लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचा १४ कलमी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी विधानसभा निवडणुकीसाठीहीहाच १४ कलमी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी रोजच्या कारवाईचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात येत आहे. गणेशोत्सवातून उसंत मिळते न मिळते तोच नवरात्रौत्सव, बकरी ईद आणि त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. युती आणि आघाडी तुटल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गणिते बदलली आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कुठेही क्षुल्लक गोष्टींमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दल सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवापासूनचा हा सलगचा बंदोबस्त निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अशी आहे योजना..
याबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी कडक कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बैठक घेऊन दिल्या आहेत. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करून बंदोबस्त आखण्यात येत आहे. याची सुरुवात गणेशोत्सवानंतर लगेचच करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेणार आहे. फरार आरोपींना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तसेच घातपाताची शक्यता लक्षात घेऊन बेकायदा शस्त्र विकणाऱ्यांवर खास लक्ष ठेवण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत.
गुंड टोळ्यांना अटक करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली असून लॉजेसवर छापे घालून तपासणी सुरू करण्यात आली आहे. गस्ती पथकेही वाढविण्यात आलेली आहेत. लॉजमध्ये अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे. शस्त्रे जमा करण्याचे आदेशही परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींना देण्यात आले आहेत. मद्य आणि पैशांचा गैरवापर निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर होतो. तो रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हवालामार्फत हा पैसा शहरात आणला जातो. त्यासाठी खास भरारी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. बेकायदा मद्य बनविणारे सर्व अड्डे उद्ध्वस्त करण्यात येत असून दारू वाहतुकीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन्स’ करण्यात येत आहेत. अमली पदार्थ विरोधी कारवाया गेल्या काही महिन्यांपासून तीव्र करण्यात आल्या होत्या. अशा उपाययोजनांमुळे अनुचित घटनांना आळा बसू शकतो, असा विश्वास डॉ. धनंजय कुलकर्णी यानी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
निवडणुकीसाठी मुंबईत ‘१४ कलमी’ बंदोबस्त
लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचा १४ कलमी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी विधानसभा निवडणुकीसाठीहीहाच १४ कलमी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 27-09-2014 at 12:57 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 point security programme for the assembly elections in mumbai