नागपूर विभागात येणाऱ्या एकूण ५७ महाविद्यालयांपैकी दुसऱ्या कॅप फेरीनंतर एकाही महाविद्यालयाच्या जागा पूर्ण भरलेल्या नाहीत. पदवी अभियांत्रिकीच्या नागपूर विभागातील एकूण २६ हजार २०० जागांपैकी १२ हजार ६१७ जागा रिक्त असून तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे भरण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमार्फत (कॅप) भरण्यात येणाऱ्या जागेचीही तीच पत असल्याचे कॅपच्या दुसऱ्या फेरीनंतरही दिसून येते.
नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ५७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यार्थी व पालकांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांपाठोपाठ अनुदानित, नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे वेध असतो. विदर्भातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूरला आहे. मात्र, ते नागपूर विद्यापीठाशी संलग्नित राहिलेले नाही. या महाविद्यालयाकडे नागपूर विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा असतो. मात्र, तेथील एकूण ३५७ जागांपैकी ३२२ जागा कॅपच्या दुसऱ्याफेरीनंतर भरल्या आहेत. एलआयटीत अभियांत्रिकीच्या १४१ जागा आहेत. त्यापैकी १२६ भरल्या गेल्या, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २६० पैकी २२० जागा भरल्या गेल्या. इतर महाविद्यालयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. उलट काही ठिकाणी असलेल्या प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के जागाही भरू शकलेल्या नाहीत.
नागपूर विभागातील २६ हजार २०० जागांपैकी २१ हजार ८०५ जागा उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कॅपद्वारे भरायच्या आहेत. नागपूर विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅपच्या दुसऱ्या फेरीनंतर ९ हजार १८८ जागांवर प्रवेश झाले आहेत तर १२ हजार ६१७ जागा रिक्त आहेत. अल्पसंख्याक संस्थांमध्ये १०० टक्के जागा महाविद्यालय पातळीवर भरणे शक्य असले तरी तेवढय़ा जागांवर प्रवेश होत नसल्याने अशी अल्पसंख्याक महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे जागा ‘सरेंडर’ करतात. त्या जागा भरण्याची जबाबदारीही सहसंचालक कार्यालय पार पाडते.
अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्यामागे काही गुणात्मक बदल असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी प्रवेशाची अट गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कठीण करण्यात आली. मागासवर्गीयांसाठी ४५ टक्के तर खुल्या प्रवर्गासाठी किमान ५० टक्के प्रवेशाची अट ठेवण्यात आली आहे. गेल्यावर्षी अनुक्रमे ४० व ४५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांलाही प्रवेश देण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांना एनआयआयटी किंवा आयआयटीमध्ये प्रवेश मिळाले, त्यांनी येथील अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केले. त्याही कारणास्तव जागा रिक्त राहण्यास हातभार लागला.
तिसरी कॅप फेरी उद्या, मंगळवारपासून सुरू होत असून त्यानंतर समुपदेशन फेरी होणार आहे.
नागपूर विभागात अभियांत्रिकीच्या जागा    – २६,२००
आतापर्यंतच्या रिक्त जागा    – १७,०१२
कॅपद्वारे भरायच्या जागा    – २१,८०५
कॅपच्या दुसऱ्या फेरीनंतर रिक्त जागा    -१२,६१७
कॅपचे आतापर्यंतचे एकूण प्रवेश    – ९,१८८