गायत्री हसबनीस

गेल्या काही वर्षांत गणपतीच्या सजावटीत लक्षवेधी बदल होत आहेत आणि त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीला नेसवण्यात येणाऱ्या वस्त्रांचीही क्रेझ वाढते आहे. सध्या धोतर, साडय़ा आणि शेला या वस्त्रांना विशेष महत्त्व प्राप्त झालं असून गणपतीला सुरेख रंग आणि नक्षी असलेली वस्त्रं नेसवण्यात तरुणाई अग्रेसर आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

दरवर्षी गणपतीच्या आगमनाची वाट पाहणारी तरुणाई नेहमी त्याच्या स्वागतासाठी नवं काय करता येईल, याचा विचार करत असते. गणपतीच्या मूर्ती बनवणं असो किंवा त्याची आरास असो, सगळ्यात पुढाकार घेणारी तरुणाई या वर्षी त्याच्यासाठी सुंदर रंग आणि सुबक नक्षीकाम असलेली वस्त्रं बनवण्यात रमली आहे. गणपतीसाठी नक्षीदार धोतर बनवणं आणि ते नेसवणं हाही एक व्यवसाय असून यात अनेक मराठी- अमराठी तरुण कार्यरत आहेत. आपलं शिक्षण- नोकरी सांभाळून वर्षांतील पाच महिने ही मुलं गणपती मंडळांसाठी काम करतात. आत्मीयतेने केलेल्या या कामाला मान आणि धन दोन्ही मिळत असल्याने तरुणाईतला कलाकारही सुखावला आहे.

फॅशन डिझायनर असलेला आणि आजपर्यंत विविध मूर्तिकारांसमवेत व मंडळांसोबत धोतर बनवण्याचं काम केलेल्या प्रथमेश घाडगेने एक आवड म्हणून आपण या क्षेत्रात आल्याचं सांगितलं. ‘त्यातून पैसे कमवायचा माझा सुरुवातीला काही हेतूही नव्हता. मी फॅशन डिझायनर असल्याने माझ्या तांत्रिक ज्ञानाचा योग्य तो वापर यासाठी मला करता येतो. गणपतीच्या मूर्तीसाठी धोतर डिझाईन करताना त्याची बॉर्डर आणि त्यासाठीचं फॅब्रिकयात वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो. तसंच देवदेवतांची हत्यारं उदाहरणार्थ, त्रिशूल, चक्र, परशू किंवा स्वस्तिक, ओम अशी काही चिन्हं, जास्वंदीचं फूल जे गणपतीला प्रिय आहे, असे वेगवेगळे आकारप्रकार डिझाईन करून ते बॉर्डरवर काढले. धोतर बनवण्यासाठी शक्यतो ब्रोकेड, सॅटिन आणि पॉलिस्टर कापड, अगदी प्रिंटेड कापडही वापरलं जातं. मी मुख्यत: सिल्क आणि सॅटिनचं कापड वापरतो. शाल किंवा साडीही वापरतो आणि त्याला बनारसी टचही आहे’. बोल्ड प्रिंट, एम्बॉस प्रिंट, फोइल प्रिंट अशा काही तांत्रिक गोष्टी वापरून गणपतींच्या धोतराला थोडा वेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, मात्र लोकोंना गणपतीसाठी पारंपरिक वस्त्रंच जास्त आवडतात, असं निरीक्षणही त्याने नोंदवलं.

गणपतीसाठी धोतर डिझाईन करताना त्याच्याबरोबर शेलाही विचारात घ्यावा लागतो. धोतर आणि शेल्याची रंगसंगती एकमेकांना पूरक असली पाहिजे, असं तो म्हणतो. प्रथमेशकडे नवीन होतकरू तरुण मुलंही हे काम करायला आणि शिकायला येतात. त्याबद्दल तो सांगतो, ‘मी फेसबुकवरून माझ्या उपक्रमांची माहिती पोस्ट करतो. त्यामुळे मला खूप मुलांना यात रस आहे हे समजलं. ते मला स्वत: संपर्क करतात आणि आपली काम करण्याची इच्छा व्यक्त करतात’. गणेशोत्सवातील दहा दिवसांसाठी दहा वेगवेगळ्या रंगांचं धोतर नेसवलं जातं. आम्ही एप्रिलपासूनच या कामाला सुरुवात करतो. कारण फॅब्रिक, एम्ब्रॉयडरी आर्टिस्ट, अन्य कारागीर असे सगळेच यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे कपडय़ाची क्वॉलिटी पाठवणं, कटिंग्स पाठवणं ही कामं सुरूच असतात. साधारणपणे ही कामं आम्ही भाईंदर, ठाणे आणि लालबागवरून करतो, अशी माहिती प्रथमेशने दिली.

