राधिका कुंटे

खरंतर ‘विंटर’ या शब्दाचा पडताळा यायला अजून थोडा अवकाश असला तरी नेहमीची येणाऱ्या नोव्हेंबर आणि ‘विंटर’ अर्थात थंडीची सांगड हे समीकरण फिट्ट बसलं आहे. ते एवढं फिट्ट आहे की थंडीची थोडीशी चाहूल लागली तरी ते पुरेसं आहे. आता ‘हे पुराव्यानिशी शाबित करेन’, असं म्हणायला कुणी पु.लं.चे हरितात्या नाही किंवा एखादा आज्ञाधारक सखाराम गटणेही नाही. मात्र आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींचं थोडं निरीक्षण केलं आणि त्या काय म्हणतात हे कान देऊन ऐकलं तरी हे अगदी सहजगत्या कळेल..

परवा पार्कात गेले असताना एका आजोबांचा संवाद कानी पडला की, ‘सुरू झाली हो विंटर वारी’. पन्नास पावलं पुढे गेल्यावर एक काका दुसऱ्यांना सांगत होते की, ‘झाली थंडीतल्या गर्दीला सुरुवात झाली. थंडीची चाहूल लागली’. आणखी शंभरेक पावलं चालल्यावर आला तरुणाईचा टापू. तिथे बोलणं कमी मोबाइलवर बोटं चालवणंच सुरू होतं. तरीही सकाळच्या पारी ऑनलाइन नसण्याचं पातक करणाऱ्या एखाद्या कुंभकर्णाला थेट फोनवरून झापणं सुरू होतं की, ‘अरे आहेस कुठे? आमच्या दोन राऊंड संपत आल्या..’ पुढच्या गाळलेल्या जागा प्रत्येकाने आपापल्या आकलनानुसार भरून घ्याव्यात. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की थंडीची चाहूल लागली असून त्या काळात थोडंसं तरी फिटनेसकडे लक्ष देऊ, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढताना दिसू लागली आहे.

खरंतर आजकाल लोक आपापल्या फिटनेसची काळजी घेतात. दीक्षित-दिवेकर किंवा आपापल्या पद्धतीचं डाएट करतात. जिम किंवा अन्य माध्यमांच्या सहाय्यानं व्यायाम करतात. पण या सगळ्याला पुरून उरेल किंवा त्यातून वजा करता येईल अशी एक ‘विंटर वारी’ करणारी जमात असतेच. म्हणजे काहींना पाऊ स-चिखलाचं वावडं असतं तर कुणाला उन्हाळा आणि घामाचा तिटकारा असतो. ही दोन्ही कारणं थंडीच्या मोसमात अर्थात ती नीट पडली आणि ऋतुमानानुसार असली तर बाजूला पडतात. म्हणून मग यांना ‘विंटर वारी’ करायला आवडत असावं. त्यातही थंडीचा माहोल क्रिएट करणं हे आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात काहीच नवलाईचं राहिलेलं नाही. मग ती खाशी विंटर कलेक्शन्स असोत, रेस्तॉरॉच्या मेन्यूमध्ये थंडी स्पेशल अ‍ॅड होणारे पदार्थ असोत किंवा त्यानिमित्ताने होणारी भटकंती असो. प्रसंगी अगदी चित्रपट महोत्सव किंवा संगीत महोत्सव किंवा मॅरेथॉन असो.. अशा अनेक अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचं तर फिट तो रहना पडेगा बॉस. नाही नाही. ही कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी नाही. हा फं डा एकदम थेट आणि क्लिअर आहे.. ते म्हणजे ‘चालणं’.

तर थंडीची चाहूल लागली आहे आणि तसा माहोलही निर्माण झाला आहे, त्यामुळे ही ‘मी थंडीकर’ असं म्हणवणारी मंडळी चालायला बाहेर पडू लागली आहेत. म्हणजे बघा की आपल्या जवळच्या पार्कात, बागेतल्या वॉकिंग ट्रॅकवर, समुद्रकिनारी, नदी किंवा तळ्याकाठी रोजच्या फिरणाऱ्या-चालणाऱ्यांखेरीज गर्दी दिसली तर खुशाल समजून जा की हीच ती ‘थंडीकर मंडळी’ आहेत. बरं त्यांचं चालणं किंवा फिरणं हा काही नवीन फंडा नाही. तसा तो जुनाच! म्हणजे पूर्वीही अनेकजण चालायला जायचे. अगदी हाताला येईल तो ड्रेस घालून. बऱ्याचदा हे चालणं फक्त सकाळचं असायचं, पण सध्याची व्यग्र जीवनशैली बघता जो तो आपल्याला वेळ मिळेल तसा चालायला – फिरायला लागला आहे. म्हणजे सकाळी वेळ मिळाला तर सोने पे सुहागा! पण नाहीच जमलं ते तर भर दुपारी, संध्याकाळी आणि रात्रीही चालायला जाणारे लोक आहेत. फरक इतकाच की ते ‘चालणं’ या साध्याशा वाटणाऱ्या शब्दापेक्षा ‘वॉक’ असा शब्दप्रयोग करतात.

