वस्त्रांकित : पदर ‘माया’

भारतात साडी या वस्त्राबद्दल जेवढी आत्मीयता आहे, तेवढी अन्य कोणत्याही वस्त्राबद्दल नाही.

(संग्रहित छायाचित्र)
विनय नारकर

भारतीय संस्कृतीत साडीकडे फक्त एक पोशाख म्हणून बघितले जात नाही. साडीला एक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थानही आहे. अशा साडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या पदराची महती तर अगाध आहे. स्त्रियांच्या पदर सावरण्याच्याही निरनिराळ्या लकबींवरून कित्येक कवी व चित्रकारांना स्फुरण चढले आहे, अशा या पदराने काही रूढींना जन्म दिला, तसेच या पदराने अनेक म्हणी व वाक्प्रचार आपल्या पदरी घातले आहेत.

भारतात साडी या वस्त्राबद्दल जेवढी आत्मीयता आहे, तेवढी अन्य कोणत्याही वस्त्राबद्दल नाही. साडीला कमीत कमी दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. कालौघात साडीचे स्वरूप थोडेफार बदलले, पण भारतीय स्त्रियांचा साडीबद्दलचा जिव्हाळा वाढतच गेला आहे. काळानुरूप भारतीय स्त्रियांची जीवनशैली बदलत गेली. कामकाजाच्या स्वरूपानुसार स्त्रियांनी निरनिराळा सुटसुटीत पोशाख स्वीकारला, पण त्यांच्या भावविश्वातलं साडीचं स्थान मात्र अढळ आहे.

साडी हे अखंड वस्त्र असल्याने प्रवाही असते, पण रचनेच्या दृष्टीने काहीसे काटेकोरही असते. साडीच्या रचनेत काठ आणि पदर हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. पदर हा अनेक अंगांनी महत्त्वाचा भाग आहे. रचनेच्या दृष्टीने पदर हा साडीचा सर्वात शेवटचा भाग. साडीचा सर्वात सुशोभित भाग. भारतात अगणित वस्त्र परंपरा होत्या आणि अजूनही अनेक आहेत. प्रत्येक परंपरेत पदर हाच साडीचा सर्वात शोभिवंत भाग असतो. भारतात साडी नेसण्याच्या शेकडो पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीत पदराला खास स्थान आहेच.

भारतीय संस्कृतीत साडीकडे फक्त एक पोशाख म्हणून बघितले जात नाही. साडीला एक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थानही आहे. अशा साडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या पदराची महती तर अगाध आहे. स्त्रियांच्या पदर सावरण्याच्याही निरनिराळ्या लकबींवरून कित्येक कवी व चित्रकारांना स्फुरण चढले आहे, अशा या पदराने काही रूढींना जन्म दिला, तसेच या पदराने अनेक म्हणी व वाक्प्रचार आपल्या पदरी घातले आहेत.

सख्या सोडा ना, राया सोडा ना,

सोडा पदर, जिवास लागे ओढ ना ॥

असं प्रणय खुलवणाऱ्या पदरापासून, ते  ‘घालते मायेचा पदर’, असा वात्सल्य वर्षांवणाऱ्या पदरापर्यंत अनेको पदर या ‘पदरास’ आहेत.

मुलगी वयात येते, ऋतुमति होते तेव्हा तिला ‘पदर’ येतो असे म्हटले जायचे. ‘पदर येणे’ हा वाक्प्रचार रूढ होण्यामागेही एक वस्त्रपरंपरा कारणीभूत आहे. मुली लहान असताना त्यांना ‘परवंट’ हे वस्त्र नेसवले जायचे. परंवट हा एक साडी नेसण्याचा प्रकार आहे. या नेसण्यामध्ये मुलीला साडीचा पदर काढला जात नाही. निऱ्या पदरापर्यंत काढून पदराचा भाग कमरेभोवती आवळला जातो. या नेसण्यात पुढे वरवंटय़ाच्या आकाराचा आडवा लांबोडा भाग असतो, ज्याला केळें असे म्हटले जाते. एका कवितेत, ‘कंचुकी वस्त्राच्या परवंटी । मुक्ताफळें झळकती ।’, असा परवंटय़ाचा उल्लेख येतो. हे नेसणाऱ्या मुलीस ‘परवंटकरीण’ म्हटलं जायचं. मुलीस ऋतुस्नान झाले, म्हणजे नहाण आले की, परवंट सोडून अंगावरून पदर देण्याचा विधी केला जायचा. अशा रीतीने मुलीस ‘पदर’ येतो. मग तिला ‘पदरकरीण’ म्हणजे पदर घेण्यालायक मुलगी असे म्हटले जायचे.

