वैष्णवी वैद्य मराठे
कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल भारतीयांसाठी वेगवेगळय़ा कारणांनी महत्त्वाचा ठरला. या फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागात विजेता ठरलेला पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ हा जसा महत्त्वाचा ठरला. तसंच या महोत्सवातील आणखी एका यशाने सगळय़ांचं लक्ष वेधून घेतलं. एफटीआयआयची निर्मिती असलेला चिदानंद एस. नाईक दिग्दर्शित ‘सनफ्लॉवर्स वर द फस्र्ट वन टु नो’ या शॉर्ट फिल्मला ‘ला सिनेफ’ विभागात प्रथम पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने, या चित्रपटाशी संबंधित दोन तरुण चित्रपटकर्मीशी व्हिवाने संवाद साधला.
सिनेमाचा शोध हा कोण्या एका माणसाने लावलेला नाही. एडिसन कंपनीने किनेटोस्कोपचा पहिला प्रोटोटाइप बनवला त्याबरोबर निर्मिती झाली ती चलचित्राची (मोशन पिक्चर्स). ल्यूमिएर बंधूंनी डिसेंबर १८९५ ला पॅरिसमध्ये पहिले चलचित्र लोकांसमोर आणले. पुढे त्यांनी लघुचित्रपटांपासून जगभरात सिनेमा नावाच्या एका जादूई कलाकृतीची पाळंमुळं रुजवली. या सगळय़ा घटनांचं केंद्र होतं ते फ्रान्सची राजधानी पॅरिस. आज याच फ्रान्सच्या भूमीत गेली कित्येक वर्ष सातत्याने कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल भरवला जातो आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात या फेस्टिव्हलची सुरुवात झाली होती. त्या काळी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या २१ देशांनी युद्धावरचे चित्रपट दाखवले होते. स्पर्धात्मकतेपेक्षा सर्जनशीलतेवर भर देणाऱ्या या फेस्टिव्हलचं यंदाचं ७७ वं पर्व भारतीय तरुण चित्रपटकर्मीनी गाजवलं आहे.
‘सनफ्लावर्स वर द फस्र्ट वन्स टू नो’ या एफटीआयआयची निर्मिती असलेल्या लघुपटाला यंदाच्या कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ला सिनेफ विभागात प्रथम पुरस्कार मिळाला आणि एकच जल्लोष झाला. एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) या तरुण सिनेकर्मीवर जगभरातून कौतुकाचा वर्षांव झाला. या शॉर्ट फिल्मच्या सिनेमॅटोग्राफी आणि साऊंडची जबाबदारी सांभाळणाऱ्या सूरज ठाकूर आणि अभिषेक कदम या दोघांशी यानिमित्ताने संवाद साधला. ‘ही शॉर्ट फिल्म कशी तयार झाली, त्याची संपूर्ण प्रोसेस काय होती?’ या आठवणींना शॉर्ट फिल्मचा डीओपी सूरज ठाकूरने उजाळा दिला. ‘आमच्याकडे संपूर्ण फिल्म बनविण्यासाठी फक्त महिन्याभराचा अवधी होता. तो काळ फार तणावाचा होता. कथा लिहिणं, लोकेशन शोधणं, शूटिंग, एडिटिंग या सगळय़ा गोष्टी ३० दिवसांत पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे हे शिवधनुष्य आम्ही पेलू शकू की नाही? या शंकेनेच आमची सुरुवात झाली होती’ असं सूरजने सांगितलं.
या फिल्मची कथा कन्नड लोककथेवर आधारित आहे. कोणे एके काळी गावातल्या म्हातारीने कोंबडं चोरलं आणि त्यामुळे तिथे पुन्हा कधीच सूर्योदय झाला नाही, अशा आशयाच्या या लोककथेचा आधार घेत ‘सनफ्लावर्स वर द फस्र्ट वन्स टू नो’ फिल्मची पटकथा रचण्यात आली आहे. या इतक्या अवघड कथेवरची पटकथा ते शूटिंग सगळं महिन्याभरात पूर्ण होणं सगळय़ांनाच अशक्य वाटत होतं. ‘आमच्याबरोबरचे विद्यार्थी मित्र आणि शिक्षकांनीही या कथेवर पडदा टाका आणि दुसरं काही तरी करा, असं सुचंवलं होतं. पण आम्हाला शेवटपर्यंत हीच कथा खुणावत होती आणि शेवटी आम्ही याच कथेवर फिल्म करायचा निर्णय घेतला. आज तो निर्णय फळाला आला’ असं सूरजने सांगितलं.
