विनय नारकर viva@expressindia.com

जी धुता येते ती ‘धोती’ इतकी साधी व्याख्या आहे धोतराची. हजारो वर्षांपासून भारतीय पुरुषांना मोहवणाऱ्या या वस्त्र-प्रकाराबद्दल गेल्या भागात आपण थोडं जाणून घेतलं, आता आणखी थोडं जाणून घेऊ.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

माधवराव पेशव्यांच्या ४/१२/१७६६ च्या पत्राला एक विशेष महत्त्व आहे. या पत्रात त्यांनी धोतराच्या काठावर नक्षी कशी असावी हे प्रत्यक्ष काढून दाखवले आहे. ‘खास धोत्रजोडे पैठणी जरीच्या काठाचे, काठास वेल याप्रमाणे निमोणा कागदावर लिहून दिला होता त्यापैकी काही तयार होऊन आले असतील तर पाठवणे व पुण्यातील सावकारजवळ नसतील तर आणून खरेदी करून पाठविणे तूर्त एक दोन जे मिळतात ते पाठविणे’. (पेशवे दप्तर ३२ सन १७६६)

पेशवेकाळात पैठणी (साडी आणि धोतर) सर्वार्थाने बहरले, कारण अनेक स्तरांवर या कलेस राजाश्रय मिळाला. धोतराची रचना पाहता, जी काही कलाकुसर धोतरावर करायची ती काठांवरच होते. बाकी धोतराच्या अंगावर बुटे वगैरे नसतात. त्यामुळे काठानुसारच धोतराचे प्रकार होत गेले. सुती धोतरं ही शुभ्र गुलाबी किंवा मोतिया रंगाची असत. त्यांचे काठ फक्त रंगीत असत. लाल, केशरी, हिरव्या, निळ्या किंवा काळ्या रंगात हे काठ असत. काठांची रुंदीही कमी-जास्त असे. त्यावरूनही धोतरांचे प्रकार होत. काही उंची सुती धोतरांचे काठ रेशमी असत. सहसा धोतरांच्या काठावर साडय़ांच्या काठाचीच नक्षी विणलेली असे. त्यामुळे रूईफुल काठ, गोमेकाठ, कळसपाकी, मोतीचूर, खसखशी किंवा करवत काठ असे निरनिराळे शोभिवंत काठ धोतरांना असत. याच काठांच्या नावाने धोतरांचे प्रकार ठरत. ही नक्षी सहसा सुताने विणलेली असे व क्वचित रेशमानेही विणलेली असे.

धोतराच्या काठांना ‘धारी’ असेही म्हणतात. ‘रुक्मिणीहरण’मध्ये ‘त्या धोतरांच्या विलसेत धाऱ्या’ असा उल्लेख आला आहे. काठ असणाऱ्या धोतरांना ‘धारीदार धोतर’ असे म्हटले जाते. धोतराच्या जाड काठांना ‘धटी’ असेही म्हणतात. ते काठ जर रेशमी किंवा जरतारी असतील तर त्यांना ‘धडी’ असे म्हटले जाते. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, कधी काळी प्रसिद्ध असलेले येवल्याचे अर्ध फरस नक्षी धडीचे धोतर. सगळ्यात मोठय़ा सुईला ‘दाभण’ म्हणातात. त्या दाभणा इतक्याछोटय़ा आकाराच्या काठांना ‘दाभणकांठी’ धोतर म्हटले जाते. याशिवाय, काळ्या किंवा लाल रंगाच्या काठांचे ‘गंगा सागरी’ किंवा ‘सागरी’ धोतरही असायचे. धोतराचे दोन्ही काठ वेगवेगळ्या रंगाचे असलेले ‘गंगाजमनी’ धोतरही लोकप्रिय होते. दुसरा बाजीराव त्याच्या रंगेल जीवनपद्धतीसाठी व छानछोकीसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या नावाने एक धोतराचा प्रकार प्रसिद्ध झाला होता. चांगले दीड फुटी काठ असलेल्या या धोतराचे नाव होते, ‘बाजीरावी धोतरजोडा’!!

