गायत्री हसबनीस

रोज सकाळी उठून नवा अजेंडा ठरवणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे. एकेकाळी नोकरी, रोजगार यामध्ये अडकलेली ही पिढी आता मात्र नुसतीच घडय़ाळाशी बांधलेली ही कामाची लाइफस्टाइल बदलून नव्या संधी शोधते आहे. स्वत:चं काही तरी वेगळं करिअर घडवू पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कामातून मानसिक आणि आर्थिक समाधान देणाऱ्या करिअरचा शोध घेणाऱ्या या तरुणाईच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, विचार, मेहनत सगळ्याचंच स्वरूप बदलतं आहे. नवा प्रवाह तरुणांमध्ये रुजतोय. त्यांना फक्त एमबीए, डॉक्टर, इंजिनीयर होण्यापेक्षा वेगळ्या वाटा धुंडाळाव्याशा वाटतायेत. अशाच काही ‘आऊट ऑफ द बॉक्स’ करिअर करणाऱ्या तरुणांची ही झलक..

थिएटरमध्ये रंजकता तर असते पण एक करिअर म्हणून निवडतानादेखील त्यात नवेपणा शोधला आहे तो ‘थिएटर फ्लेमिंगो’ नावाच्या चमूने. हा थिएटर ग्रुप स्वत: नाटकं बसवतो, पण त्यांची नाटकं पाहायला कुठल्याही नाटय़गृहात प्रेक्षकांना जावं लागत नाही, त्यांनी बसवलेल्या नाटकांसाठी तिकीटही नाही. ‘थिएटर फ्लेमिंगो’ तुमच्या घरी येतो, त्यांनी बसवलेले नाटकं तुमच्यासमोर सादर करतो. प्रेक्षकांची संख्या जास्तच असली पाहिजे अशीही त्यांची इथे अपेक्षा नाही, अगदी एक किंवा दोन प्रेक्षक संख्या असली तरी त्यांचे नाटक सादर होतेच. सोशल मीडियावरून तुम्हाला निमंत्रणही मिळतं. ‘जितका आपण मोबाइल जवळ नेतो तितकं कमी अंतर; म्हणजे प्रेक्षागृहात नाटकं बघताना जे अंतर असतं त्याच्या १ फुटापेक्षाही कमी अंतर प्रेक्षकांमध्ये व कलाकारांमध्ये असतं. इतकं लाइव्ह ते प्रेक्षकांना दिसतं. त्यातून आज लाइव्ह कलाकृती पाहण्याची गरजही आहे,’ असं या ग्रुपचा सदस्य अमेय मोंडकर सांगतो. ‘एक थिएटर ट्रॅव्हलर म्हणून आम्ही गावागावातही जातो किंबहुना गेलो आहोत. आम्ही महाराष्ट्र दौराही केला आहे. गावात नाटकं लगेचच आपलीशी होतात. त्यामुळे नाटकांद्वारे माणसांशी जोडता येतं. नाटकं पाहणारे शहरातही आहेतच, त्यामुळे वेगळ्या मानसिकतेचे लोकही नाटकाद्वारे एकत्र येतात. गावोगावात फिरणं म्हणजे नवीन प्रयोग करणं येतंच. आम्ही एका गावात ‘हयवदन’ हे नाटक चित्रातून दाखवलं होतं. नव्या संकल्पना शोधणं आणि त्या नाटकाद्वारे निर्माण करणं हा थिएटर फ्लेमिंगोचा भागच आहे,’ असंही तो सांगतो. मुळात नाटकं करण्यामागचा आजच्या तरुणांचा नक्की उद्देश काय हे थिएटर फ्लेमिंगो आपल्याला सांगतो. नाटकातून बोध होतो व प्रभावही पडतो. थिएटर फ्लेमिंगोतून लोकांमधला संवाद वाढायला लागला आहे. ‘आमचं नाटक पाहण्यासाठी जे १५-२० जण येतात ते आमच्याकडे येण्याच्या निमित्ताने गप्पाही मारतात. आम्ही नाटकाच्या शेवटी परिसंवाद ठेवतो. त्यातून नव्या विचारांची देवाणघेवाण होते. अगदी घरच्यासारखंच वातावरण इथे निर्माण होतं. आम्ही प्रेक्षकांसोबत जेवतोदेखील. इतका थिएटर फ्लेमिंगो हा ओपन आहे. आम्ही एका फॅमिलीच्या घरी नाटक ठेवलं होतं. त्या दिवशी त्याच घरातली काही मंडळी आमच्या नाटकाच्या निमित्ताने दोन वर्षांनी त्या घरी एकत्र आली. एकप्रकारे थिएटर फ्लेमिंगोच्या रूपाने संवाद वाढवण्याचा उद्देश सफल होतो आहे,’ असा अनुभव अमेय सांगतो. थिएटर फ्लेमिंगोची  नाटकं अमोल पालेकरांनीही पाहिली. सध्या हा ग्रुप पुण्यात प्रयोग गाजवतोय. मुळात थिएटर फ्लेमिंगोला यातून काहीच मिळवायचं नाही. नाटक झाल्यावर प्रेक्षक त्यांच्या कामाची पोचपावती त्यांच्या झोळीत टाकतात. पैसे कितीही मिळू देत, पण तिथे एक वेगळी गंमत आहे. आज नाटकाच्या प्रॉडक्शनला चिंता असते की नाटक तिकीटबारीवर किती चालेल. थिएटर फ्लेमिंगोला याचीही चिंता नाही. प्रेक्षकांना कलाकाराची कदर असते त्यामुळे थिएटर फ्लेमिंगोला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळते.

