मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकेले ही तय करने होते हैं, कुछ सफर.. हर सफर में हमसफर नहीं होते!  फिरायला सर्वानाच आवडतं, प्रत्येकाच्या फिरण्याच्या दिशा वेगळय़ा असतात, तऱ्हा वेगळय़ा असतात, अनुभव वेगळे असतात. म्हणूनच तरुण तुर्काच्या फिरस्तीचा अनुभव आणि फंडा जाणून घेण्यासाठी ‘सफरनामा’ हे सदर दर पंधरवडय़ाला..

आपला भारत देश हा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं एक प्रतीक आहे. या देशातील भव्य ऐतिहासिक गावांमधून आणि शहरांमधून हा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा विखुरलेला आहे. पिढी दर पिढीतील विविध लोक आणि वंशांनी ही ऐतिहासिक गावं आणि शहरं उभारण्यात नुसतं योगदान दिलं आहे असं नव्हे तर हा वारसा अधिक समृद्ध केला आहे. आर्थिकदृष्टय़ा शाश्वत आणि एकसंध देश निर्माण करण्यात संस्कृती आणि वारसा हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांच्या संवर्धन आणि जतनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ‘हेरिटेज वॉक’ या माध्यमातून ही संस्कृती आणि वारसा येणाऱ्या पिढय़ांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो हा महत्त्वाचा भाग आहेच. मात्र गेल्या काही वर्षांत या ‘हेरिटेज वॉक’ प्रकाराने फिरस्तीच्या अध्यायातही महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे ‘सफरनामा’ या सदराची सुरुवात ‘हेरिटेज वॉक’ या नव्याने प्रचलित झालेल्या भटकंतीच्या प्रकाराने करूया..

शहराचं महत्त्व, जडणघडण आणि जुन्या शहरांची ओळख शहरात येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना आणि भावी पिढीला होण्याच्या दृष्टीने वारसास्थळांची सफर म्हणजेच हेरिटेज वॉक हा उपक्रम  राबविण्यात येतो. पूर्वी ज्याप्रमाणे मुंबई दर्शन किंवा पुणे दर्शन आयोजित केलं जायचं. त्याचप्रमाणे जुनं शहर त्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भातून पाहण्याच्या दृष्टीने हेरिटेज वॉक आयोजित केले जातात. हेरिटेज वॉक हे भारतामध्ये मुंबई, पुणे, बंगळूरु, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, नाशिक, औरंगाबाद, भोपाळ अशा विविध ठिकाणी होतात.

पुणे येथे ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून अनुराग वैद्य गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वारसास्थळांच्या अभ्यास सहली आयोजित करतो आहे. वारसा सहलींची पर्यटनविश्वाला गरज का आहे? या प्रश्नापासूनच अनुराग या विषयावर बोलायला सुरुवात करतो. ‘विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुंदर ऐतिहासिक वास्तू किंवा इमारतींजवळून जात अनेक लोक दररोज त्यांचं कार्यालय, शाळा किंवा त्यांचं पोहोचण्याचं ठिकाण गाठत असतात. मात्र जायची घाई त्यांना या वास्तूंकडे निरखून पाहण्यासाठी अजिबात सवड देत नाही. आपल्या गावाचा किंवा शहराचा वारसा असलेल्या वास्तू, इमारती हा त्या ठिकाणाचा इतिहास सांगत असतात. हेरिटेज वॉक हे देशातील परिचित आणि अपरिचित वारसा वास्तूंच्या समृद्धीचे अन्वेषण करण्याचा एक सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे’ असं अनुराग म्हणतो. स्थानिकांशी चांगले संबंध निर्माण करत, शहरातील किंवा गावातील ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी आवश्यक अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवायचा. त्या माध्यमातून शहराचा इतिहास, त्याचा चेहरामोहरा घडवण्यात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यात हेरिटेज वॉक मोलाची भूमिका बजावतं, असंही त्याने नमूद केलं.

