मैत्रेयी मराठे

शाळकरी वयापासून मला सौरऊर्जा, शाश्वत ऊर्जाप्रणाली इत्यादी संदर्भात काम करायची इच्छा होती. त्यामुळे मी कर्नाटकातील सुरथकलमधील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (NITK) संस्थेत विद्युत अभियांत्रिकीमध्ये (इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) बी.टेक केलं. मला एस. एन. बोस शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्ती अंतर्गत मे ते जुलै २०१७ मध्ये इंजीनियरिंगचं तिसरं वर्ष संपल्यावर मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कांसिन-मॅडिसन’मध्ये प्रा. गिरी वेंकटरमणन यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर्नशीप केली. प्रा. गिरी यांचा संशोधन गट मायक्रोग्रिड्सवर काम करतो. मायक्रोग्रिड म्हणजे आपल्या देशभरात असलेल्या विद्युतग्रिडसारखंच, पण त्याची व्याप्ती ४-५ घरं किंवा एका गावापुरती असते. भारतामध्ये बऱ्याच गावांमध्ये दिवसातले काहीच तास वीजपुरवठा होतो आणि काही गावांत तर फक्त नावापुरत्या विद्युततारा आहेत, वीजपुरवठा अनियमित असतो किंवा होतच नाही. अशा गावांमध्ये सौरऊर्जा, जल विद्युत अशा ऊर्जा स्रोतांद्वारे मायक्रोग्रिडस् हा शाश्वत उर्जा मिळवण्याचा उपाय आहे. प्रा. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ‘पॉवर इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्टर’चा प्रोटोटाईप तयार केला. त्यावरचा पेपर ‘इंजीनियरिंग कन्व्हर्जन काँग्रेस अ‍ॅण्ड एक्सपोझिशन’ या परिषदेमध्ये निवडला गेला. ही परिषद अमेरिकेत होती आणि तेव्हा मी म्हैसूरमध्ये काम करत असल्याने प्रा. गिरी यांनी हा पेपर तिथे प्रेझेंट केला.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

प्रा. गिरींच्या संशोधन गटाने म्हैसूर येथील ‘सेंटर फॉर रिन्युएबल एनर्जी अ‍ॅण्ड सस्टेनेबल टेक्नॉलॉजी’मध्ये मायक्रोग्रिड उभारले आहेत. या तंत्रज्ञानाची भारतात खरी गरज आहे. प्रा. गिरी यांनी मला बी.टेकचं शिक्षण संपल्यावर तिथे इंटर्नशिप करायचा सल्ला दिला. त्यांचा  पीएचडीचा विद्यार्थी आश्रय मणूर हाही तिथे काम करत होता. आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या दहा गावांमध्ये सर्वेक्षण केलं आणि आमच्या मायक्रोग्रिड तंत्रज्ञानात आणखी काय फीचर्स हवे आहेत, याची नोंद के ली. दरम्यान, मला हे तंत्रज्ञान आणखी शिकण्यात आणि त्यात संशोधन करण्यात रस वाटू लागला. प्रा. गिरीही मला त्यांच्या संशोधन गटात सहभागी करून घेण्यास उत्सुक होते. परदेशात इंटर्नशिप झाल्यावर प्लेसमेंट न घेता एमएससाठी अर्ज न करता मी वर्षभर म्हैसूरमध्ये विनास्टायपेंड काम करायचं ठरवलं. हा माझा निर्णय चाकोरीबाहेरचा होता. कित्येकजणांनी मला आणि माझ्या घरच्यांना ‘हा वेडेपणा आहे’, असं बजावलं. या कालावधीत घरच्यांनी मला आर्थिक आघाडीवर मदत केली, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिकदृष्टय़ाही खंबीर पाठिंबा दिला. घरचे आपल्या पाठीशी आहेत, या आश्वासकतेमुळे इतरांच्या प्रश्नांच्या फैरींनी माझा आत्मविश्वास डगमगला नाही.

पुढे जुलै २०१९मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कांसिन-मॅडिसन’ इथे मी ‘मास्टर्स इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग-बाय रिसर्च’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. युनिव्हर्सिटीत अर्ज करण्याच्या प्रक्रियेत एमएससाठी माझ्याआधी तिथे गेलेल्या मित्रमैत्रिणींची खूप मदत झाली. या सगळ्या प्रक्रियेतही घरच्यांचा अर्थातच पाठिंबा होता. ‘पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी’ हा माझा विशेष अभ्यासाचा विषय आहे. ‘विस्कांसिन इलेक्ट्रिक मशीन अ‍ॅण्ड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कॉनसोर्टिम’ या संस्थेच्या लॅबमध्ये मी काम करते. पॉवर आणि एनर्जीच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी ही एक संस्था आहे. संस्थेला ८० हून अधिक कॉर्पोरेट संस्था आयोजक म्हणून लाभल्या आहेत. तर मायक्रोग्रिड या संकल्पनेचा जन्म ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कांसिन-मॅडिसन’मध्ये झाला आहे.

