तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

बघता बघता संपूर्ण विश्वाला घेरणाऱ्या करोना महामारीला आता दोन वर्षे होत आली. संपूर्ण जगच बंद असल्यामुळे टाळेबंदीच्या काळात अगदी छोटय़ापासून ते मोठय़ा कंपन्यांवर, इंडस्ट्रीवर आर्थिक मंदीचे सावट आले. परंतु जसा जसा करोनाचा प्रभाव कमी होतो आहे तशी प्रत्येक इंडस्ट्री पुन्हा उभी राहू पाहाते आहे. टूर्स आणि ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री तसंच टेक्स्टाइल आणि फॅशन इंडस्ट्रीला करोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. घरीच आहोत म्हणून गेले दोन वर्षे लोकांनी कपडेही विकत घेतले नाहीत, इतर फॅशन अ‍ॅक्सेसरीज आणि ब्युटी प्रॉडक्ट्सची खरेदी तर दूरच राहिली. परंतु, आता शाळा-महाविद्यालयांपासून ते हॉटेल-रिसॉर्ट्सपर्यंत हळूहळू सगळ्याच गोष्टी खुल्या होत असल्याने फॅशनची खरेदीही हळूहळू वेग घेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकसह वेगवेगळ्या फॅशन शोजचा प्रभाव आपल्याला फॅशन बाजारपेठेवर पाहायला मिळणार आहे.

देशोदेशीच्या पर्यटनापासून लोणावळा-खंडाळ्याच्या रिसॉर्टपर्यंत भ्रमंतीचे विविध पर्याय खुले झाले आहेत आणि जोडीला दसरा- दिवाळीच्या सणांमध्ये मिरवण्याचा आनंद असा दुहेरी फॅ शन खरेदीचा योग सध्या जुळून आला आहे. यानिमित्ताने फॅ शनच्या रखडलेल्या बाजारपेठेला संजीवनी देण्यासाठी मोठमोठय़ा फॅशन डिझायनर्स, ब्रॅण्ड्सनी कं बर कसली आहे. फॅ शन सहज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पहिलं माध्यम म्हणजे लोकप्रिय असलेले फॅ शन शोज. आंतरराष्ट्रीय स्तरावर याआधीच मेट गाला फॅशन, पॅरिस फॅ शन वीक अशा वेगवेगळ्या फॅशन शोजची हलचल सुरू झाली असल्याने आपल्याकडची फॅ शन मांदियाळी यात मागे राहणं अशक्यच. जगभरातील फॅशन डिझायनर्स वेगवेगळ्या फॅ शन शोजच्या माध्यमातून आपलं कलेक्शन मार्के टमध्ये उतरवण्यासाठी धडपडत असताना, आपल्याकडेही फॅशन डिझायनर्सनी या आठवडय़ात सुरू झालेल्या ‘लॅक्मे फॅ शन वीक’च्या माध्यमातून धडाक्यात कलेक्शन सादर करायला सुरुवात के ली आहे.

करोनाचा गेला दीड वर्षांचा काळ हा डिजिटल काळ म्हणूनच ओळखला गेला. दैनंदिन व्यवहारातल्या शिक्षणापासून कामापर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टी या प्रत्यक्ष करण्याऐवजी ऑनलाइनच पार पाडण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र सरकारने नियम शिथिल के ले असल्याने प्रत्येक क्षेत्राची कार्यपद्धती बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे लॅक्मे फॅशन वीक, पॅरिस फॅशन वीक आणि प्रसिद्ध असा मेट गाला म्हणता येईल.  सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच ‘मेट गाला’ फॅशन इव्हेंटने दरवर्षीप्रमाणे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. न्यूयॉर्क शहरातील ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्यूम इन्स्टिटय़मूट’ला वार्षिक निधी उभा करून देण्यासाठी सुरू केलेला हा एक फॅशन उत्सव आहे. या रेड कार्पेटवर पहिल्यांदा फॅशन इंडस्ट्री ग्लोबली करोनाच्या परिणामानंतर सावरताना दिसली. रेड कार्पेटवर सेलिब्रिटी पुन्हा एकदा डिझायनर कपडे घालून अवतरले होते. या वेळी अनेक सेलिब्रिटींच्या कपडय़ांमध्ये सिम्पलिसिटी दिसली. डिझायनर्सनी जास्त एम्ब्रॉयडरी, खडे मोती या वर्कपेक्षा साध्या पण हटके  पद्धतीने ड्रेस डिझाइनवर भर दिला होता. अर्थात कारागिरांची या इंडस्ट्रीला जाणवत असणारी कमतरता हे यामागचं खरं कारण होतं. यामुळेच ड्रेस सुशोभित करणारे हे हात परत येईपर्यंत आपल्याला मिनिमल पद्धतीच्या फॅ शनचेच कपडे प्रामुख्याने दिसतील. आर्थिक खर्चावर आलेल्या मर्यादांचाही विचार डिझायनर्सनी के लेला दिसतो. कपडय़ावर जेवढे जास्त काम तेवढी त्याची किंमत जास्त होते. त्यामुळे हा महागडेपणा टाळून के लेल्या सिम्पल तरी क्रिएटिव्ह डिझाइन्स पॅरिस फॅशन वीकमध्ये बघायला मिळाल्या. यंदाच्या सीजनमध्ये अगदी सर्वसामान्यांना वापरता येतील अशा डिझाइन्सच बाजारात उपलब्ध होतील याची ही एकप्रकारे ग्लोबल नांदी होती. त्यामुळे याचा प्रभाव आपल्याकडच्या फॅशन शोजवर दिसणार हे नक्की!

ग्लोबल फॅ शन ट्रेण्ड्स बऱ्यापैकी देशभरातील छोटय़ा-मोठय़ा फॅ शन डिझायनर्सकडून फॉलो केले जातात. आपल्याकडच्या फॅ शन बाजारपेठेवर प्रभाव टाकणारा फॅ शन शो म्हणून ‘लॅक्मे फॅ शन वीक’ची ओळख असल्याने हाच ट्रेण्ड इथेही पाहायला मिळेल, असा फॅ शनच्या जाणकारांचा अंदाज आहे. लॅक्मे फॅशन वीक वर्षांतून दोनदा आयोजित के ला जातो.  करोनामुळे लागलेल्या ब्रेकनंतर लॅक्मे फॅशन वीकची पुन्हा दमदार सुरुवात झाली आहे. या सीजनचा शुभारंभ प्रसिद्ध फॅ शन डिझायनर तरुण ताहिलियानीच्या शोने झाला आहे. त्याने ‘द रीयुनिअन’ नावानेच आपलं कलेक्शन सादर करत खरोखरच फॅशन आणि ग्राहकांची पुनर्भेट घडवून आणली आहे.

गेल्या दोन दिवसांत या शोमध्ये भारतातील मोठय़ा फॅशन डिझायनर्सनी आपापली कलेक्शन्स सादर  केली आहेत. यंदा शो टॉपर म्हणून सेलिब्रिटीच्या उपस्थितीचा टक्का अंमळ वाढलेला दिसतो आहे. फॅ शन, सेलिब्रिटी, कलेक्शन्स, डिझाइन्स या गोष्टी गेल्या दीड वर्षांत आभासीच झाल्या होत्या जणू.. लॅक्मे फॅ शन वीकच्या निमित्ताने आभासातून बाहेर पडून हे विश्व पुन्हा झगमगून उठेल असा विश्वास वाटतो आहे.