आता ‘वॉक ’ असा शब्दप्रयोग केला की तिथे गबाळ्याचं ध्यान काय कामाचं? मग ओघानंच त्या थाटाला साजेसा ड्रेसकोड आणि अ‍ॅक्सेसरीज हव्यात. त्यात पुन्हा ब्रँडेड आणि साधे हेही विभाजन आलंच. ऑनलाइन – ऑफलाइन मार्केटिंगचा भूलभुलैया आलाच. चालणं, अंतर, कॅ लरीज आदींची मोजदाद करणारी उपकरणं आली. हेडफोन आले. चालण्याचं ठिकाण लांब असेल तर तिथपर्यंत पोहचण्याचं साधन – विशेषत: सायकल, स्कुटी, बाइक यांची निवडही आलीच. एवढा जामानिमा करून लोक तिथे पोहचणार तर ते घरी परतायच्या आधी त्यांच्या पेटपूजेची डाएटसह काळजी घेणारे कारलं – जांभूळ रसवाले, फ्रुट डिशवाले, चहा – नाश्तावाले आलेच. घरी जाताजाता भाजीपाला घ्यावा, गजरे – फुले घ्यावीत; असं वाटलं तर तीही सोय असते.

बरं, आता या लोकांच्या चालण्याच्या तऱ्हा तरी काय आणि किती सांगाव्यात. कुणी कायम एकटंच फिरतं. कुणी नेहमी दुकटं असतं. एखादी तिक्कल तर कधी चौकडीच दिसते. कधी एखादा मोठा ग्रुप अख्खा रस्ता अडवून ठेवतो. कधी कुणाच्या बिझनेसच्या गप्पा चालू असतात तर कुणाचं गॉसिपिंगशिवाय पान हलत नाही. कधी फक्त ‘हाय, हॅलो..’ केलं जातं. कधी फक्त हात हलवला जातो. कुणी जेमतेम आढेवेढे घेत हसतं तर कुणी एकदम दिलखुलास भासतं. कुणी वॉकला येऊ न गप्पा छाटत बसतात. तर कुणी फक्त वॉकच करणारे असतात. काहीजण फक्त काहीतरी एखाद्या उद्देशाने येतात तर कुणी निरुद्देश भटकत राहिलेले दिसतात. प्रत्येकाच्या चालण्याची तऱ्हा तर निरनिराळी.. म्हणजे वेगवान, धीमे, धाव-चाल-धाव-चाल वगैरे. तरातरा, डोकं हलवत, मान तिरकी करत, डोळे वटारून, फक्त समोरच बघत, भराभरा हात हलवत, तरातरा चालत अशा अनेक देहबोलींचे नमुने या काळात बघायला मिळू शकतात. त्यात चालताना समाजमाध्यमांवर अ‍ॅक्टिव्ह असणारे महाभाग आपल्या भोवतालच्या या नजाऱ्याला मुकतात; कारण ते त्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत अखंड बुडालेले असतात. हेडफोन लावणाऱ्या कानसेनांना नावं ठेवू नये; पण मग पक्ष्यांची किलबिल किंवा वास्तवातल्या आवाजी दुनियेतल्या प्रसंगी ‘लई भारी’ ठरणारे संवाद कानांवर पडण्याला ते पारखे होतात. बाकी शारीरिकदृष्टय़ा चालण्याचे फायदे तुम्ही ‘गूगलून’ काढू शकताच. ते वेगळं सांगायला नको. तर तुमची ‘फिटनेस फेरी’ नेहमीची असेल तर प्रश्नच नाही, पण नसेल तर मात्र या ‘विंटर वारी’ची ‘चले चलो’ ही न्यारी बात ट्राय करायला हवी.

viva@expressindia.com