नवरात्र, दसरा, दिवाळी ही सगळी आपली सेलिब्रेशनची निमित्तं आणि ती आपण नवनवीन पद्धतींनी साजरी करत असतो. दसरा हा सीमोल्लंघनाचा सण तर दिवाळी हे त्याच विजयाचं उत्सवी स्वरूप. सणावाराला नातेवाईकांकडे जाणं-येणं, भेटीगाठी या गोष्टी नेहमीच्या ठरलेल्याच. थोडक्यात काय तर माणसांना सोबत घेऊन साजरे करायचे हे सगळे सण. याच निमित्ताने प्रत्यक्ष आयुष्यात सीमोल्लंघन करणाऱ्या आणि काही हटके करू पाहणाऱ्या व्यक्तींशी ओळख करून घेऊन, फक्त सेलिब्रेशनमध्येच नाही तर आपल्या ज्ञानातही थोडी भर घालूया. सरधोपट मार्गापासून बाजूला जाऊन वेगळा मार्ग निवडणं यासाठी मनाचा निश्चय आणि हिंमत लागते. या हिमतीची दाद देत त्याच्या मागची प्रेरणा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

जिथे बहुतेक तरुणांची स्वप्नं ही शहरात जाऊन कायमचं तिथेच सेटल होण्याची असतात, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक तरुण आपल्या गावातच पाय रोवून उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ‘अरण्यवाट’ इको-स्टे याचा क्रिएटर आणि मालक असलेला तरुण पर्यावरणप्रेमी मल्हार इंदुलकर. शहरात जाऊनही गावातल्या मातीची ओढ बाळगणाऱ्या मल्हारला लहानपणापासूनच निसर्गाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. सुरुवातीचं शिक्षण सामान्य मार्गाने घेतल्यानंतर मल्हारने ‘स्वराज युनिव्हर्सिटी’ नावाच्या ओपन युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली. त्याच्या आवडत्या क्षेत्राशी संबंधित मात्र प्रोजेक्ट पद्धतीने दोन वर्षांची डिग्री त्याने पूर्ण केली. मल्हार म्हणतो, ‘नवीन इन्व्हेस्टमेंट करून मला काही करायचं नव्हतं. त्यामुळे मी इको-स्टेच्या घरासाठी वासेसुद्धा दुसऱ्यांच्या घराचे सेकंडहँड विकत घेतले. भिंती फक्त या घरात नवीन आहेत. बाकी सर्व फर्निचर जुनं आहे, वासे जुने आहेत, दरवाजे, खिडक्या, कपाटं, लाकडी झोपाळा, अगदी कौलंसुद्धा सेकंडहँड वापरली आहेत. या सगळ्यामुळे इको-स्टेला एक नॅचरल टचसुद्धा मिळाला आणि मला ते मोठ्या प्रमाणावर कमर्शियलाइज करायचं नसल्यामुळे कमीत कमी इन्व्हेस्टमेंटचा माझा उद्देशही साध्य झाला.’ चिपळूणला सर्व बालपण घालवलेल्या मल्हारने केवळ निसर्गाचा सहवास जपत अरण्यवाट इकोस्टे उभं केलं. मोठं रिसॉर्ट करण्याचा किंवा त्यातून प्रचंड लक्जरी मनी निर्माण करण्याचा विचारही न करता, उलट तसं करायचं नाहीच, असं ठरवूनच मल्हारने त्याचा निसर्गप्रेमाचा प्रवास सुरू केला आहे.

