आयुष्यात किमान एक ‘बीएफएफ’(बेस्ट फ्रेण्ड फॉरएव्हर)असायलाच हवा. अनेकांसाठी तो असतोच. पण ही अशी घट्ट मैत्री होते कशी? यांचं उत्तर कधी एक असं नसतं. कुणी म्हणतं.. मैत्री आपोआप होते, बंध जुळायला कारण लागत नाही, कुणी म्हणतं, आवड, स्वभाव जमला नि वेव्हलेंथ जुळली की जुळतं.. तर कुणासाठी बंध जुळायला एखादी घटना किंवा परिस्थिती महत्त्वाची ठरते आणि तिथेच समोरची व्यक्ती क्लिक होते. तुमच्या आमच्यातल्या ‘जय-वीरू’ला शोधण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या मैत्रीच्या सेलिब्रेशनच्या कथा..

अन्न, वस्त्र, निवारा आणि मित्र या आपल्या जीवनातील मूलभूत गरजा आहेत. बेस्ट फ्रेंडशिवाय लाइफ अगदी बोअरिंग, रटाळ होतं. मज्जा, मस्ती आणि काहीतरी शेअर करायला असा एक तरी जिवश्च-कंठश्च यार तर पाहिजेच. दरवर्षी येणाऱ्या फ्रेण्डशिप डेच्या निमित्ताने आपण आपल्या अशाच बेस्ट बडीज्सोबत हा दोस्तांचा दिवस एंजॉय करतो. कोणी मूव्हीला जातं, कोणी एकत्र दिवसभर आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत हँगआउट करतं. एखाद्याच्या मैत्रीकडे पाहून आपणही म्हणतो.. ‘यार! असा मित्र हवा.’ असा जीवाभावाचा सखा मिळतो कसा? ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे.’ म्हणणाऱ्या जय-वीरूची गोष्ट ‘शोले’मुळे अजरामर झाली. प्रत्येक दोस्तीची काही कहाणी असते का?
मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातल्या नम्रता आणि निशिता यावर त्यांची गोष्ट सांगतात. ‘ज्युनियर कॉलेजचं पहिलंवहिलं वर्ष होतं. इकॉनॉमिक्सच्या एका प्रोजेक्टमुळे आमची ओळख झाली. घट्ट मैत्री होण्याची स्टेज सांगायची झाली तर.. काही महिने नम्रताला एका मुलाकडून हरॅसमेंट होत होती. मी माझ्या मित्रांना या गोष्टीविषयी सागितलं. तेव्हा माझ्याही नकळत मी स्ट्राँगली तिच्या पाठीशी उभे राहिले. इमोशनली अटॅच होण्याची हीच ती वेळं असावी..’ निशिता सांगते. त्यावर नम्रता म्हणते, ‘मैत्री व्हायला कोणतंही कारण पुरतं. ती घट्ट होत जाते, एकमेकींचे स्वभाव उलगडत जाताता तशी. ज्युनियर कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघी कॅन्टीनमध्ये सतत खादडायचो. निशिताही आपल्यासारखी खवय्यी आहे, तेव्हा कळलं. पण तिला डायबेटिस डिटेक्ट झाल्यापासून तिचं खाणंपिणं कमी होत गेलं. डायबेटिस झाला यात तिचा दोष नाही. एकदा आमच्या कॉलेजच्या सभागृहात भाषण करताना तिला चक्कर आली.. कसलाही विचार न करता मी तिच्याजवळ गेले आणि तिचं स्पीच पूर्ण होईपर्यंत मी तिथेच उभी राहिले. तिच्यासाठी सर्वात जास्त वेळ मीच टाळ्या वाजवल्या.’ निशिता पुढे सांगते, ‘नम्रताच्या या कॉन्फिडन्समुळेच केवळ आम्हाला त्या वेळी अ‍ॅप्रिशिएट केलं. एकदा मी आजारी पडले. एक्झाम्सही जवळ येत होत्या. नम्रताने मला हॉस्पिटलमध्ये रेकॉर्डेड नोट्स पाठवल्या. रोज ती मला मिस करायची. आम्ही भेटलो त्या दिवशीचं आमचं युनिक सेलिब्रेशन अजून आठवतंय. माझी तब्येत सुधारत होती. त्यामुळे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चक्क दोन प्लेट पाणीपुरी खाल्ली. ते आमचं कितीतरी दिवसानंतरचं खरं सेलिब्रेशन होतं.’ नम्रताच्या मते, डायबेटिसबद्दल लोकांमध्ये आणखी अवेअरनेस हवा. आज निशितासाठी तिचं हेल्थ हेच पॅशन आहे. योग्य आहार, योगा, जीमही करते. तिला मी तिचं इन्सुलिन कसं घ्यायचं हेदेखील शिकवलं. कॉलेजमध्ये सगळे बघायचे, पण मी त्याचा विचार नाही केला. त्यात कसलाही कमीपणा नाही.’
