वेदवती चिपळूणकर
जशी तरुणाई बदलली, तिचे आचार-विचार आणि पद्धती बदलल्या, तसेच त्यांचे ज्ञानग्रहणाचे आणि मनोरंजनाचे मार्गही बदलले. जगाच्या बदलत्या वेगाशी जुळवून घेताना व्याख्यानांची जागा ‘टेड टॉक’सारख्या माध्यमाने घेतली, तर मनोरंजक विनोदी कथाकथनाची जागा स्टॅण्डअप कॉमेडीने घेतली. अगदी कीर्तनासारख्या पारंपरिक असलेल्या कलेनेही विषयांमध्ये, सादरीकरणामध्ये वैविध्य आणायला सुरुवात केली आणि जुनेच बोलणे नव्याने ऐकू येऊ लागले..
आधीच्या पिढय़ांनी सकाळी शाळेत मूल्यशिक्षणाचा तास, क्वचित कधी सुट्टीत संस्कार वर्ग, रात्री झोपताना बोधकथा अशा गोष्टींचे अनुभव घेतलेले आहेत. आताच्या तरुण पिढीला ही संधी तशी कमीच प्रमाणात मिळाली. व्याख्यानं, चर्चासत्रं, भाषणं ऐकणं या सवयी पिढीगणिक कमी होत गेल्या. आताच्या पिढीकडे एखाद्या व्याख्यानाला प्रत्यक्ष जाण्यासाठी वेळही नसतो आणि संपूर्ण व्याख्यान ऐकण्याइतका पेशन्सही नसतो. तरीही ज्ञान मिळवणं, चर्चा करणं, बुद्धीला चालना आणि आव्हानं देणं या गोष्टींची आवड तरुणाईला असतेच. जशी तरुणाई बदलली, तिचे आचार-विचार आणि पद्धती बदलल्या, तसेच त्यांचे ज्ञानग्रहणाचे आणि मनोरंजनाचे मार्गही बदलले. जगाच्या बदलत्या वेगाशी जुळवून घेताना व्याख्यानांची जागा ‘टेड टॉक’सारख्या माध्यमाने घेतली तर मनोरंजक विनोदी कथाकथनाची जागा स्टॅण्डअप कॉमेडीने घेतली. अगदी कीर्तनासारख्या पारंपरिक असलेल्या कलेनेही विषयांमध्ये, सादरीकरणामध्ये वैविध्य आणायला सुरुवात केली आणि जुनेच बोलणे नव्याने ऐकू येऊ लागले..
‘टेड टॉक’ ही संकल्पना मूळची तशी जुनीच! इंग्रजीत या प्रकाराची सुरुवात साधारणत: २००१ ते २००६च्या काळातच झाली होती. त्याचा प्रसार होणं, ऐकणाऱ्यांना त्याची सवय होणं आणि मुळात मराठीपर्यंत ही संकल्पना पोहोचणं या प्रक्रियेत मधली ही सगळी वर्ष जावी लागली. साधारण गेल्या दोन वर्षांत मराठीला ‘टेड टॉक’ची सवय हळूहळू होते आहे. मिथिला पालकर, अभिज्ञा भावे, तेजश्री प्रधान अशा काही ओळखीच्या मराठी चेहऱ्यांनी ‘टेड टॉक’च्या मंचावर आपले विचार मांडले आहेत. कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त चाळीस मिनिटांचे असणारे हे ‘टेड टॉक’ प्रत्यक्षही जाऊन ऐकता येतात अथवा यूटय़ूब आणि अॅपवर संपूर्ण ‘टेड टॉक’ ऐकायला मिळतात. २०१७ मध्ये शाहरुख खानने ‘स्टार प्लस’ या हिंदी चॅनेलवर ‘टेड टॉक हिंदी’ हा शो होस्ट केला होता आणि २०१९ मध्ये त्याचं दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. एकता कपूर, करण जोहर, सुंदर पिचई, ताहिरा कश्यप, मिताली राज अशा अनेकांची वैचारिक बाजू या टेड टॉकच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली. कोणी तरी स्वत:चे विचार मांडतंय आणि आपल्याला ते ऐकायचे आहेत, आपल्याला त्यातून काही तरी चांगलं मिळणार आहे या गोष्टीची हळूहळू सवय तरुणाईला लागत गेली. थोडक्या वेळात, मोजक्या शब्दांत आणि नेमक्या मुद्दय़ात हे बोलणं होत असल्याने ‘टेड टॉक’ या संकल्पनेला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला.
