विशाखा कुलकर्णी
जगभर सुरू असलेला करोना साथीचा काळ सर्वानाच अतिशय कठीण जातो आहे, विशेषत: विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय आव्हानात्मक ठरला आहे. शिक्षण – करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलेल्या या साथीमुळे अतिशय कमी काळात तरुणाईला नव्या शिक्षणपद्धतीशी जुळवून घेत आपले शिक्षण सुरू ठेवावे लागले आहे. शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर तर काहीही चूक नसताना कोविड बॅचचा शिक्का बसला आहे. अशा वेळी नोकरी मिळवताना तरुणाईला अनेक अडचणी येत आहेत. कोविडमध्ये नोकरी गमावलेल्या बहुसंख्य अनुभवी उमेदवारांशी नुकतेच पदवीधर झालेल्यांची स्पर्धा असल्याने नोकरी मिळणे अधिकच कठीण झाले आहे. सद्य:परिस्थितीत पदवीव्यतिरिक्त आपल्याकडे असलेल्या इतर कौशल्यांचा नोकरीसाठी उपयोग होऊ शकतो. कोविडपूर्व काळात अशी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पदवी मिळताच नोकरीच्या दृष्टीने आवश्यक कोर्सेस, शॉर्ट टर्म डिप्लोमा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. मान्यताप्राप्त कोर्स करून मिळालेली सर्टिफिकेट्स नोकरी मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. आता हे कोर्सेसही ऑनलाइन झाले आहेत.
कोविडमध्ये संपूर्ण शिक्षण ऑनलाइन सुरू झाले, परंतु यापूर्वीदेखील अनेक संस्था विविध कोर्सेस आणि वर्कशॉप्स ऑनलाइन माध्यमातून घेत होते. हे ऑनलाइन कोर्सेस विद्यार्थ्यांला एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल आणि प्रत्यक्ष व्यवहारात वापरता येईल असे ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. ऑनलाइन कोर्स घेणाऱ्या अनेक संस्था तसेच वेबसाइट्स आहेत. भारतात असे ऑनलाइन कोर्स घेणारा एक प्लॅटफॉर्म म्हणजे ‘स्वयम’. तरुणाईला अनेक विषयांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देणारे हे व्यासपीठ भारताच्या शिक्षण मंत्रालयातर्फे सुरू केले गेले आहे. यात माध्यमिक तसेच उच्च शिक्षणातील विषय, कौशल्य विकासाभिमुख विषयांचे शिक्षण घेण्यासाठी विविध कोर्स उपलब्ध आहेत. या माध्यमावर तज्ज्ञ प्राध्यापकांनी रेकॉर्ड केलेले अक्षरश: असंख्य कोर्सेस आहेत. कोर्समध्ये शिकवलेल्या विषयांचे प्रेझेंटेशन आणि अभ्यासासाठीचे इतर साहित्य विद्यार्थ्यांला कोर्ससाठी नोंदणी केल्यावर मिळते. या कोर्समध्ये असलेल्या घटकांवर चाचण्यादेखील घेतल्या जातात, यातील काही चाचण्यांना गुण असतात तर काही सरावासाठी असतात. कोर्स पूर्ण केल्यानंतर एक परीक्षा घेतली जाते, ती दिल्यानंतर कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळते. हा कोर्स करून मिळालेल्या सर्टिफिकेटचे ‘क्रेडिट’ देखील विद्यार्थ्यांना मिळते, ज्याचा फायदा त्यांच्या पदवीच्या शिक्षणामध्ये होतो. घरी बसून तज्ज्ञ मार्गदर्शकांनी घेतलेल्या या कोर्सचे सर्टिफिकेट नोकरी मिळवण्यासाठी देखील महत्त्वाचे ठरते.