एका लावणीमध्ये हा वाक् प्रचार असा आला आहे,

‘दूर दूर सरा, पदर मशि आला,

दुरूनच चाल शहाण्या ॥

अशा प्रकारे या वस्त्रपरंपरेचे वाक्प्रचारात रूपांतर झाले. पदराचे सांस्कृतिक महत्त्वही वरचेवर वाढत गेले.

समाजात लग्नसंबंध ठरवताना संबंधित घराण्यांचा एकमेकांशी आधी काही नातेसंबंध आहे का हे पाहतात, म्हणजेच ‘पदर लागला’ आहे का हे पाहतात. नातेसंबंध जुळण्याला ‘पदर लागणे’ असा शब्द प्रयोग वापरला जातो. एखाद्या घराचा संबंध जर कुणा ‘वाईट’ घराशी आला असेल तरीही हा शब्दप्रयोग वापरला जातो. या वाक्यातून हे लक्षात येते, ‘गोविंदरावांची मुलगी तुम्ही करू नका, त्यांच्या घराला पदर लागला आहे’. याशिवाय, ‘पदरानपदर’ असाही एक शब्द आहे. विवाहसंबंधांमुळे जमलेल्या दूरच्या संबंधाला किंवा लांबच्या आप्तसंबंधाला ‘पदरानपदर’ असे म्हटले जाते.

मुलीला नहाण आलं, म्हणजे पदर आला त्यानंतर नातेसंबंध जमला, म्हणजे पदर लागला, या नंतर काय.. तर ‘पदर धरणे’. पदर धरला म्हणजे स्त्री गर्भवती झाली. या वाक्यावरून हा शब्दप्रयोग पाहायला मिळेल, ‘‘श्रीमंतांस पुत्र कधीं होईल, ते देवांस विचारून पाठवावे, उत्तरात लिहले कीं, आठ महिन्यांनी पदर धरेल..’’

अशा प्रकारे आपल्या संस्कृतीत पदराला महत्त्वाचे स्थान मिळत गेले. पदर हा सौभाग्याचं प्रतिक मानला गेला. पतीचे निधन झाल्यावर ‘पदर उतरविणे’ किंवा ‘पदर टाकणे’ हा वाक् प्रचार रूढ झाला.

एखाद्याने लग्नसंबंध तोडला तर, त्यासाठी ‘पदर फाडून देणे’ या शब्दप्रयोग वापरला जाऊ  लागला. स्त्रीच्या आयुष्याशी पदर असा बांधला गेला आहे. इतका की पदर म्हणजे तिची अब्रू, प्रतिष्ठा झाली. स्त्रीची अब्रू लुटली गेली तर, ‘तिचा पदर जळाला’ असे म्हटले जाऊ  लागले.

लग्नसंबंध जुळताना आधी वधुवराची संमती घेतली जायचीच असे नाही. अशा वेळेस जो जोडीदार मिळेल त्याच्याशी जुळवून घ्यावे असा प्रघात होता. त्यामुळे, ‘पदरी पडले पवित्र झाले,’ अशी म्हण रूढ झाली.

पदर ‘आला’, पदर ‘लागला’, पदर ‘धरला’, पदर ‘उतरला’, पदर ‘फाडला’, पदर ‘जळाला’ असा आयुष्याचा पटचं एका प्रकारे ‘पदराने’ व्यापला गेला आहे.

याशिवाय व्यवहारातही अनेक प्रकारे पदराशी संबंधित वाक्प्रचार रूढ आहेत. ते आपण पुढील भागात बघू.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on saree padar sayings and phrases abn