मी समर टर्ममध्येच इथे आले; कारण प्रा. गिरी यांना ‘इंट्रोडक्टरी एक्सपिरीयन्स इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग’ या अभ्यासक्रमासाठी एका टीचिंग असिस्टंटची गरज होती. टीचिंग असिस्टंटट म्हणून काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी आणि आणखी एक पदवीधर विद्यार्थी हे काम करत होतो. इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षांचे विद्यार्थी हा अभ्यासक्रम घेत असल्याने त्यांना विद्युत अभियांत्रिकीच्या मूलतत्त्वांपासून सगळ्या गोष्टी शिकवायला लागल्या. इथल्या आणि भारतातल्या विद्यार्थ्यांमध्ये एक फरक प्रकर्षांने जाणवला की, भारतातले अनेकजण अभ्यासशाखा निवडतात ती घरच्यांच्या दबावाखाली किंवा दुसरीकडे प्रवेश मिळाला नाही म्हणून.. त्यामुळे अभ्यासात रस घेऊन स्वत:हून नवीन गोष्टी करून, प्रयोग करून शिकण्याची वृत्ती कमी विद्यार्थ्यांंमध्ये आढळते. दुसरा मुद्दा म्हणजे संवादकौशल्य! मी शिकवत होते ते विद्यार्थी पहिल्या वर्षांचे असूनही प्रत्येकाने प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनच्या दिवशी आपलं काम उत्साहाने, मोजक्या शब्दांत आणि ऐकणाऱ्यांना रस वाटेल अशा भाषेत समजावलं. आपल्याकडचे विद्यार्थी याबाबतीत मागे पडतात.

समर टर्म संपेपर्यंत मी एका अपार्टमेंटमध्ये तीन अमेरिकन अंडरग्रॅज्युएट विद्यार्थिनींबरोबर राहिले. त्या माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारायच्या आणि अमेरिकन लाईफस्टाईलविषयीच्या माझ्या सगळ्या बावळट प्रश्नांची उत्तरं न हसता द्यायच्या. मी हे सबलेट अपार्टमेंट फेसबुकवर शोधलं होतं. प्रत्येक शहराचा फेसबुकवर एकतरी सबलेट अ‍ॅण्ड रुममेट ग्रुप असतो. त्यावर सेकंडहॅण्ड फर्निचरची विक्रीही केली जाते. फॉल टर्म सुरू झाल्यापासून मी ‘एनआयटीके’मधील एक मैत्रिणीबरोबर अपार्टमेंटमध्ये राहते आहे. भारतात असतानाच आम्ही इंटरनेटवरून हे अपार्टमेंट शोधलं होतं. मॅडिसनमधल्या मित्राने तिथे जाऊन ते व्हिडिओकॉलवर आम्हाला दाखवलं होतं आणि आम्ही ऑनलाईन लिझवर सही केली होती. आमच्या विद्यापीठाची ओळख अमेरिकेतल्या लोकांसाठी ‘पार्टी कॉलेज’ अशी आहे. मात्र हे वाचून हुरळून जाऊ नका! या पार्टीमध्ये बरेचसे अंडरग्रॅज्युएट विद्यार्थीच सहभागी होतात. ग्रॅज्युएट आणि त्यातही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संशोधन प्रकल्पांतून डोकं वर काढून बघायला फारसा वेळ नसतो. फारच कंटाळा आला की मी मित्रमैत्रिणींबरोबर मेंडोटा तळ्याकाठी जाते. तिथे प्रसिद्ध असणारं डेली स्कूप आईस्क्रीम खात दूरवर तरंगणाऱ्या नावांकडे आणि आईस्क्रीमच्या आशेपायी जवळच पोहणाऱ्या बदकांची मजा पहात वेळ छान जातो. कधीकधी तळ्याकाठी जॉगिंगही करायला जाते, पण आता थंडी वाढली असल्यामुळे तो बेत रद्द करावा लागतो. शिवाय अपार्टमेंटच्या बेसमेंटमधल्या जिममध्येही जाते.

