मितेश रतिश जोशी

अवघा भारत देश हा मंदिर स्थापत्याच्या बाबतीत श्रीमंत आहे. कुठल्याही राज्यात जावे तिथे एखादे तरी देखणे, सुंदर मंदिर आपले स्वागत करते. मंदिरांवर कोरलेला ‘कला खजिना’ सफरनाम्यात अधिकच आनंद देतो.

भारतामध्ये धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी देवळांत जाऊन पूजाअर्चा करणं, अभिषेक करणं, निरनिराळय़ा फुलांनी मंदिर सजवणं या गोष्टींपलीकडे फारसं काही केलं जात नाही. वास्तविक, आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरं ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत. त्यांच्यावर कोरलेली विविध प्रतीकं, मूर्ती त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात, त्या दृष्टीने प्रत्येकाने मंदिर पाहायला हवं. मंदिर, मंदिरातील मूर्ती, मंदिरात असलेल्या विविध गोष्टी या काही विचार करून निर्मिलेल्या असतात. मंदिरावर असलेली अनेक प्रतीकं, चिन्हं, शिल्पं आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. मंदिर हे केवळ देवाचं निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे. इथं अनेक लोकांचा सतत वावर होत असल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, तत्त्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी मंदिरांची, त्यावरील शिल्पांची आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली असं म्हणता येईल.

मंदिराचा सफरनामा करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे मंदिराचं प्रथम बाह्य दर्शन घ्यावं, असं सांगितलेलं आहे. आधी बाहेरून प्रदक्षिणा घालावी आणि नंतर मंदिरात प्रवेश करावा. मंदिरांवरील शिल्पांची रचनासुद्धा तशीच केलेली आहे. विविध प्रतीकं जी मंदिरांवर कोरलेली दिसतात, ती माणसाच्या आयुष्यातील विविध प्रसंग, गोष्टी यांची आठवण करून देणारी असतात. भारतातील एक अत्यंत देखणं मंदिर म्हणून ज्यांची नावं डोळय़ासमोर येतील त्यातलं एक म्हणजे मध्य प्रदेशमधल्या खजुराहो इथलं कंदारिया महादेव मंदिर! खजुराहो हे खरं तर मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातलं एक लहानसं गाव, परंतु इथं असलेल्या एकापेक्षा एक देखण्या मंदिरांमुळे हे गाव आज जगाच्या नकाशावर आलेलं आहे. चंदेल राजवटीच्या काळात इथं ८५ मंदिरं होती, असं सांगितलं जातं. सध्या फक्त २५ मंदिरं इथं उभी आहेत. इथं असलेल्या मंदिर समूहाला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. कंदारिया महादेव मंदिर हे त्यातलंच एक देवालय. अतिशय देखणं आणि मंदिर स्थापत्याच्या सगळय़ा खाणाखुणा आपल्या अंगावर अभिमानाने मिरवणारं हे मंदिर डोळय़ांचं पारणं फेडतं. मंदिर स्थापत्याबरोबरच खजुराहो मंदिरावर असलेलं मूर्तिकाम हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. इतकं देखणं आणि मोठय़ा प्रमाणावर असलेलं मूर्तिकाम दुसरीकडे कुठे क्वचितच बघायला मिळेल. कंदारिया महादेव मंदिराच्या बाह्य भागावर अतिशय देखणं मूर्तिकाम केलेलं आहे. या मंदिरावर असलेल्या देवकोष्ठात म्हणजेच कोनाडय़ात विविध देवदेवता, अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असं म्हणतात अशांच्या मूर्ती आहेतच, पण मुद्दाम बघाव्यात अशा अग्नी, ब्रह्मा यांच्या मूर्ती, तसेच गणपती आणि वीरभद्र यांच्यासमवेत सप्तमातृकांच्या मूर्ती हे इथलं खास आकर्षण आहे.  

कर्नाटकमधील हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरात भौतिकशास्त्रातील पिनहोल कॅमेरा तंत्र सर्वाचंच लक्ष वेधून घेतं. मंदिराच्या मागच्या बाजूला बाहेर पडण्यासाठी जे द्वार आहे त्याच्या अलीकडे उजव्या बाजूला एक छोटीशी अरुंद खोली असून त्या खोलीच्या भिंतीला चुन्याचा गिलावा दिलेला दिसतो. एका बाजूच्या समोरच्या भिंतीला एक भोक पडले असून त्याच्या पलीकडे या मंदिराचं १६० फूट उंचीचं भव्य गोपूर आहे. गोपुरावरून आलेले सूर्यकिरण त्या छिद्रातून समोर असलेल्या भिंतीवर पडतात. किरण छिद्रातून जाताना समोरच्या गोपुराची उलटी प्रतिकृती या पांढऱ्या भिंतीवर पडलेली दिसते. भौतिकशास्त्रात असलेल्या पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञानाचा इथं मोठय़ा खुबीने वापर केलेला दिसतो. हे केवळ आश्चर्यच म्हणावं लागेल. तत्कालीन स्थपतींना या तंत्राची माहिती होती, त्यांनी ते मंदिरात वापरलं आणि येणाऱ्या लोकांनी आवर्जून पाहावं अशी व्यवस्थासुद्धा करून ठेवलेली दिसते.