इन्फ्लुएन्सर मार्केट फोफावलेलं असताना, त्या टिपिकल स्पर्धेत न उतरता, सातत्याने गेली दहा वर्षं फेसबुकवर कथा, किस्से आणि रिव्ह्यूज अशा माध्यमातून कंटेंट जनरेशन करणारी आणि आता स्वतःच्या टेक्स्टाइल ब्रँडची मालकीण असलेली गौरी ब्रह्मे. प्रोफेशनली जर्मनची प्राध्यापिका असलेली गौरी गेली दहा वर्षं सातत्याने फेसबुकवरून स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करते आहे. वेगवेगळी दुकानं, प्रदर्शनं अशा ठिकाणी भेट देत त्यांचे डिटेल रिव्ह्यू करणं हे ती गेल्या काही वर्षांपासून करते आहे. जेव्हा इन्फ्लुएन्सर हे प्रोफेशन म्हणून विचार करण्याची मानसिकताही तयार झालेली नव्हती, तेव्हापासून गौरीने स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला आहे ज्याचा तिच्यावर विश्वास आहे. अनेक ठिकाणचे रिव्ह्यू करताना आपण वापरतो तसे कपडे आपल्या फॉलोअर्सनाही हवे असतात हे तिला जाणवलं. यातूनच जन्माला आला ‘परिस टच’ हा गौरी आणि तिच्या मैत्रिणीने मिळून सुरू केलेला स्वतःचा क्लोदिंग ब्रँड. ब्रँडच्या कल्पनेबद्दल गौरी म्हणते, ‘मला जे कपडे वापरायला आवडतात ते माझ्या फॉलोअर्सनाही आवडत होते. मग माझ्याच स्टाइलचे कपडे मीच त्यांना उपलब्ध करून दिले तर? या विचारातून हा ब्रँड सुरू झाला. मी आणि माझी पार्टनर दोघीही आपापल्या नोकऱ्याही करतो आणि हा बिझनेसही सांभाळतो. कापड घेण्यापासून, डिझाइन्स करण्यापासून ते प्रत्यक्ष कस्टमरला शिपिंग करण्यापर्यंत सगळं काही आम्ही दोघीच करतो. ती खरी कसरत असते, पण दोघींनाही त्यात मजा येत असल्यामुळे त्याचा त्रास होत नाही. माझ्या वाचकवर्गाचा माझ्यावर मुळातच विश्वास असल्याने मला माझा कस्टमर बेस तयार करायला काहीच कष्ट पडले नाहीत. त्यामुळे मला त्या दहा वर्षांच्या लिखाणाची मदतच झाली.’ अत्यंत कठोर आणि फास्ट स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात उडी मारूनही गौरीला स्पर्धेची भीती न वाटता तिने ते आव्हान म्हणून स्वीकारलं आहे आणि स्वतःच्या आवडीला प्राधान्य दिलं आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी संवाद साधणारा आणि पॉडकास्ट या प्रकारात मराठीत नावारूपाला आलेला, यूट्यूब पॉडकास्टमधून घराघरात पोहोचलेला क्रिएटर म्हणजे ‘अमुक तमुक’ या चॅनेलचा निर्माता-लेखक ओंकार जाधव. भाडिपामध्ये स्क्रिप्ट लिहिण्यापासून सुरुवात करून, ‘केरळा स्टोरी’ सारख्या मूव्हीमध्ये लेखन करून, स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून पॉडकास्ट या जॉनरवर मेहनत घेणारा ओंकार म्हणतो, ‘मी बारावी सायन्सला होतो, पण ते माझ्या डोक्यावरून जायचं. त्यामुळे मी बारावीची परीक्षाच दिली नाही. अर्थात, नापास झालो आणि पुढच्या वर्षी आर्ट्स घेऊन पुन्हा परीक्षा दिली. त्या मधल्या वेळात मी लायब्ररीमध्ये काम केलं, छोटीमोठी लिखाणाची कामं केली, खरं शिक्षण माझं त्या काळात झालं. नंतरसुद्धा मला मीडियाशी संबंधित डिग्री करायची होती, मात्र मी इकॉनॉमिक्समध्ये डिग्री घेतली. त्या काळात मला अधिक जाणवलं की मला लिहिता येतं. त्यानंतर मी भाडिपामध्ये काम करत होतो, बाहेर कामं केली आणि मग वाटलं स्वतःचं काहीतरी सुरू करायला हवं.’ स्वतःचं चॅनेल सुरू करतानाही त्या वेळेस ट्रेण्डिंग असलेल्या कंटेंटपेक्षा ओंकारने पॉडकास्टवर भर दिला. इंग्लिश कंटेंटमध्ये पॉडकास्टची लोकप्रियता त्याने पाहिली आणि मराठीत तसा कंटेंट देण्याची संधी त्याला दिसली. त्या संधीचा योग्य फायदा घेत ओंकारने ‘अमुक तमुक’ सुरू केलं ज्याचे आता ६ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. या ‘आउट ऑफ द बॉक्स’ विचार आणि कृती करणाऱ्या तरुणाईमुळेच दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला नवा अर्थ प्राप्त होतो.