धोतरांच्या काठांचे सर्व प्रकार साडय़ांच्या काठांप्रमाणेच असायचे हे आपण पाहिले, पण दोन काठ असे होते की जे फक्त धोतरालाच असायचे. ते काठ म्हणजे चिंचपानी काठ, हे चिंचेच्या पानांसारखे असायचे आणि दुसरे म्हणजे ‘दाभण काठ’. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नागपूर भागात विणले जाणारे धोतर उपरणे त्याच्या उच्च दर्जासाठी प्रसिद्ध होते. याची सुरुवात नागपूरच्या भोसले घराण्यामुळे झाली. साधारण १७७५ साली मुधोजीराव भोसलेंनी नागपूरजवळील उमरेड या गावी खास धोतरजोडे व उपरणे विणण्यासाठी उत्तेजन दिले. याच दरम्यान मुधोजीराव भोसल्यांनी इथे किल्ला बांधून घेतला. नागपूर भागात विणले जाणारे धोतर आणि उपरणे इथल्या मराठा दरबाराची गरज भागवू लागले. उमरेडला विणले जाणारे धोतर व उपरणे हे थ्री शटल पद्धतीने विणले जात असे. ही धोतरे करवत काठी असायची आणि उपरणे ही रूईफुल काठी असायची. या धोतर उपरण्याला लागणारं सूत ढेर समाजातील लोक कातून देत असत आणि हे विणले जायचे कोष्टी विणकरांकडून. उमरेडची ८० टक्के  लोकसंख्या ही विणकरांची होती. इथल्या हातमागाला उतरती कळा लागल्यानंतर बेरोजगार झालेल्या या विणकरांनी घरगुती खाणावळी सुरू केल्या, हीच ती प्रसिद्ध ‘सावजी’ खाणावळ. ही धोतर उपरणी उच्च दर्जाच्या सुतापासून विणली जात. हे सूत भारतातील सर्वोत्तम सुतापैकी एक होते. उमरेडची ही धोतर उपरणी एक प्रकारे मराठी संस्कृतीचे प्रतीक बनली होती.

१८०३ साली राजा रधोजी भोसले दुष्काळग्रस्त पैठणमधील काही विणकरांना नागपूरला घेऊन गेले. त्यातल्या काही विणकरांनी पैठणी पितांबर विणण्यास सुरुवात केली. ब्रिटिश आमदानीत मँचेस्टरच्या कपडय़ांचं व्यवस्थित वितरण झालं. भारतीय वस्त्रांचं खच्चीकरण व्यवस्थितपणे इंग्रजांनी सुरू केलं. तिथल्या इतर कपडय़ांप्रमाणे ‘काळ्या काठाचं अतितलम शुभ्र मँचेस्टर धोतर’ व इतरही साध्या धोतरांनी इथली बाजारपेठ काबीज केली. त्याचा परिणाम म्हणून भारतीय हातमागावर विणली गेलेली धोतरं मागे पडत गेली. धोतराला आणखीही काही नावं होती. काही समानार्थी शब्द आहेत तर काहीएक थोडे फार वेगळे प्रकारही आहेत. छोटय़ा धोतराला आंगोशा म्हणत. डिगोजी व दंडिया अशीही नावं होती धोतराला. जाडय़ाभरडय़ा धोतराला ‘खाचर’ असे म्हणत. विशेष प्रसंगी नेसण्याच्या धोतराला ‘पुडवें’ म्हणत, तर बाहेर जाताना नेसल्या जाणाऱ्या धोतरास ‘बहीरवास’ असे म्हणत. धोतर हे एक अखंड वस्त्र आहे जे अभिजन व जन नेसत. अभिजनांच्या धोतराची लांबी व नेसण्याची पद्धत थोडी वेगळी असते. अभिजनांच्या नेसण्यात जास्त निऱ्या, चुण्या, पदर असतात. शक्यतो समोरच्या बाजूला हे जास्त असल्याने व पायघोळ असल्याने अभिजनांचे नेसणे भरीव दिसून येते. अशा घोळदार नेसण्यासोबत सोगा हा सोडलेला असतो. हा सोगा जेव्हा मागे घेऊन खोचला जातो त्यास काष्टा, कासोटा किंवा काचा मारणे म्हटले जाते. अभिजनांना काचा मारण्याचा प्रसंग क्वचित असायचा. तो म्हणजे घोडेस्वारी करताना किंवा सायकलवर बसताना.

