मृण्मयी पाथरे
काही महिन्यांपूर्वी काव्याने परदेशातील वेगेवेगळय़ा विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केले. गेल्या काही दिवसांत तिला या विद्यापीठांकडून तिचा अर्ज स्वीकारला गेला आहे की नाही, याचे ईमेल्स येऊ लागले. पहिल्या काही ईमेल्समध्ये तिची निवड झाली नसल्याचं कळवण्यात आलं होतं. त्यामुळे काव्याचा बराच मूड ऑफ झाला होता. असं असलं तरी आपल्या समवयस्क मंडळींना कसा निकाल मिळाला आहे, याकडेही ती लक्ष ठेवून होती. इतर मंडळींपैकी कोणाला प्रवेश मिळालाच आणि ते विद्यापीठ काव्याच्या आवडीचं नसलं, तरीही काव्याला ‘मला का नाही मिळत असा झटपट प्रवेश?’ असं राहून राहून वाटायचं. पण काही दिवसांतच तिला एका विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. ही खूशखबर सांगण्यासाठी तिने तिच्या मैत्रिणीला कॉल केला आणि तिच्या मैत्रिणीलाही एका ‘आयव्ही लीग’ विद्यापीठात ( Ivy League Universities जगातील सर्वोत्तम विद्यापीठं मानली जातात) प्रवेश मिळाल्याची बातमी कळली. काव्या हे ऐकून तिच्या मैत्रिणीसाठी खूश तर झालीच, परंतु तिला स्वत:च्या ॲडमिशनबद्दल वाटणारा आनंद माहिती नाही का पण कमी झाला.
कबीर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम करतो आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांअखेरीस त्याला बऱ्यापैकी पगारवाढ मिळाली आणि भरघोस बोनसही मिळाला. कबीरचा आनंद गगनात मावत नव्हता. करोनाकाळात कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली, बोनस, महागाई भत्ता आणि इतर सोयीसुविधा मिळणं बंद झालं होतं. आणि अशा काळात जॉब आहे म्हणून आर्थिक स्थैर्य असणं आणि पगारवाढ होणं ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मात्र त्याच्या सहकाऱ्याला (ज्याने कबीरसोबतच चार वर्षांपू्वी कंपनी जॉइन केली होती) या वर्षी प्रमोशन मिळालं हे कळल्यावर कबीरचा चेहरा पडला.
मार्च-एप्रिल जवळ येऊ लागले की लगबग सुरू होते ती पुढच्या शैक्षणिक वर्षांसाठी ॲडमिशन्स घेण्याची, कॉलेजमधील प्लेसमेंटना (placement) सामोरं जाण्याची आणि जॉबमधील मूल्यमापनावरून (performance appraisal)आपल्याला पगारवाढ किंवा प्रमोशन मिळतंय का याचा आढावा घेण्याची. आपण मात्र या मोठय़ा गोष्टींची तुलना करण्यावरच थांबत नाही, बरं का! इतरांनी त्यांचा वाढदिवस किंवा आयुष्यातले खास क्षण कसे साजरे केले, ते फिरायला कुठे गेले, वीकेंड्सना काय करतात, त्यांचं घर किती लहान किंवा किती मोठं आहे, त्यांचं त्यांच्या जोडीदारासोबतचं नातं कसं आहे, त्यांचं लग्न किती साधेपणाने किंवा किती थाटामाटात केलं, त्यांचं राहणीमान कसं आहे यासारख्या असंख्य गोष्टींची तुलना आपण आपल्या आयुष्याशी आणि त्यात अनुभवलेल्या चढउताराशी करत असतो. आणि यातूनच आपलं समाजातील स्थान नेमकं कोणतं याचे ठोकताळे बांधत असतो.
