लहान मुलांना सर्वसाधारणपणे न आवडणारा विषय म्हणजे गणित. गणितापासून सुटका मिळवण्याचे प्रयत्न सगळीच लहान मुलं करत असतात. मात्र त्यातही काही मुलं अशी असतात ज्यांना गणित, आकडेमोड यात गंमत वाटते. त्यांचं डोकं आकडेमोडीत भरभर चालतं. खेळ खेळावा तशी ही मुलं आकडेमोड करत असतात. अशाच मुलांपैकी एक म्हणजे प्रियांशी सोमाणी. जिने वयाच्या अकराव्या वर्षी जागतिक विक्रम केला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव झळकवलं. सहा अंकी संख्येचे वर्गमूळ दहा डिजिट्सपर्यंत काढणं आणि तेही पावणे तीन मिनिटांत, असा रेकॉर्ड तिच्या नावे दाखल झाला.

प्रियांशी सोमाणी ही सर्वसामान्य लहान मुलांसारखी शाळेत जाणारी मुलगी. मात्र के. जी.मध्ये असल्यापासूनच मेंटल कॅल्क्युलेशनमध्ये तिला खूप गती होती. तिची आई तिच्यासोबत खूप वेळ घालवत असे. खरंतर गणिताकडे खेळ म्हणून पाहण्याची दृष्टी तिच्यात आईमुळे निर्माण झाली असं म्हणायला हवं. आई तिला वेगवेगळी कोडी सोडवायला आणि गणिती उदाहरणं सोडवायला देत असे. त्या त्यांच्या खेळातून तिच्या आईने तिची बुद्धिमत्ता ओळखली होती. तिची आवड, तिचा कल आणि तिची कुशाग्र बुद्धी हे सर्व जोपासण्यासाठी प्रियांशीच्या आईने तिला लहानपणीच अबॅकसच्या आणि मेंटल मॅथेमॅटिक्सच्या क्लासला घातलं. तिला तिच्या अबॅकसच्या क्लासबद्दल नेहमी उत्सुकता असायची आणि क्लासमध्ये शिकवलेल्या ट्रिक्स ती घरी सतत करून बघायची. त्यात नवनवीन प्रयोग करून बघणं तिला आवडायचं. तिच्या या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे २००६ ते २००८ अशी सलग तीन वर्षं ती अबॅकसची नॅशनल चॅम्पियन होती. २००६ मध्ये ज्यावेळी ती पहिल्यांदा चॅम्पियन झाली होती, त्यावेळी सर्व पाच मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप्समध्ये ती एकटीच अशी स्पर्धक होती जिच्या बेरीज, गुणाकार आणि वर्गमूळ कॅल्क्युलेशन १०० टक्के अचूक होत्या. त्यातल्या २००७ या वर्षीच्या स्पर्धेत तर ती मलेशियामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियनसुद्धा होती.

अशी अनेक बक्षीसं प्रियांशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवत असतानाच तिची विशेष ठरलेली कामगिरी मात्र आंतरराष्ट्रीय होती. २०१० या वर्षी जर्मनीमधील युनिव्हर्सिटी ऑफ मॅग्डबर्गमध्ये झालेल्या स्पर्धेत १६ वेगवेगळ्या देशांतील एकूण ३७ स्पर्धकांशी सामना करून प्रियांशी पहिली आली. सहा आकडी संख्येचे वर्गमूळ आठ अंकांपर्यंत काढण्याच्या या स्पर्धेत तिने सहा मिनिटं एक्कावन्न सेकंदांचा वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेत अशा प्रकारचे दहा टास्क तिला देण्यात आले होते. या तिच्या विक्रमी वेळात तिने सर्व दहा टास्क पूर्ण केले होते. तिच्या अफाट हुशारी आणि बुद्धिमत्तेने तिने भल्याभल्यांना अचंबित केलं.

प्रियांशीच्या गिनीज बुक रेकॉर्डने आणि या जागतिक स्पर्धेतील यशाने तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. तिला ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मात्र ती तिच्या आई-वडिलांनासुद्धा खूप श्रेय देते. त्यांनी योग्य वेळी योग्य ती चालना दिली आणि या सगळ्या उपक्रमांसाठी तिला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तिला तिची असलेली बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरण्याचा मार्ग सापडला. मात्र एकच एक गोष्ट करत राहण्याचा स्वभाव प्रियांशीचा नाही. त्यामुळे २०१२ मध्ये तिने या गणित आणि त्याच्याशी संबंधित स्पर्धा सोडून दिल्या. आता तिला नाटक आणि अभिनय यावर लक्ष केंद्रित करायची इच्छा आहे आणि त्याचं ती शिक्षणसुद्धा घेते आहे. प्रियांशी म्हणते की तिने कोणताही एकच एक करियर पाथ ठरवलेला नाही आहे. तिला ज्यावेळी जे आवडेल ते करता यावं अशी तिची इच्छा आहे. तिच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळेल अशा गोष्टी फ्री माइंडने करणं हे तिचं उद्दिष्ट आहे. तिने कोणतंही क्षेत्र निवडलं तरीही तिची हुशारी आणि बुद्धिमत्ता आपली चमक नक्की दाखवेल.

लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून ओळख मिळवणं अजिबात सोपं नाही. सगळीकडे तंत्रज्ञान आणि गणिती मोजमापासाठी अद्यायावत साधनं हाताशी असताना प्रियांशी सोमाणी या मुलीने फार कमी वेळात अभ्यासपूर्वक गणितात कमालीचं यश संपादन केलं. तिची जिद्द आणि यश मिळालं म्हणून ती एकच गोष्ट धरून ठेवण्यापेक्षा सतत वेगळं काही करून पाहण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे तिच्या कर्तृत्वाची गोष्ट इतरांपेक्षा वेगळी ठरते.

viva@expressindia.com