कोणतीही कला ही तत्कालीन समाजाचं प्रतीक असते. तत्कालीन समाजजीवनाचं प्रतिबिंब त्या त्या कलेत पडलेलं अगदी प्रकर्षांने दिसतं. अंदाजे हजार वर्षांपूर्वीच्या समाजजीवनाचं आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर देवालयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथं गज, अश्व, वराह, मेष आदी प्राणी तसेच आंबा, काजू, केळी, द्राक्षाचे घड अशी विविध फळंसुद्धा या मंदिरावर पाहायला मिळतात. ध्यानस्थ योगी आहेत, उत्तान सौंदर्य दाखवणाऱ्या ललना आहेत, ढगळ पोशाख परिधान केलेले विविध प्रवासी इथे दिसतात, त्याचबरोबर दिगंबर साधकांची शिल्पंसुद्धा इथं कोरलेली आहेत. त्या काळच्या शिल्पकारांना जे जे काही दिसलं असेल ते ते त्यांनी मंदिरावर कोरून ठेवलेलं लक्षात येतं.   

देशाच्या विविध भागांत राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी वेगवेगळय़ा काळांत मंदिरं बांधली. प्रत्येकाला स्वत:चं असं अस्तित्व निर्माण करायचं होतं, त्यामुळे विविध शैली तयार करण्यात आल्या. आपल्या पुराणात मंदिर बांधणीच्या ४५ शैली सांगितल्या आहेत. त्यातील प्रमुख शैली चार आहेत. नागर (उत्तर भारत), भुमिज (महाराष्ट्र, माळवा, राजस्थान), द्राविड (दक्षिण भारत) आणि वेसर (दक्षिण कर्नाटक) इत्यादी. याव्यतिरिक्त ओडिसा प्रांतातील शैली वेगळी, बंगाल प्रांतातील शैली वेगळी आहे, हे विसरूनही चालणार नाही.    

मंदिर स्थापत्यशास्त्र अभ्यासासाठी अनेक जण भारतातल्या समृद्ध मंदिरांना भेट देत असतात. तरुणांचे अभ्यास दौरेही यानिमित्ताने वाढत आहेत. परिणामी, ट्रॅव्हल कंपन्यांनासुद्धा तशा सहली आयोजित कराव्या लागत आहेत. पुणे येथील फिरस्ती हेरिटेज स्टडी टूर आणि हेरिटेज वॉक या ट्रॅव्हल कंपनीचा शंतनू परांजपे त्याचा सहलीचा अनुभव सांगताना म्हणाला, ‘आजकाल अशा सहलींना उत्तम गर्दी होते. हम्पी, खजुराहोसारख्या मंदिर फिरस्तीला खूप मागणी आहे. इंस्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून जेव्हा मी वेगवेगळय़ा मंदिरांची माहिती देतो तेव्हा तरुणाई ते व्हिडीओ अत्यंत आवडीने पाहते, अनेक जणांना शेअरसुद्धा करते. माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल असलेलं प्रेम आणि त्याबद्दल वाढत चाललेली जाणीव याचा यात महत्त्वाचा वाटा आहे. हे सर्व जपण्याचं काम ही तरुण पिढीच करणार आहे यात काही शंका नाही. गंमत म्हणजे या मंदिरांवर अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी परदेशी मंडळी अधिक उत्सुक असतात. एकदा हळेबीडू येथे असताना एका ग्रीक जोडप्याला मंदिरात फिरताना पाहिलं. सोबत कुणी गाइड नव्हता. त्यामुळे सहज विचारलं की ‘‘रामायण/महाभारत ऐकलं आहे का?’’ तर चक्क हो म्हणाले. मग मी म्हटलं या ग्रंथातील काही शिल्पं दाखवतो. पुढील अर्धा तास ते जोडपं मी दाखवत असलेली विविध शिल्पं पाहात होतं, समजून घेत होतं आणि नोट्स काढत होतं. योग्य तिथं प्रश्न विचारत होतं. कधी कधी असं वाटतं की आपलीच संस्कृती समजून घेण्यात आपली जिज्ञासा कुठे कमी पडते का? असा सवाल उपस्थित करतानाच हळूहळू हे चित्र बदलतं आहे आणि मी याबद्दल प्रचंड आशावादी आहे, असंही शंतनू म्हणतो. पुढील दहा वर्षांत मंदिरांचा कला खजिना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दहा पटीने वाढलेली असेल, हे तो खात्रीने सांगतो.      

अनेक बारीकसारीक गोष्टी आपल्याला मंदिर कसं पाहावं हे शिकवतात, आपल्या बुद्धीला चालना देतात, आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात. मंदिर स्थापत्यामध्ये असलेले बारकावे अभ्यासू लागलो की त्यामागची कलाकाराची दृष्टी, त्यामागचं तत्त्वज्ञान ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ समजून येते. आणि नवं काही तरी समजून घेण्याची ही ऊर्मीच या मंदिरांच्या सफरीवर निघण्यास फिरस्त्यांना भाग पाडत असेल.

viva@expressindia.com