इंटर्न असताना इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षांची विद्यार्थिनी होते. तेव्हा मी एखादी छोटीशी गोष्ट केली तरी; उदाहरणार्थ- एखादी संकल्पना समजण्यासाठी जास्तीचं वाचन करणं, नवीन कल्पना सुचवणं वगैरे गोष्टींचं लॅबमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कौतुक वाटायचं. आता पदवीधर विद्यर्थिनीने या गोष्टी करणं हे अपेक्षित असून, त्या मी अगदी मन:पूर्वक करते आहे. रिसर्च प्रोजेक्ट आणि कोर्सेस सांभाळून या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, लॅबमध्ये व्हिजिटर आल्यावर त्यांना प्रोजेक्टसंबंधी प्रेझेन्टेशन देणं, निधी संकलनासाठी संधी शोधणं, विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धांसाठी अर्ज करणं अशा अनेक गोष्टीही मी करते आहे. इथे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करणं किंवा प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. आमच्या अभ्यासक्रमाची आखणी इतकी सुयोग्य पद्धतीने करण्यात आली आहे की, त्यामुळे या क्षेत्रातल्या सध्याच्या घडामोडी हमखास कळतात. केवळ वर्षांनुवर्ष वापरलं जाणारं तेच ते तंत्रज्ञानावर भर देणं ही गोष्ट केव्हाच मागे पडली आहे. प्राध्यापक प्रश्नांना, शंकाना नीट उत्तरं देतात आणि चर्चा करायला कायम तयार असतात.

मध्यंतरी प्रा. गिरी यांनी मला विद्यापीठामध्ये होणाऱ्या ‘जेंडर अ‍ॅण्ड क्लाएमेट चेंज’ वर्कशॉपमध्ये आमच्या कामाबद्दल आणि भारतातल्या सर्वेक्षणांबद्दल बोलायला सुचवलं. बाकीच्या कामातून वेळ न मिळाल्यामुळे मी आदल्या दिवशी दुपारी तयारीला सुरुवात केली. आश्रयच्या मदतीने प्रेझेन्टेशन स्लाईड्स-भाषण तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ते सादर केलं. इथे आल्यावर केलेलं हे माझं पहिलंच प्रेझेन्टेशन होतं. त्याच्या तयारीला २४ तासांहून कमी अवधी मिळाला होता. आश्रय आणि प्रा. गिरी यांच्या मदतीमुळे मी हा प्रसंग निभावला आणि श्रोत्यांना हे सादरीकरण आवडले ही विशेष गोष्ट.

पुण्यात असताना कधी स्वयंपाकघरात न फिरकणारी मी इथे रेस्तरॉमधल्या पदार्थांच्या किंमती बघून स्वत:च स्वयंपाक करायला लागले आहे. इथले लोक क्षुल्लक गोष्टींसाठी ‘थँक्य’, ‘सॉरी’ म्हणतात आणि ते मला फारसं रुचत नाही खरंतर. पण हळूहळू मीही दुकानदार, बस ड्रायव्हरकाका, रेस्तरॉमधले कर्मचारी यांना ‘थँक्यू’ म्हणायला लागले आहे. अभ्यास आणि प्रोजेक्टचं काम असल्यावर कधीकधी झोप आणि व्यायामावर परिणाम होतो. त्यासाठी स्वयंशिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन या गोष्टी माझ्या अंगवळणी पडणं गरजेचं आहे. इकडे दरवर्षी एका मराठी विद्यार्थ्यांच्या अपार्टमेंटमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव असतो. या वर्षी गणपतीच्या दिवसांत मला घरची आणि पुण्यातल्या गणेशोत्सवाचीखूप आठवण आली. या सार्वजनिक गणपतीबद्दल कळलं आणि मी दोनदा संध्याकाळच्या आरतीला गेले. ते वातावरण अनुभवून खूप प्रसन्न वाटलं. हा अभ्यासक्रम संपल्यावर इथे पीएचडी करावी की मास्टर्सनंतर शिकणं थांबवावं, याचा विचार अजून सुरू आहे. पुढल्या काळात मला शाश्वत उर्जा प्रणालीबाबत काम करणाऱ्या संशोधन गटासोबत काम करायला खूप आवडेल.

कानमंत्र

* के वळ जीआरई, टोफेल परीक्षांवरच भर न देता स्टेटमेंट ऑफ पर्पज, लेटर ऑफ रेकमेंडेशन, अंडरग्रॅज्युएटचे गुण आदी मुद्देही प्रवेशासाठी विचारात घेतले जातात. त्यामुळे त्यावरही मेहनत घ्यायला हवी.

* अर्ज करण्याइतकंच महत्त्व विद्यापीठ आणि अभ्यासक्रम निवडीला द्यावं. ज्या अभ्यासक्रमाविषयी विचार करत असाल, त्याविषयी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांंशी समाजमाध्यम किंवा ईमेलने संपर्क साधून त्यांचे अनुभव जाणून घ्या.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com