|| प्रियांका वाघुले
‘कन्यादान’ मालिकेतून आपल्यासमोर आलेला अभिनेता तेजस डोंगरे हा त्याने साकारलेल्या टवाळ आणि खोडकर पात्रामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. फिटनेससाठी जिम हे कलाकारांसाठी आवश्यकच असले तरी केवळ जिमिंगवर भर न देता स्विमिंगलाही महत्त्व देत असल्याचे तेजसने सांगितले. स्विमिंग ही त्याची आवड आहे, त्यामुळे फिटनेससाठी स्विमिंग करणे त्याला आवडते.
नियमित व्यायाम हा महत्त्वाचा आहेत. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकप्रकारचे बळ मिळते, सामथ्र्य येते, असं तेजस सांगतो. म्हणूनच व्यायामाचा नेम कधी चुकवायचा नाही, हे तो स्वत: पाळतो आणि इतरांनाही सांगतो. फिट राहण्यासाठी प्रयत्न करत असताना नित्यनियमाने व्यायाम करून शरीराला आवश्यक तितका वेळ देत आपल्या शरीराला अणि मनाला खूश ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचे तेजस म्हणतो.
तुमची देहयष्टी सुदृढ, आकर्षक होत असताना त्याच्या बरोबरीने चेहऱ्यावर येणारे तेज अणि प्रसन्न मन हेसुद्धा कलाकारासाठी तितकेच महत्त्वाचे असते, असे तो मानतो. शरीराच्या कोणत्याही भागासाठी व्यायाम करत असताना शेवटच्या सेटला आपली मन:स्थिती काय असते यावरून आपण फिटनेस योग्य पद्धतीने साधला आहे की नाही हे लक्षात येते, असं तो सांगतो.
स्विमिंगची त्याला लहानपणापासूनच आवड असल्याने आता त्याचा फायदा होत असल्याचे तो सांगतो. स्विमिंगबरोबरच नियमित व्यायाम करत असताना कार्डिओ करण्यावर तो भर देतो. याशिवाय, लेग आणि शोल्डर रिपिटसाठी एकेक दिवसातील ठरावीक वेळ देत असल्याचे त्याने सांगितले. स्विमिंगमुळेही आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असं तो सांगतो. जिमिंगपेक्षाही स्विमिंग हा त्याचा फिटनेसचा आवडता प्रकार असल्याने तो वेळ मिळेल तेव्हा स्विमिंग करतोच, असे तो सांगतो.
viva@expressindia.com