गूढ सफर  

भुताखेतांच्या दंतकथा ज्या वास्तूंशी वा जागांशी जोडल्या गेल्या आहेत त्याविषयी एक उत्सुकता कायमच लोकांच्या मनात असते. मात्र अशी काही ‘ऐतिहासिक भुतांनी पछाडलेली’ वारसास्थळंही लोकप्रिय आहेत. या वारसास्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आता या अशा झपाटलेल्या ऐतिहासिक वारसा स्थळांचं पर्यटन हा नवाच प्रकार रूढ होऊ पाहतो आहे. ‘दिल्ली पर्यटन खात्याकडून घेण्यात येणाऱ्या हेरिटेज वॉकच्या यादीत दिल्लीतील सर्वात झपाटलेल्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी दिल्लीतील अनेक ऐतिहासिक वास्तू त्यांच्या इतिहासापेक्षा ‘ऐतिहासिक भुतांनी पछाडलेल्या’ असल्याच्या समजुतीमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हे सगळे हेरिटेज वॉक रात्रीच्या अंधारात होतात आणि अनेक पर्यटकांमध्ये यासारख्या हेरिटेज वॉकविषयी स्वारस्य असल्याचं लक्षात आलं आहे’ असं अनुरागने सांगितलं. या हेरिटेज वॉकची सुरुवात चाणक्यपुरीजवळील १४ व्या शतकातील ‘मालचा महल’पासून करण्यात येते. त्यानंतर भूली भटियारी का महल, फिरोजशाह कोटला, तुघलकाबाद किल्ला यासारख्या रहस्यमय कथा असलेल्या ठिकाणांना भेट दिली जाते. मुळात म्हणजे अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक लोकाग्रहास्तव सुरू केले गेले आहेत. पर्यटकांनी अशा स्वरूपाच्या झपाटलेल्या वास्तूंच्या कथांमध्ये विशेष रस दाखविल्याने प्राधान्याने या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. अद्याप संशोधक व आयोजक यांच्याकडून वास्तूंच्या गूढ, अनभिज्ञ पैलूंविषयी शोध घेणं सुरू आहे. त्यामुळे केवळ रंजकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्यात येतं आहे. किंबहुना अशा वॉकमध्ये सहभागी होणाऱ्यांना नेमकी काय माहिती सांगावी, त्या वास्तूचं महत्त्व लक्षात घेत त्याची सफर माहिती आणि रंजकता दोन्ही दृष्टीने कशी घडवता येईल यासाठीचं निश्चित धोरण आखण्याचं काम सुरू आहे. ‘अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक प्रथमच इतक्या उघडपणे भारतात दिल्लीमध्ये करण्यात आले आहेत. या स्वरूपाचे हेरिटेज वॉक पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील काही ऐतिहासिक झपाटलेल्या वास्तूंच्या मागे नेमकं कोणतं गूढ दडलेलं आहे ते जाणून घेणे मनोरंजक ठरेल. यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. जिज्ञासा हा मनुष्याचा मूलभूत गुण आहे. म्हणूनच गूढ, अकल्पित कथा, सिनेमा ऐकण्या – वाचण्याकडे अधिक कल असतो.  त्याचप्रमाणे रहस्यमय कथा असणाऱ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तशाच प्रकारची उत्सुकता इच्छुकांमध्ये दिसते’ असं अनुरागने सांगितलं. 

हेरिटेज वॉक आयोजित करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. मुख्य म्हणजे त्या वास्तू योग्य पद्धतीने माहिती असायला हव्यात. कोणतीही ऐतिहासिक वास्तू हा फक्त त्यामागच्या इतिहासाची उजळणी इतपत मर्यादित नसते. या वास्तू आपल्याला काही न काही गोष्ट नक्कीच सांगायचा प्रयत्न करत असतात. तत्कालीन बांधणी आणि रचनेवरून त्या वास्तूच्या इतिहासाचे अनेक पैलू उलगडत जातात. त्यासाठी विविध संदर्भ ग्रंथ, विविध तत्कालीन समकालीन पुस्तकात आलेली वर्णनं तसंच वास्तुरचना संदर्भात असलेली पुस्तकं अशा सगळय़ांचाच आधार घेत टूर गाईडना अशा हेरिटेज वॉकचं आयोजन करावं लागतं.    

वारसास्थळांची सफर घडवताना तत्कालीन कालखंडाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं किंवा प्रत्येक वास्तू आणि त्याचा इतिहास लक्षात घेणं, अभ्यासणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आपणच आपली संस्कृती, इतिहास पुढच्या पिढीच्या लक्षात आणून देऊ शकलो नाही तर हा वारसा पुढे नेणं अधिकाधिक आव्हानात्मक होत जाईल. अशा अनेक ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नष्ट होत चालल्या आहेत, काहींचे संदर्भ बदलत चालले आहेत.  त्यांचं महत्त्व अधिक असल्याने ते समजावून सांगणं गरजेचं आहे तरच हा वारसा पुढची पिढी टिकवू शकेल. ही गरज हेरिटेज वॉक या माध्यमातून फार सोप्या-सुलभ आणि रंजक पद्धतीने पूर्ण करता येते आहे. त्यामुळे इतिहास आणि वर्तमानाचा धागा जोडणारा हेरिटेज वॉक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो आहे.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta safarnama travel to heritage site india is a symbol of rich cultural heritage amy
First published on: 26-01-2024 at 02:40 IST