं तत्त्व आहे. ती म्हणते, ‘या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी म्हणून अनेकजण रोज येत असतात. काहीजण टिकून राहतात तर काहीजण थेट इथून बाहेर पडतात. इथे येताना हे ठरवलं पाहिजे की आपल्याला एकच गोष्ट ठरवून केवळ त्याचसाठी प्रयत्न करायचे आहेत की अजूनही संधी शोधायच्या आहेत. आजूबाजूच्या क्षेत्रातही काम करून बघायचं असेल तर मात्र हे ठरवावं लागेल की आपल्या इतर क्षमता काय आहेत, आपण कुठे आणि काय काम करू शकतो, आपल्याला किती कामं एका वेळी जमणार आहेत, इत्यादी’. कोणतंही नवीन काम स्वीकारताना आपल्याला ते जमणार आहे की नाही याची पूर्ण जाणीव ठेवून आपण होकार किंवा नकार दिला पाहिजे. काम जमत नसतानाही होकार दिला तर आपोआपच आपल्या कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. काम जमत असूनही स्वीकारलं नाही तर आपला आत्मविश्वास कमीच होत राहतो आणि आपण एकाच प्रकारची कामं करत राहतो, असं ती म्हणते.

कॉस्च्युम डिझाइनर म्हणजे केवळ चित्रपटातल्या पात्रांना कपडे घालणं इतकंच नव्हे, तर त्यात अनेक बाबींचा विचार करावा लागतो. चैत्रालीच्या सोळा वर्षांच्या करिअरमध्ये तिने सर्व प्रकारच्या माध्यमांसाठी कॉस्च्युम डिझाइनिंग केलेलं आहे. त्या अनुभवांबद्दल ती सांगते, ‘नाटक, चित्रपट, जाहिरात आणि मालिका या प्रत्येक माध्यमात वेगळ्या गोष्टींची गरज असते. नाटकात हा विचार करावा लागतो की पात्राने घातलेले कपडे आणि दागिने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतील का, नाटकात किती वेळा कपडे बदलायचे आहेत, कपडे बदलायला किती वेळ मिळणार आहे, रंगमंचावरच्या नेपथ्यात काय रंग आहेत.. या सगळ्याचा विचार करावा लागतो. त्यानुसार काही लहानमोठय़ा ट्रिक्स वापरून त्यांचा कपडेपट ठरवावा लागतो. चित्रपटात कोणतीही गोष्ट पडदाभर दिसणार असते. सिनेमागृहात चित्रपट बघणारे आणि नंतर टीव्हीवर चित्रपट बघणारे अशा दोन्ही प्रेक्षकांचा विचार करून कपडे ठरवले जातात. त्यातही सेटच्या रंगांचा आणि पात्राच्या गोष्टीतल्या पाश्र्वभूमीचा विचार करावा लागतो’, असं ती सांगते. तर मालिकांसाठी पात्राच्या गोष्टींनुसार त्यांचे कपडे रिपीट करायचे की नाही हे ठरतं. या तिन्ही माध्यमांत कपडय़ांचे रंग हे कोणत्याही बॅकग्राउंडच्या रंगामध्ये मर्ज होऊन चालत नाहीत, मात्र जाहिरातींचं काम अगदी उलट आहे. त्या प्रॉडक्टच्या किंवा ब्रँडच्या रंगांशी कपडय़ांचे रंग जुळले पाहिजेत जेणेकरून त्या प्रॉडक्ट किंवा ब्रँडचं प्रतिनिधित्व केल्याचा संदेश पोहोचेल. प्रत्येक माध्यमाच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करत काम करावं लागतं, असं चैत्राली म्हणते.

स्वत:च्या क्षेत्रात डेडिकेटेड असलेली चैत्राली ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या जॉइंट सेक्रेटरी या पदावरदेखील काम करते आहे. आपलं काम आपण जीव ओतूनच केलं पाहिजे असं चैत्रालीचं मत आहे. केवळ कोणीतरी आपल्याला काम देत आहे म्हणून आपण आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन ते करायला जायचं नाही, तर आपल्याला मनापासून ते काम करण्याची इच्छा असेल तरच प्रत्येक काम स्वीकारायचं हा चैत्रालीचा जणू ‘उसूल’ आहे.

कॉस्च्युमच्या क्षेत्रात केवळ मुलींनीच यावं असा काही नियम नाही आहे. या क्षेत्रात बहुतांशी मुलीच दिसतात. मात्र प्रत्यक्ष विचार केला तर सगळीकडे टेलर हे पुरुषच पाहायला मिळतात. तरीही या क्षेत्रात मुलं यायला लाजतात असं माझं निरीक्षण आहे. ही एक कला आहे, इथे स्त्री – पुरुष हा भेद बाळगायची गरज नाही. ही कला अंगभूत असावी लागते आणि त्यासाठी नजर हळूहळू तयार करावी लागते. आजूबाजूची माणसं वाचणं हा यासाठीचा सर्वात उत्तम अभ्यास ठरतो.

– चैत्राली डोंगरे

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on commander of the garment chaitrali dongre abn

ताज्या बातम्या