भारतातल्या या प्लॅटफॉर्मसह आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या ‘कोर्सेरा’ सारख्याही अनेक ऑनलाईन कोर्सेस घेणाऱ्या वेबसाईट्स आहेत. या वेबसाईट्सवर जगभरातल्या अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्ती अतिशय विचारपूर्वक आखलेल्या कोर्सेसमधून तो विषय सखोलपणे शिकवतात. असंख्य विषयांवर उपलब्ध असलेल्या या विविध कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी वय, शिक्षण, नागरिकत्व या कशाचीही कुठलीही अट नाही. प्रत्येक कोर्सच्या माहितीमध्ये हा कोर्स कोणत्या विद्यार्थीगटासाठी उपयुक्त आहे, त्या कोर्सची काठिण्यपातळी काय आहे, कोर्समध्ये कुठल्या विषयांचा समावेश आहे आणि हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांला त्या विषयाचे प्रावीण्य कितपत मिळेल याची माहिती दिलेली असते. या कोर्समध्ये सहभाग घेणे मोफत असते, परंतु परीक्षा देण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैसे भरावे लागतात. अशापद्धतीच्या काही ठरावीक आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबसाइट्सच्या कोर्सेसना अनेक देशांमधील विद्यापीठांमध्ये मान्यता असल्यामुळे जगभरात लाखो विद्यार्थी हे कोर्स करतात. अनेक नामांकित विद्यापीठामध्ये अशा वेबसाईट्सवरून के लेल्या कोर्सेसना पदवी शिक्षणात क्रेडिटदेखील मिळतात. कोर्स सुरू असतानादेखील मध्येच प्रश्न विचारले जातात, ज्यांची उत्तरे विद्यार्थ्यांला तो कोर्स नीट लक्ष देऊन केल्यासच देता येतील, त्यामुळे कॉपी करून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून हे सर्टिफिकेट मिळवणे सहज शक्य नसते.
‘एड एक्स’ या वेबसाइटवरही असे अनेक ऑनलाइन कोर्सेस करता येतात. इथे विविध कोर्स बरोबरच ऑनलाइन डिग्री घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते. हॉवर्ड, एमआयटी यांसारख्या नामांकित विद्यापीठांसह अनेक विद्यापीठांनी रचना केलेले कोर्सेस आणि पदव्या या वेबसाइटवर घेता येतात. यामधील काही कोर्सेस मोफत असून पदवी तसेच अनेक कोर्सेससाठी पैसे भरावे लागतात. परंतु या दोन्ही वेबसाइटचे वैशिष्टय़ म्हणजे गरजू विद्यार्थ्यांनी फी सवलतीसाठी अर्ज के ल्यास त्यांना हे कोर्स मोफत उपलब्ध होऊ शकतात.
वेगवेगळ्या ऑनलाइन कोर्सेसमुळे सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण अगदी मोफत मिळणेही सहजशक्य झाले आहे. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून व्यवसाय तसेच नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करता येतात. या कोर्सच्या विचारपूर्वक केलेल्या आखणीमुळे जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकून राहू शकतील अशा प्रकारची कौशल्ये स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. विविध ऑनलाइन वर्कशॉप घेणाऱ्याही अनेक मान्यताप्राप्त संस्था आहेत. युडेमी, अनअकॅडमी यासारखे अॅप्स विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, समाजशास्त्र अशा सर्वच विषयांतील स्किल्स वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. केवळ डिग्री नोकरीसाठी पुरेशी नसलेल्या आजच्या काळात आपले ज्ञान वाढवण्यासाठी, आपला ‘बायोडाटा’ अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी अशा कोर्सेची मदत अनेक विद्यार्थी घेताना दिसतायेत.
हे कोर्स — वर्कशॉप करताना विद्यार्थ्यांनी ते मान्यताप्राप्त संस्थेकडून घेतले जात आहेत याची खात्री करून घ्यायला हवी. नेहमीची पदवी आणि या ऑनलाइन कोर्सेसमधला महत्त्वाचा फरक म्हणजे असे कोर्स हे पूर्णपणे स्वयंअध्ययनावर अवलंबून असतात. त्यामुळे हे कोर्स वेळेवर पूर्ण करून अभ्यास करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. नोकरीसाठी अर्ज केल्यावर केवळ सर्टिफिकेटच्या कागदाला किंमत नसून आपल्याला त्यातले प्रत्यक्ष ज्ञान किती आहे यावर आपली पारख होत असल्याने असे ऑनलाइन कोर्स मन लावून केल्यास ते नक्कीच आपल्या करिअरला महत्त्वाची दिशा देणारे ठरू शकतील!
viva@expressindia.com