संशोधकाच्या भूमिकेतून प्रत्यक्ष वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून द्यायचं तर त्याच विषयाशी संबंधित शिक्षण, पदवी असायलाच हवी, हा समज कला शाखेत शिकलेल्या ओंकार ढाले या तरुण संशोधकाने खोडून काढला आहे. निसर्गाविषयी मनात मुळातच प्रेम असेल तर आपोआपच वन्यजीव, वनस्पती या सगळ्यांविषयीचं कुतूहल जागतं आणि त्यातून त्यांच्या अभ्यासात मन रमतं. ओंकारने निसर्गाबद्दलचं हे प्रेम केवळ मनात जपलेलं नाही, तर त्याने प्रत्यक्ष कार्यात सहभाग घेत लोकांच्या मनातही वन्यजीवांविषयीची आपुलकी वाढावी, गैरसमज दूर व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.

निसर्गाच्या कुशीत वसलेलं सातारा गाव. आणि या गावात डोंगर-दऱ्या, ओढे, झाडं, पक्षी आणि त्यांच्या सहवासात वाढलेला तरुण म्हणजेच ओंकार सुरेश ढाले. ओंकारच्या घराच्या मागेच जंगल होतं. त्यामुळे लहानपणापासूनच या जंगलाने त्याच्या मनात घर केलं आहे. झाडाझुडपांच्या सहवासात, पक्ष्यांच्या किलबिलाटातच लहानाचा मोठा झालेल्या ओंकारच्या मनात नकळतच निसर्गप्रेमाचं बीज पेरलं गेलं. जंगलात राहणाऱ्यांना तिथल्या खुणा, भाषा आपोआपच कळतात असं म्हणतात. ओंकारलाही जंगलाचं भय वाटलं नाही, उलट तिथल्या प्रत्येक जीवाला कसं जपायला हवं आणि माणसाचं नातं या जंगलाबरोबर दृढ होण्यासाठी मुळात त्याच्या मनात असलेले गैरसमज कसे दूर व्हायला हवेत, हे त्याला लहानपणापासूनच उमगू लागलं होतं. अधिकाधिक निसर्ग समजून घ्यायची ओढ त्याला पुढे संशोधनाच्या वाटेवर घेऊन गेली.

जंगलप्रेमातून निसर्ग संवर्धनाच्या अभ्यासापर्यंत सुरू झालेल्या या वाटचालीमागे आणखी एक घटना कारणीभूत ठरली होती. घटना वरवर साधी वाटावी अशी… मात्र त्या क्षणी ओंकारने जे केलं त्यातून खऱ्या अर्थाने त्याचा या क्षेत्रात संशोधनाच्या दृष्टीने प्रवास सुरू झाला. ओंकार आठवी इयत्तेत असतानाची घटना. शाळेत अचानक एक साप दिसला. सर्व जण भीतीपोटी त्याला मारण्यास धावले, पण ओंकारने त्यांना रोखलं. त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता तो साप पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडला. त्या क्षणी समाधानाची भावना त्याच्या रोमरोमात रुंजी घालत राहिली. तिथून निसर्ग संवर्धन प्रवासाला खरी सुरुवात झाली, असं तो सांगतो. ओंकार ज्या भागात राहतो तिथं डोंगररांगांमुळे उन्हाळ्यात वणवे लागणं ही सामान्य बाब आहे. अशा वेळी त्याने समविचारी मित्रांचा एक संघ तयार केला आणि या वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. हळूहळू त्याचं काम साप पकडणं, मानव-वन्यजीव संघर्षात हस्तक्षेप करणं आणि जनजागृती करणं अशा वेगवेगळ्या दिशेने विस्तारत गेलं. या प्रवासात त्याला ‘महादरे इकॉलॉजिकल रिसर्च (इंटरडिसिप्लिनरी)’ संस्थेची मोलाची मदत झाली. या संस्थेतील सुनील भोईटे यांच्याशी ओंकारची ओळख झाली आणि त्याला संशोधनाची दिशा मिळाली.

महादरे परिसर हा सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला, विविध अधिवासांनी संपन्न असा प्रदेश आहे. इथं ओलसर अरण्य, गवताळ भाग, खडकाळ उतार आणि लहान प्रवाह यांचा संगम आढळतो. या जैविक विविधतेमुळे येथे अनेक दुर्मीळ उभयचर आणि सरपटणारे प्राणी आढळतात. घनदाट जंगल, पावसाळ्यातील असुरक्षित रस्ते, रात्री उशिरा फील्डवर्क करणं, तसंच काही वेळा स्थानिकांचा गैरसमज दूर करणं अशी वेगवेगळी कामं संशोधक म्हणून ओंकार करत राहिला. या सगळ्या अनुभवांतूनच त्याचा अभ्यास वाढत गेला आणि आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला.

खरं तर ओंकार हा कला शाखेचा विद्यार्थी आहे. तरी त्याला जैवशास्त्र या विषयात आवड निर्माण झाली आणि त्यातून त्याला त्याचं कार्यक्षेत्र नव्याने गवसलं. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्याने महादरे संवर्धन राखीव क्षेत्रातील उभयचर आणि सरपटणाऱ्या जीवांचा अभ्यास सुरू केला. दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्याचा या विषयासंदर्भातला पहिला शोधनिबंध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आणि महादरेतील समृद्ध जैवविविधतेची नवी ओळख जगासमोर आली. आज ओंकार सातारा शहरात साप व इतर सरपटणाऱ्या जीवांबाबत जनजागृती करतो आहे. शाळा, महाविद्यालये, गाव आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून तो या जीवांचं पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगतो, लोकांच्या मनात वन्यजीवांविषयी काही गैरसमज असतील तर ते दूर करतो. तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रसंग जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तो नेहमी तत्पर असतो.

आपल्या पूर्वजांनी दिलेला हा जैवविविधतेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे, असं ओंकारला वाटतं. आजच्या समाजमाध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तरुणाईने निसर्ग संवर्धनातही आपला खारीचा वाटा उचलायला हवा, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे असं तो सांगतो. निसर्गाशी असं मनापासून नातं जोडणारा आणि संशोधन व कृतीद्वारे त्याचं रक्षण करणारा ओंकार ढाले म्हणूनच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतो.

viva@expressindia.com