तसं पाहायला गेलं तर तुलना करणं हा मानवी स्वभावच आहे. यात वावगं असं काही नाही! आपण सगळेच कधी ना कधी आपल्यापेक्षा जी व्यक्ती एखाद्या गोष्टीत सरस आहे, तिच्याशी आपली तुलना करतो. याला ‘अपवर्ड कम्पॅरिजन’ (upward comparison) असंही म्हणतात. कधीकधी या तुलनेमागे आपण कोणत्या गोष्टी सुधारू शकतो याचा अंदाज घेणं, हा प्रामाणिक हेतूही असतो. पण अशा तुलनेमुळे आपल्याला पुढे प्रगती कशी करता येईल यावर भर देण्यापेक्षा आपण कुठे आणि किती कमी पडतो यावरच बहुतेकदा जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. मग त्यातूनच कित्येकदा आपला आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. अशा वेळेस आपल्याकडे कितीही कौशल्ये असली, तरी आत्मविश्वास कमी झाल्यामुळे आपण त्या कौशल्यांचा पुरेपूर उपयोग करू शकत नाही.
या आपल्या तुलना करण्याच्या मानवी स्वभावाबद्दल एका मानसशास्त्रज्ञाने एक आगळंवेगळं निरीक्षण नोंदवलं आहे. एखाद्या मोठय़ा स्पर्धेमध्ये (उदाहरणार्थ, ऑलिम्पिकमध्ये) पहिल्या येणाऱ्या तीन व्यक्तींना मानपदकं ( medals) दिली जातात. यातील सुवर्णपदक ( gold medal) मिळालेल्या व्यक्तीचा आनंद तर ओसंडून वाहतच असतो. तरीही हा आनंद व्यक्त करताना कुठे ना कुठे आपण वल्र्ड रेकॉर्ड मोडला का, याबद्दलही ही व्यक्ती अनेकदा विचार करत असते. रौप्यपदक (silver medal) मिळालेल्या व्यक्तीलासुद्धा आनंद तर होतोच, पण आपल्या हातातून केवळ छोटय़ाशा फरकाने सुवर्णपदक निसटलं, याचं दु:खही सलत असतं. याउलट कधीकधी कांस्यपदक ( bronze medal) मिळालेली व्यक्ती हे पदक आपल्या हातून जराशा विलंबामुळेही निसटलं असतं, त्यामुळे ‘बाल बाल बच गए’ असा विचार करून आहे त्यात समाधान मानते आणि आनंदाचा आस्वाद घेते. खरं तर, या तीनही व्यक्तींना जगातील तीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित केले असले आणि त्यांनी या स्थानावर पोहोचण्यासाठी कित्येक जणांना आपल्या मेहनतीने मागे टाकले असले, तरी ते कोणत्या दृष्टिकोनातून त्यांच्या विजयाकडे पाहतात यावर त्यांचा आनंद अवलंबून असतो.
या तुलना करणाऱ्या सवयीच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. आपल्यापेक्षा सरस असलेल्या व्यक्तींशी आपली तुलना केल्यावर कधीकधी आपल्याला अजून जोमाने काम करण्यासाठी मोटिव्हेटेड (motivated) वाटू शकतं आणि अंगात बळ येतं, तर कधी त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग, द्वेष आणि मत्सर ( jealousy) निर्माण होऊ शकतो. या लहानसहान गोष्टींमधूनच आपला संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. अशाने आपल्या आजूबाजूची कित्येक माणसं आपल्याशी स्पर्धा करत आहेत, हा विचार मनात पक्का होऊ शकतो. जो वेळ आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी किंवा आपल्याला ज्या गोष्टी निखळ आनंद देतात, त्यांना जोपासण्यासाठी वापरता येऊ शकतो, तोच वेळ आपण इतरांबद्दल विचार करण्यात घालवतो. यामुळे आपल्या आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी घडल्या, तरी आपल्याभोवती नकारात्मक भावनांचं दाट धुकं तयार झालेलं असतं. किंबहुना, कधीकधी हे धुकं आपण स्वत:च किंवा आपल्या जवळच्या माणसांच्या बोलण्यावरून तयार केलेलं असतं. पण इतरांशी स्पर्धा न करता आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवं आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, यावर भर दिला तर? मुळात, या जगात कोणी ना कोणी आपल्यापेक्षा एखाद्या गोष्टीमध्ये अग्रेसर असणार आहे आणि त्यात वावगं असं काही नाही, हे मान्य केलं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल, हा विचार केला तर? आयुष्य जरा तरी स्ट्रेस-फ्री होईल, नाही का?
viva@expressindia.com