फ्रेंडशिपची अशीच युनिक डेफिनेशन सांगणारा आणखी एक महाविद्यालयीन युवक ओंकार म्हणतो.. मैत्री ही कायम टिकणारी तर आहेच, पण त्यात वर्षांनुवर्ष असणारी ट्रान्स्परन्सी महत्त्वाची असते. वीरेन, आदेश आणि मी शाळेत पहिलीत असल्यापासूनचे मित्र आहोत. आम्ही एकाच सोसायटीत राहणारे.JV त्यामुळे सतत एकत्र. एकत्र राहिल्यामुळेच सगळ्यांच्या पर्सनल लाइफपासून ते रिलेशनशिप्सपर्यंत सगळं अगदी तोंडपाठ.. बाइकस् घेऊन फिरायला आम्हाला खूप आवडतं. अशा ड्राइव्हला जाण्यामधून आमची मैत्री वाढली. ती आता दहा वर्षांत अगदी घट्ट झाली आहे. वीरेन आणि आदेशच्या म्हणण्यानुसार आम्हा सगळ्यांना एकमेकांचे स्ट्राँग आणि वीक पॉइंटस् माहिती आहेत. आमची मैत्री साजरी करण्यासाठी फ्रेंडशिप डेची गरज नसते. आमच्या मैत्रीच्या युनिक सेलिब्रेशनचा एक किस्सा आहे. ओंकार सांगतो. ‘बऱ्याच वर्षांपूर्वी एका मकरसंक्रांतीला रुटीनमधून बाहेर पडून आम्ही तिघंही टेरेसवर गेलो. पतंग उडवायला.. मज्जा मस्ती करत अख्खा दिवस संपला. त्या दिवशी इतकी मजा आली की शेवटी एका फोटोने त्या दिवसाची आठवण कायम जपून ठेवली. तो दिवसच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.. इट मीन्स अ लॉट टू मी! दर वर्षांतून एक हा अस्सा फूट डे एंजॉय केल्याचा फोटो. हे आमचं सेलिब्रेशन! या अशा सेलिब्रेशनसाठी कुठे दूर जायची आवश्यकता नाही. केवळ एकमेकांची सोबत आणि साथ महत्त्वाची.’
मैत्रीची परिभाषाच वेगळी असते. रुइया कॉलेजच्या मुस्कान, केतकी आणि सांचिती. त्यांच्या मते एखादी व्यक्ती आपल्यात खूप बदल आणू शकते. आपलं व्यक्तिमत्त्व घडवूही शकते. आम्ही तिघी एकमेकींसाठी आदर्श आहोत. कॉलेजच्या वातावरणात नेहमीच चांगली मैत्रीण मिळते असं नाही. ‘बॅक बीच’ करणं हा प्रकार काही नवीन नाही. तसा काहीसा अनुभव केतकीला आला. आपल्यामागे आपल्याबद्दल काय बोललं जातं, हे समजल्यावर तिला वाईट वाटलं. ‘हे कोणाबरोबर तरी तिला शेअर करावंसं वाटलं तिनं ते आमच्याशी केलं आणि आम्हीही त्याचा बाऊ केला नाही. ती अगदी मनस्वी मुलगी आहे. तिचा बिनधास्तपणा कमाल आहे. मैत्रीण जितकी धमाल असेल तितकी ती अधिकच आवडायला लागते.’ असं मुस्कान आणि सांचिती सांगतात. ‘आमच्या आठवणीत फक्त आनंदी आणि मजेदार किस्सेच आहेत. आम्हा तिघींनाही सेल्फी काढायला आवडतं. डोक्यात कधीही सेल्फी काढण्याचं भूत चढतं. आमच्यात यूनिकनेस म्हणजे आमच्या मैत्रीत जे आहे जसं आहे ते स्वीकारणं. एकमेकींना सहन करणं, समजून घेणं. त्यातून रोजचं जगणं हे एक सेलिब्रेशन आहे, हे पटतं.’ या तिघी एका सुरात सांगतात तेव्हा त्यांच्या मैत्रीतला निर्भेळ आनंद आपल्यालाही साजरा करावासा वाटतो.

-गायत्री हसबनीस