प्रथमेशसारखाच आपली नोकरी सांभाळून गणपती मंडळासाठी काम करणारा आकाश कुणकेरकरनेही त्याला या क्षेत्राची आवड असल्यानेच संबंधित लोकांशी संपर्क साधून काम शिकून घेतल्याचं सांगितलं. या क्षेत्रात आपल्या क्रिएटिव्हिटीचा कस लागतो, धोतरासाठी रंग, शेड्स हे आपणच निवडायचे असतात, असं तो म्हणतो. सध्या आपल्या मंडळाबरोबरच ‘केसरी मित्रमंडळ’ आणि इतर मंडळांच्याही गणपती मूर्तीला धोतर नेसवण्याचं काम गेली चार वर्ष करत असल्याचं त्याने सांगितलं. मूर्तीची बैठक, तिची रचना यावरून डिझाईन ठरवलं जातं. त्यासाठी मोजमाप करणं महत्त्वाचं असतं. गणपती मूर्तीच्या रचनेवरून त्याला धोतर कसं फिट करायचं हे हळूहळू कामातून आपण शिकत जातो, असं आकाश सांगतो. ‘सध्या मी धोतराच्या कापडात खूप प्रयोग करतो आहे. म्हणजे यंदा मी पेपर सिल्क, जपान सॅटिन असं कापड वापरतो आहे. हे कापड सर्वात सोयीस्कर ठरतं. कारण त्याला सहज घडय़ा पडतात. गोल्डकॉईन नावाचं एक कापड आहे, जे खूप जड असल्याने नेसवायला कठीण जातं. धोतराप्रमाणेच शेल्यालाही मागणी असते. अनेकदा शेला म्हणून साडय़ांचा वापर केला जातो. त्यासाठी नुसत्याच साडय़ा ठेवून उपयोग नसतो. त्याला बाजूने झालर के ली तरच त्याला तसा लुक येतो. बनारसी शालू, पैठणीसारख्या भरजरी वस्त्रांतूनही शेला डिझाईन करता येतो’, अशी माहिती आकाशने दिली.

लालबागमध्ये सहा वर्षांपूर्वी जेव्हा गणपतीच्या मूर्तीला धोतर नेसवण्याची कल्पना विकसित झाली तेव्हापासून धोतर नेसवण्यात पटाईत असलेल्या सूरज मोरे या तरुण कलाकाराने आपला वेगळा अनुभव मांडला. ‘मी केवळ उत्सुकतेपोटी सुरुवात केली होती. पहिल्यांदाच मला मांडी घालून बसलेल्या गणपतीच्या मूर्तीवर धोती नेसवायची होती. हे अवघड होतं, पण गेली तीन वर्ष हे काम करून करून आता मला कोणत्याही प्रकारच्या मूर्तीवर सहजपणे धोतर नेसवता येणं शक्य झालं आहे’, असं तो म्हणतो. गणपतीच्या मूर्तीसाठी धोतर, फेटा आणि अन्य सजावटीत आपलं योगदान देण्यासाठी तरुण मुलं-मुली उत्सुक असतात. मला दिवसांतून असे तीन-चार फोन येतातच. खासकरून कांदिवली- बोरिवलीसारख्या ठिकाणांहून ही मुलं येतात. विशेष म्हणजे आम्ही त्यांना मानधन देण्यासाठी तयार असतोच; परंतु ही मुलं स्वत:हूनच मानधनाचा विचार न करता फक्त नावीन्यपूर्ण कल्पनांनुसार काम करण्यासाठी उत्सुक असतात, अशी माहिती सूरजने दिली.

या क्षेत्रात दरवर्षी तरुणांची संख्या वाढते आहे आणि त्यात वेगळेपणाही दिसतो आहे. धोतर डिझाईन करणं आणि नेसवणं या कामात टिकणं सहज शक्य आहे, कारण कामं स्वीकारायला लागल्यावर मोठमोठय़ा मंडळांची कामंही मिळत जातात, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचं मतं आहे. मोठय़ा मंडळांसाठी हे काम करताना कलेचं समाधानही मिळतं आणि आर्थिक मोबदलाही चांगला मिळतो. त्यामुळे अत्यंत सर्जनशील तितक्याच आव्हानात्मक आणि आवडत्या अशा या कामात तरुणाई मोठय़ा प्रमाणात रमलेली दिसते.