विचार मांडणं, प्रबोधन करणं आणि त्याच वेळी काहीसं मनोरंजनही करणं या उद्देशाने कीर्तन ही लोककला प्रसिद्ध झाली. गोष्टींच्या माध्यमातून प्रबोधन करणं, त्याला संगीताची जोड देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवणं आणि श्रद्धेच्या आधारावर चांगल्या-वाईटाची जाण देणं हा कीर्तनाचा प्रयत्न असतो. काळ बदलला तशा सांगण्याच्या गोष्टीही बदलल्या. देवावरच्या श्रद्धेपेक्षा देशभक्तीच्या गोष्टींत आणि उदाहरणांत बदलती तरुणाई रमू लागली. एकोणीस वर्षांचा तरुण कीर्तनकार अथर्व घाटे सांगतो, ‘कीर्तनाचा मूळ साचा न बदलता नवीन स्वरूपात तरुणाईला आकर्षित करेल आणि त्यांच्या पचनी पडेल अशा पद्धतीने कीर्तन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सर्वाना समजेल, पटेल आणि रुचेल असे विषय असणंही महत्त्वाचं! आतापर्यंतच्या अनुभवानुसार देशप्रेमाबद्दलच्या विषयांना तरुणाईचा उत्तम प्रतिसाद मिळतो.’ कीर्तन हा केवळ आजी-आजोबांनी रात्री जेवल्यानंतर मंदिरात जाऊन ऐकायचा कला प्रकार आहे ही समजूत बाजूला पडून तरुण श्रोतृवर्गही याकडे हळूहळू वळायला लागल्याचं दिसून येतं आहे. ज्याप्रमाणे तरुण श्रोते वाढत आहेत, त्याचप्रमाणे तरुण कीर्तनकारांची संख्याही वाढते आहे हे विशेष.
निखळ मनोरंजनाचा एकपात्री प्रयोग म्हणून पुलंनी कथाकथन हा प्रकार नावारूपाला आणला. दृश्य स्वरूपातले मनोरंजनाचे प्रकार मर्यादित होते तेव्हा प्रसिद्ध झालेला हा एकपात्री प्रयोग मधल्या काळात एकदम लुप्त झाला होता. आता कथाकथनाचा हाच प्रयोग नव्या अवतारात लोकप्रिय झाला आहे. ‘स्टॅण्ड-अप कॉमेडी’ ही संस्कृती जरी पाश्चात्त्य देशांतून आलेली असली तरीही या प्रकाराची महाराष्ट्राला खूप आधीपासून सवय आहे. सुरुवातीला पाचपन्नासच्या संख्येने येणारे प्रेक्षक आता या प्रकाराला काही शेंच्या संख्येने प्रतिसाद द्यायला लागले आहेत. संध्याकाळी छान वेळ घालवायचा पर्याय म्हणून स्टॅण्ड-अप ऐकायला जाण्याचे बेत करायला लागले आहेत. अशाच पद्धतीने कधी उत्स्फूर्त विषयांवर सादरीकरण करून, तर कधी एखाद्या ठरावीक विषयाला धरून केलेले स्टॅण्ड-अप असे बदल करत राहिलं तर प्रेक्षकांनाही सतत काही तरी नवीन देता येईल,’ असं भा.डि.पा.च्या सारंग साठय़ेने सांगितलं. सध्या दृश्य मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही स्टॅण्ड-अप प्रकाराला मोठी प्रेक्षकसंख्या मिळणे ही एक सुखद गोष्ट ठरली आहे. मात्र, तरुणाईलाही अभिव्यक्तीसाठी हे माध्यम महत्त्वाचं वाटतंय, जवळचं वाटतंय. त्यामुळे विनोदी, गंभीर किंवा कवितेसारख्या माध्यमातूनही आपले बोलणे स्टॅण्ड- अप प्रकारात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फंडा तरुणाईने आपलासा केला आहे. स्टॅण्ड-अप कॉमेडीकडे वळणारा प्रेक्षकांचा ओढा पाहता, अगदी पुलंशी तुलना नाही तरी, हे एक ‘कल्चर’ म्हणून नक्की प्रस्थापित होऊ शकेल.
पिढी कोणतीही असली तरी प्रत्येक तरुणाईचे स्वतंत्र असे काही ‘ट्रेण्ड्स’ असतात. प्रत्येक तरुणाई नवनवीन प्रयोग करत स्वत:चा इतिहास घडवण्याचा आणि संस्कृती उभी करण्याचा प्रयत्न करत असते. कोणे एके काळी व्याख्यानं आणि चर्चासत्रातून बोलणारी तरुणाई आता या नवनवीन प्रकारातून बोलते आहे, व्यक्त होत आहे. त्यांनी संवाद थांबवलेला नाही, त्यांची अभिव्यक्ती तेव्हाही उत्स्फूर्त होती आणि आताही आहे. केवळ त्यांचे बोलण्याचे, सादरीकरणाचे रूप बदलले आहे. आताच्या तरुणाईचे सादरीकरणातले हे प्रयोग कदाचित उद्या बदललेल्या संस्कृतीचा पायाही ठरू शकतील.
viva@expressindia.com