कान महोत्सवात ‘ला सिनेफ’ हा स्पर्धा पुरस्कार विभाग फक्त फिल्म स्कूलच्या शॉर्ट फिल्म्ससाठी आहे. जगभरातून विविध आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शॉर्ट फिल्म्स कानसाठी निवडल्या जातात. यंदा ५०० फिल्म स्कूल्समधून जवळपास २२०० शॉर्ट फिल्म्स कान फेस्टिव्हलला होत्या. त्यातून या भारतीय शॉर्ट फिल्मने पहिला पुरस्कार मिळवत डंका वाजवला ही खरंच अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने, ‘कान’ वारी केलेल्या सूरजने आणि शॉर्ट फिल्मच्या साऊंडची जबाबदारी सांभाळणाऱ्या अभिषकने फेस्टिव्हलमध्ये पाहिलेल्या विविध देशांच्या फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्सविषयीही भरभरून सांगितलं.
‘कान’ फेस्टिव्हलमध्ये अनेक अप्रतिम शॉर्ट फिल्म्स, फिल्म्स पाहायला मिळाल्या. प्रत्येकातली कलात्मकता, नावीन्य, खरेपणा अनुभवताना फार मजा आली. तिथे जाऊन असं काही तरी मिळालं जे पाठय़पुस्तकं आणि अभ्यासाच्या पलीकडलं आहे. पुरस्कार मिळाल्यावर ज्युरींसमवेत झालेला बौद्धिक संवाद हाही खूप काही शिकवून जाणारा अनुभव ठरला. ‘ला सिनेफ’ या विभागात सिलेक्ट झालेल्या सगळय़ाच शॉर्ट फिल्म्स उच्च दर्जाच्या होत्या, ज्यातून फिल्म मेकिंगची प्रोसेस किती समृद्ध असते याचा अंदाज आम्हाला आला. लोकांचं सिनेमा या कलेबद्दलचं पॅशन आंतरराष्ट्रीय पातळीवर किती वेगळय़ा धाटणीचं आणि धाडसाचं आहे; आपण फक्त करण्याची जिद्द ठेवायची सगळय़ा गोष्टी आपोआप जुळून येतात’ असं अभिषेकने सांगितलं.
समाजात अनेक आचार-विचार, समज-गैरसमज, कल, दृष्टिकोन हे सगळंचं असतं, पण या सगळय़ाला पदोपदी प्रत्येक वळणावर आव्हान देण्याची ताकद, वेळप्रसंगी परिस्थिती बदलण्याची ताकद, नवे प्रघात-पायंडा पाडण्याची ताकद सिनेमा या कलेत आहे. सिनेमा हे माध्यम जनमानसाचा आरसा तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त ते समाजासाठी प्रबोधनाचं माध्यम आहे. म्हणूनच पिढय़ानपिढय़ा सिनेमा आणि सिनेमाची प्रोसेस बदलत गेली, समृद्ध झाली आणि या पुढेही होत राहील. तरुण पिढीमध्ये सिनेमाचं हे शिवधनुष्य हाती घेण्याचं बळ आणि सामथ्र्य दोन्ही आहेच, पण त्याहीपलीकडे जाऊन समाज बांधिलकी, दूरदृष्टी आणि काळाच्या पुढे जात विचार मांडण्याचा वेगही त्यांच्याकडे असल्याने सिनेमा माध्यम ते अधिक अर्थपूर्ण पद्धतीने हाताळताना दिसतात.
भारतात फिल्म मेकिंग हे पूर्णत: करिअरचं क्षेत्र झालं ते तरुणांच्या या वेगवान दूरदृष्टीमुळेच. पुण्यातल्या फिल्म इन्स्टिटय़ूटसारख्या बऱ्याच संस्था आता फिल्म मेकिंगमध्ये विविध पद्धतीचे कोर्सेस आणतायेत. इथल्या शिक्षकांचं म्हणणं आहे की, तरुण पिढीकडे ज्ञानाचं आणि कल्पकतेचं भांडार आहे. ते अत्यंत प्रयोगशीलही आहेत. त्यांना सतत काही तरी धाडसी आणि नवीन करून पाहायचं असतं. ते अपयशाला घाबरत नाहीत, कारण त्यांच्याकडे अविरतपणे कर्म आणि कष्ट करण्याची वृत्ती आहे. कान फेस्टिव्हलमध्ये विजेती ठरलेली ही शॉर्ट फिल्मसुद्धा एक परीक्षाच होती. शिकण्याची ही प्रयोगशील वृत्ती त्यांनी यापुढेही कायम ठेवावी, हाच आमचा आग्रह असतो असं एफटीआयआयचे शिक्षक सांगतात. या प्रयोगशीलतेची आणि सतत शिकण्याची जिद्द, कठोर परिश्रम या जोरावर तरुण सिनेकर्मी येत्या काळात वैश्विक स्तरावर आपलं कर्तृत्व गाजवतील, असा विश्वास या पुरस्कारांमुळे निर्माण झाला आहे.