इरकल साडीचे मखर

‘सर्वागी आर्ट्’तर्फे इरकलच्या साडय़ांपासून मखर बनवण्यात आले आहेत. नयन सावंत, हर्षद सावंत आणि संदेश गावकर यांची ही मूळ संकल्पना आहे. स्वत: कमर्शियल आर्टिस्ट असलेले संदेश गावकर सांगतात, ‘झी मराठी’वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिके पासून प्रेरित होऊन आम्ही इरकलच्या साडय़ांच्या मखराची संकल्पना विकसित केली. यात प्रामुख्याने आम्ही पितांबरी रंगाच्या छटा वापरल्या, म्हणजेच पिवळा, लाल, केशरी हे रंग जे सहज उठावदार दिसतात आणि आकर्षित करतात. त्याला गणपतीच्या मूर्तीमागे कसं उभं करायचं यावरही पहिल्यांदा विचार केला. कारण त्यानंतर आम्हाला ग्राहकांना मखर देतानाही काही अडचणी येणार नाहीत, पॅक क रून पाठवलेले मखर उघडल्यानंतर ते गणपतीच्या मूर्तीमागे सरळ उभं राहिलं पाहिजे याची काळजी आम्ही घेतो’. महाराष्ट्राबाहेर दिल्ली, मध्य प्रदेश तसेच ऑस्ट्रेलिया येथेही त्यांचे मखर पोहोचवले जातात. सुरुवातीला या मखराची किंमत पाच हजार रुपये एवढी होती आणि आता आम्ही ती तीन हजार रुपये केली आहे, जेणेकरून ती स्वस्त दरात लोकांना उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं. ‘खरं तर थर्माकोल पर्यावरणाला हानीकारक आहे म्हणून त्या जागी आम्ही इरकलच्या साडय़ांचं मखर डिझाईन केलं. या मखरांसाठी दिवसाला शंभर फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्ताच त्यांची तीनशेपेक्षा जास्त मखर बुक झाली असून अ‍ॅमेझॉनवरही ही मखरं उपलब्ध करून दिली असल्याचं संदेश यांनी सांगितलं. लखोटय़ासारखी या मखरांची रचना असून त्याचा मधला भाग लाकडाचा आहे. इरकल साडय़ांचं डिझाईन असलेला हा लाकडी लखोटा मेटलच्या स्टॅण्डवर उभा करण्यात येतो. यावर लाकूड किंवा बांबूचीच छत्रीही डिझाईन करून देण्यात येते, असं त्यांनी सांगितलं. कुठलेही मोठं भांडवल न उभारता सुरू केलेला हा उद्योग आपापला कामधंदा सांभाळूनच करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पहिल्यांदा जी मुलं येतात ती आम्ही ज्या कल्पना मांडल्या आहेत, त्यावर काम सुरू करतात. जसं काम वाढत जातं तसं त्यांना दिवसागणिक पाचशे ते हजार रुपये आम्ही देतो. त्यातून ते कोणत्या मंडळांसाठी काम करताहेत, मूर्तीची उंची किती आहे, यावरही त्यांचं मानधन ठरतं. शिवाय, त्यांचं डिझाईन आणि काम त्या त्या मंडळांना आवडलं तर त्यांना धोतर डिझाईन करण्यापासून ते नेसवण्यापर्यंत सगळी जबाबदारी दिली जाते

– प्रथमेश घाडगे

मूर्तीच्या हिशोबाने म्हणजे तिच्या रंगानुसार आम्ही डिझायनर किंवा प्लेन कापड घेतो. सॅटिन, गोल्डकॉइन आणि ब्रोकेड हे फॅ ब्रिक धोतरासाठी सर्रास वापरलं जातं.त्यातही १५ ते २० शेड्स असतात. शालीचं व्यवस्थापन हाही एक गमतीशीर भाग असून धोतराच्या लेसच्या रंगांनुसार आम्ही शाल चढवतो. धोतर डिझायनिंगचा हा ट्रेण्ड अजूनही नवीन आहे. दोन फुटांच्या गणपतीचं धोतर बनवण्यासाठी साधारण दीड हजार रुपये दिले जातात

– सूरज मोरे.