गेल्या आठवडय़ात शाहीद कपूर- मीरा राजपूतचं लग्न हाच विषय चर्चेत होता. शाहीद आणि मीरा यांच्या पेहरावाचे साधेपणा आणि क्लासी लुक हे वशिष्टय़ होतं. मीराचा लुक आजच्या तरुणीचं प्रतिनिधित्व करणारा होता. टिपिकल लाल साडीला फाटा देत तिने अनामिका खन्नाने डिझाइन केलेला राखाडी एम्ब्रॉयडरीचा गुलाबी लेहेंगा निवडला. सोबत मल्टीकलर नेकपीस आणि मांगटिका (किंवा बिंदी) घातला होता. मुस्लीम पेहरावाचा भाग असलेला केसांना लावायचा दागिना- ‘झुमर’ मीराचा लुक पूर्ण करत होता. पंजाबी लग्नात महत्त्वाचा लाल चुडासुद्धा तिने लेहेंग्याला साजेशा गुलाबी शेडचा घातला होता. दिल्ली आणि मुंबईच्या रिसेप्शनलादेखील आटोपशीर लुक तिने निवडला. मुंबईला डिझायनर मनीष मल्होत्राचा मोत्यांचे काम असलेला व्हाईट क्रॉॅप टॉप आणि निळ्या एम्ब्रॉयडरीचा लेहेंगा घातला होता. सोबत इअररिंग्स आणि ब्रेसलेट, अंगठी बस! नववधू म्हणून ढीगभर दागिने, अतिवजनाचे लेहेंगे वापरून त्याखाली पुरती दबून जाण्याऐवजी आपल्याला काय शोभून दिसतं, याचा विचार हवा. लालसोबतच पिवळा, नारंगी, गुलाबी, आकाशी, पोपटी रंगसुद्धा लग्नामध्ये वापरले जातात. स्टोन्स किंवा जरदोसीने कपडय़ांचे वजन वाढते, त्याऐवजी पीटा वर्क, कटवर्कचा वापर करता येईल. कपडय़ांना साजेशी, हलकी आर्टििफशिअल ज्वेलरी हरकत नाही.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com
