हिंदी चित्रपटासाठी गायलेल्या पहिल्याच गाण्यासाठी ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’चे सगळे पुरस्कार तिनं खिशात टाकले. हिंदीच नाही तर इंग्रजी गाणी आणि त्यातही जॅझ म्युझिक हे तिचं प्रेम आहे.. ‘मैं परेशान’ म्हणत सुरुवात केलेल्या या गायिकेनं अल्पावधीतच आपल्या आवाजानं अनेकांना वेड लावलंय. तिचं नाव- शाल्मली खोलगडे. या नव्या जमान्याच्या, नव्या दमाच्या गायिकेला प्रत्यक्ष भेटायची, तिला ऐकायची आणि तिच्याशी संवाद साधायची संधी विवा लाऊंजमधून येत्या बुधवारी (दिनांक १८) मिळणार आहे.
शाल्मलीनं वयाच्या आठव्या वर्षांपासून तिची आई उमा खोलगडे यांच्याकडेच गायनाचे धडे गिरविले. वयाच्या १६ व्या वर्षी तिने गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. इंग्रजी व हिंदी अशी दोन्ही भाषांतील गाणी सादर करण्यावर तिचं प्रभुत्व आहे. इंग्रजीतलं जॅझ संगीत तिला खूप आवडतं. ‘कॉकटेल’ चित्रपटातलं ‘दारू देसी’, ‘अय्या’ चित्रपटातलं ‘अगं बाई..’, ‘रेस २’मधलं ‘लत लग गई’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातलं ‘बलम पिचकारी’ अशी वेगळ्या पद्धतीची गाणी गाण्याची संधी तिला तिच्या वेगळ्या आवाजामुळे मिळाली. २०१२ मध्ये बॉलीवूडमध्ये तिला गाण्याची पहिली संधी मिळाली. ‘इशकजादे’ या चित्रपटातील ‘मैं परेशान’ हे गाणं तिनं गायलं आणि बॉलिवूडमध्ये ती पहिल्याच फटक्यात फेमस झाली. स्क्रीन, फिल्मफेअर, तोयफा, स्टारडस्ट, झी सिने अशा २०१२ मध्ये झालेल्या सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिकेची पारितोषिकं  तिला मिळाली.
कधी :    बुधवार, १८ डिसेंबर
कुठे :    पु.ल. देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई.
वेळ :    दुपारी ३.३० वाजता.