अगदी तरुण वयात एक वेगळीच करिअरची वाट शोधली प्रियंका आजगावकर हिने. टॅरोट कार्डवरून तिच्या समवयस्कांच्या आयुष्याशी निगडित त्यांच्या समस्या शोधण्याचा, त्यांवर उपाय देण्याचा, सूचना देण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा ध्यास आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील तरुणांच्या युगात तिने घेतलाय. ‘मी या प्रोफेशनकडे वळले कारण घरची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि इतर ताणतणाव मला सोडवायचे होते. प्रत्येक माणसाची जगण्याची मांडणी, शारीरिक समस्या, आर्थिक समस्या, नात्यांतील समस्या फार वेगळ्या आहेत. समाजात काहींच्या मते आमच्यासारखे हीलिंग करून समस्या सोडवतात. हीलिंग करणं हे खरंच खूप कठीण काम आहे. गोष्टी सेन्स करणं, ही विद्या शिकून घेतल्यानंतर हीलिंग जरी जमलं तरी त्यात तुमच्याकडे ‘सायकिक पावर’ जन्मत:च असणं गरजेचं असतं. या प्रोफेशनमध्ये तुमचं शिक्षण प्रचंड महत्त्वाचं ठरतं,’ असं प्रियंका सांगते. प्रियंकाने मानसशास्त्र व समाजशास्त्र या विषयांत पदवी मिळवली आहे. ‘माझ्या प्रोफेशनमध्ये वेगळेपण आहे. टेरॉट कार्ड पाहणं, हीलिंग करणं म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम तयार करणं आहे. समाजाला मदत करणं व आयुष्यात प्रत्येकाने प्रगती करणं हा माझा या व्यवसायामागील मूळ उद्देश आहे.

अगदी माझ्या घरातल्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत लोक माझ्याकडे येतात. या प्रोफेशनमध्ये तुम्हाला लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. तो विश्वास नुसता पैसा दिल्यावर येत नाही तर त्यांच्याशी संबंध वाढवण्याने होतो,’ असं ती सांगते. ट्रीटमेंट देताना प्रियंका ४० दिवस पेशंटना तिच्या कडक नजरेखाली ठेवते. त्यांचा पूर्ण भूतकाळ, त्यांच्या समस्या आणि मानसिकता तपासते. त्यांच्या आयुष्याशी निगडित महत्त्वाच्या तारखा, वेळ समजून घेते. चेहरा, पेशंटची प्रकृती आणि प्रवृत्तीचा प्रियंका अभ्यास करते. या कामात योग्य शिक्षण मिळणं गरजेचं असतं. आजकाल गुगलवर शिकून घेऊन पैसे कमवून फसवणूक करणारेही आहेत कारण रूढ समजुतीप्रमाणे हे काम म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यमच वाटतं. इथे एक चूकही खूप महागात पडते. शिक्षणाबरोबरच तुमच्यातली ताकदही महत्त्वाची असते तरच हीलिंग जमू शकतं. या प्रोफेशनमध्ये दोन व्यक्तींच्या विचारांची, शक्तीशी देवाणघेवाण होते कारण इथे माणसांच्या आयुष्याशी आपण खेळ करू शकत नाही,’ हेही ती स्पष्ट करते. प्रियंकाला लामा फेरा, ओटो रायटिंग, पेट हीलिंग, ड्रिम अ‍ॅनालिसिस, चॅनेलिंग ओरा हीलिंग, चक्र हीलिंग या कला अवगत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियातून ‘मास्टर इन थिएटर आर्ट्स डिझाइन’  हा अभ्यासक्रम पूर्ण करून डिझाइन, फिल्म व कॉस्च्यूम यात चांगला हात असणारी तरुणी म्हणजे नीरजा पटवर्धन. ती स्वत: आर्ट डिरेक्टर, कॉस्च्यूम डिझायनर, ज्वेलरी डिझायनर आहे. ती दगडापासून ज्वेलरी डिझाईन करते. छंद म्हणून एखाद्या गोष्टीकडे समाज पाहत असेल तर त्याच गोष्टीकडे नीरजा प्रोफेशन म्हणून पाहते. दगड, तारा आणि कापड यातून ज्वेलरी डिझायनिंग करत त्यातील सौंदर्य आपल्यापरीने ती फुलवते आहे. ‘दगड जमवणं हा माझा लहानपणापासूनचा छंद होता. मी विविध आकारांचे दगड, शंखशिंपले गोळा करायचे. इतक्या दुर्लक्षित केलेल्या गोष्टींचं मला काही तरी सुंदर बनवायचं होतं. मग ज्वेलरीलर मी ठाम राहिले. मला मार्केटमधील त्याच त्याच ज्वेलरीचा कंटाळा आला होता. टिपिकल डिझायनिंगमधून बाहेर पडायचं होतं. मी ज्वेलरी करणार तर चार जण करतात तशी नाही. लोकांना टिपिकल ज्वेलरीतनं वेगळं काही परिधान करण्याची सवय नाही. इथे मला वेअरबेल ज्वेलरी बनवायची होती. ती विकली जाईल की नाही हा पुढचा प्रश्न पण डिझायनिंग करण्यावर माझा भर होता.’