अशा घोळदार नेसण्याची आणखी एक तऱ्हा प्रसिद्ध होती ती म्हणजे हरिदासी. हरिदासी म्हणजे कथेकरी किंवा कीर्तन करणारे लोक. हे सहसा रेशमाचे मोठे काठ असलेले धोतर नेसत. या नेसण्यामध्ये रेशमाचे मोठे काठ वर काढून पायघोळ निऱ्या जमिनीवर दोन पायांच्या दरम्यान लोळू दिल्या जात. त्यामुळे हे नेसणे देवतांच्या नेसण्याप्रमाणे दर्शनीय होत असे. बहुतांशी मराठय़ांचे धोतर नेसणे म्हणजे दुटांगी धोतर. या नेसण्यात दोन्ही पाय पूर्णपणे झाकले जातात. या नेसण्यात एक प्रकारचा सुरक्षितपणा असून तितकीच ऐटही असते. पाश्चात्त्य प्रभावाने जेव्हा शहरी जन वेगाने आपली जीवनपद्धती बदलत, धोतराऐवजी पतलुनी नेसू लागले होते, त्या काळात बऱ्याच जणांनी दुटांगी नेसणे अंगीकारून धोतर टिकवून ठेवले होते. या महत्त्वाच्या धोतर नेसण्याच्या पद्धतींमध्ये काही छोटे-मोठे बदल होऊन काही प्रकारही अस्तित्वात आले होते. त्यानुसार काही शब्दप्रयोगही रूढ होते. पुढे गाठ मारून नेसलेल्या धोतरास ‘आडबंद धोतर’ असे म्हटले जायचे. जेव्हा धोतर नेसताना अपुरा काष्टा घातला जायचा त्याला ‘अडकाष्टा’ म्हटले जात असे. जेव्हा धोतर लांबीला लहान असायचे त्यास ‘अडधोतर’असे म्हटले जात असे. स्नानास जाताना सहसा धोतर गुंडाळून खांद्यावर घेतले जायचे, ‘धोतराची भाळ घेणे’ असे त्यास म्हटले जात असे. त्याचप्रमाणे धोतर जेव्हा डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या हातावर घेतले जायचे त्याला ‘बाहळ घेणे’ म्हणत असत. धोतर अंगावरून घेण्याचीही एक पद्धत होती. अंगावरून धोतर घेऊन गळ्यामागे गाठ मारून ते नेसले जात असे. त्या नेसण्यास ‘गळगट बांधणे’ म्हटले जात असे. सहसा लहान मुले असे नेसत असत. गळगट बांधणे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वरांची छबी येते. अशाच प्रकारे जेव्हा पासोडी नेसली जात असे, त्यास ‘पचंग बांधणे’ म्हटले जात असे. याची लांबी कमी असून, नेसणे कमरेपर्यंतच येत असे.

धोतर गुडघ्याच्या वर नेसले जाणे शिष्टाचारसंमत नव्हते. त्यास ‘नटंगे’ असे म्हटले जात असे. आणखी एक गोष्ट शिष्टसंमत नव्हती ती म्हणजे नाभीखाली धोतर नेसणे. असे धोतर नेसणाऱ्यास ‘नळपटनारायण’ किंवा ‘नळपटय़ा’ अशा शेलक्या विशेषणांनी हिणवले जात असे. शतकानुशतके टिकून असणाऱ्या या पेहरावामुळे मराठी भाषेतही काही वाक्प्रचार व म्हणींची भर पडली आहे. गरीब मनुष्यास ‘एकधोतरी’ म्हटले जात असे. त्यावरून ‘एकधोतरी महाक्षेत्री’ अशी म्हण पडली आहे. याचा अर्थ, गरीब पण फार लबाड असा होतो. ‘धोत्र होड जाल्यारि गोत्र होडा जात्तावे?’ अशीही म्हण आहे, म्हणजे धोतर मोठे असले म्हणून गोत्र मोठे होत नाही. याचाच अर्थ, मनुष्याची योग्यता पोशाखावरून नाही तर गुणांवरून ठरते. धोतर सोडून नाचणें या वाक्प्रचाराचा अर्थ आनंदाने बेहोश होणे, उच्छृंखलपणे वागणे असा होतो. तसेच धोतरांत निखारा बांधणे म्हणजे अनिष्ट अशी जबाबदारी पत्करणें. याशिवाय, जानवे धोतर फाडणे म्हणजे डोक्यांत राख घालणें किंवा निर्लज्ज, बदफैली होणें. काष्टय़ावरूनही काही वाक्प्रचार आहेत. एखादा माणूस ‘काष्टय़ाचा बळकट’ असणे म्हणजे तो उत्तम चारित्र्याचा असणे. याउलट, ‘पोकळ काष्टय़ाचा असणे’ म्हणजे व्यभिचारी किंवा बाहेरख्याली असणे. एक मजेशीर वाक्प्रचार पितांबराबद्दलही आहे, ‘नागमोडीचा पीतांबर नेसणे’ म्हणजे नागवे असणे. इतके बहुढंगी बहुरंगी आपले धोतर, इतक्या वर्षांची परंपरा असलेले आणि व्यक्तिमत्त्वास उठाव देणारे.. आपले धोतर, आपण स्वत:स यापासून का वंचित ठेवावे?

लोकसाहित्यातही धोतराबद्दलचे प्रेम दिसून येते. या काही ओव्यांमध्ये धोतराच्या प्रकारांचाही उल्लेख येतो.

रेशीमकाठी धोतरजोडा, पदर जरीदार माझा नेसला तालेवार भरताराचं सुख सांगते गोतामंदी अष्टीच्या धोतराची केली सावली शेतामंदी भरल्या बाजारात ओळखीते चातुराला माझ्या बंधुजीच्या रंग कैलासी धोतराला काही पारंपरिक उखाण्यांमध्येही धोतराचा उपयोग केला गेला आहे.

करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी ——— रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी

पिवळ्या पितांबरामध्ये सोडले सोगे ——— राव गणपतीच्या पुजेला उभे.