औरंगाबादहून जळगावकडे जाणाऱ्या सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या मोठय़ा मालमोटारीच्या समोरच्या भागाला निल्लोड फाटय़ाजवळ बुधवारी सकाळी अचानक आग लागली. या प्रकारानंतर अग्निशामक दलाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आग विझविण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या टाकीला आग लागली असती तर तीन किलोमीटपर्यंतचा परिसर जळून खाक झाला असता, असे अग्निशामक दलाचे अधिकारी सांगतात.
आग लागल्याची माहिती काही मिनिटांतच ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळविण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला बोलावण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. चालकाच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने मालमोटारीजवळून पळ काढला. गावकऱ्यांनी आग विझविण्यास मदत करावी, अशी विनंती त्याने केली. काही वेळ मातीने विझविण्याचा प्रयत्न झाला. नंतर अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. घटनेची माहिती कळताच दोन किलोमीटरचा परिसर लगेच निर्मनुष्य करण्यात आला. त्यासाठी ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मालमोटारीला आग लागल्याने वाहतूकही खोळंबली. मालमोटारीत ३२ टन सल्फ्युरिक अ‍ॅसिड होते. खत निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणात या अ‍ॅसिडचा वापर केला जातो. टाकीला आग लागली असती तर ती विझविण्यासाठी वेगळी अग्निशामक यंत्रणा वापरावी लागली असती. सुदैवाने पाण्याच्या फवाऱ्याने आग आटोक्यात आल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.