नीरजाने आत्तापर्यंत १२ ते १३ वेगवेगळ्या आणि युनिक दगड व तारांपासून तयार केलेल्या ज्वेलरीज आणल्या आहेत. ‘नी’ या नावांतर्गत ती तारा, मेटल्स, कॉपर, ब्रास आणि जर्मन सिल्व्हर यापासून तिच्या कल्पनेतून आलेल्या ज्वेलरी तयार करते. वेगळवेगळ्या जाडीच्या व बारीक तारा वापरून तारांपासून कलाकुसर कशी होईल यावर तिचा भर आहे. ‘मी फिल्म्सच्या कामानिमित्ताने जंगलात आणि इतर ठिकाणी फिरले, त्यामुळे तिकडे छोटय़ा आणि मुख्य म्हणजे विविध आकारांचे दगड मी जमा केले. त्यातून मी योग्य त्या तारा शोधल्या व त्यातून मी ज्वेलरी तयार करत गेले’. ‘दगड पाहिला की त्याला अ‍ॅप्रिशिएट करणं त्यातून त्या दगडातून एक आकर्षक वस्तू बनवताना नवी प्रेरणा मिळत जातेच आणि एक करिअर म्हणूनही न पाहता मी हे काम म्हणजे माझं व्यक्त होण्याचं माध्यम समजते,’ असं ती म्हणते. नीरजाने ‘म्हादई’ (टँंी्रि) नावाचं कलेक्शन काढलं आहे त्यातील कलेक्शन पार्ट १ तिने लॉन्च केलंय तर पार्ट २ ती लॉन्च करणार आहे. तिच्या कलेक्शनविषयी ती सांगते, ‘माझ्यासाठी तारा, कापड किंवा दगड प्रत्येकाला एक वळण, प्रवाह आहे ज्याचं सुंदर डिझाइन तयार होऊ  शकतं. नदी जर मी तारांच्या बाबतीत शोधली तर नदीप्रमाणे तार कशी दिसेल त्याचं डिझायनिंग करून तसं स्केचिंग केलं, अशा प्रेरणा मी शोधते आणि त्यातूनच ज्वेलरीच्या कल्पना सुचतात.’

नीरजाच्या डोक्यात सतत तारा आणि दगड असतात. तिच्या मते अनकट व अनपॉलिश गोष्टींवर काम करायला तिला आवडतं, त्यासाठी नव्या कामगारांशीही सतत तिची भेट होतेच. ‘आपले शिक्षण डिझायनिंगमध्ये झाले आहे, आपल्याला तंत्र माहीत आहे, मग त्याचा वापर मला माझ्या आवडीच्या गोष्टींवर करायचा होताच. माझा मुख्य उद्देश म्हणजे मला स्वत:ची स्टाईल विकसित करायची होती. लोकांनी जे डिझाइन म्हणून वेगळं काहीच पाहिलं नाहीये ते मी करतेय. यात नवेपण आहे, रोज नवीन शिकण्यासारखं आहे, नवा आणि वेगळा प्रवास आहे.’ नीरजा एकाच वेळी भरपूर गोष्टी करते. ती डिझायनिंग स्कूलमध्ये कॉस्च्यूम डिझाइन शिकवते. तिच्यामते एखादी व्यक्ती खूप गोष्टी एकाच वेळी करते म्हणजे मन आनंदी व फ्रेश राहतं.

आपल्याकडे स्पर्धा खूप आहे पण त्यात नावीन्य नाही. नावीन्य तरुणांना हवं असतं. आज पैसे मिळवताना पॉकेट मनीचा विचार केला जातो. तरुणांना रडत पैसे न कमवता, ऑफिसमध्ये न जाता त्यांच्या स्वबळावर पैसे कमवायचंही असतात ही एक बाजू असताना आता पैसा महत्त्वाचा न वाटून त्यांना त्यांच्या स्वबळावर मिळवलेलं समाधान, त्यातून त्यांनी स्वत:च शोधलेली संधी, माणसं कमावणं हा विचार तरुणांना आवडतोय.

viva@expressindia.com