अमरावती महापालिकेने शहर बससेवेत खास महिलांसाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशंसा मिळवली खरी. पण, गेल्या चार वर्षांत केवळ पाच नव्या गाडय़ा सुरू होऊ शकल्या. शहरातील प्रत्येक मार्गावरून शहर बससेवा सुरू करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.
अमरावती महापालिकेने शहर बससेवा खाजगी वाहतूकदार कंपनीकडे सोपवली आहे. अंबा मालवाहतूक संघासोबत महापालिकेने करार केला आहे. सध्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून मंजुरी मिळालेल्या ३३ बसगाडय़ा शहर बससेवेसाठी उपलब्ध आहेत. शहरात १८ विविध भागात मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पण, अपुऱ्या सोयींमुळे शहर बससेवा सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. शहराचा विस्तार झपाटय़ाने होत असताना महापालिकेची ‘आमची परिवहन’ ही सर्वाची होऊ शकलेली नाही. सर्वाधिक शहर बसेस बडनेरा ते अमरावती बसस्थानक या मार्गावरून धावतात. पण, बसस्थानकाजवळ या बससेवेसाठी अजूनही निवारा बांधण्यात आलेला नाही. ज्या ठिकाणी एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत प्रवासी निवारे उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बसेस थांबत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. बसस्थानक ते बडनेरा मार्गावर २६ ठिकाणी थांबे आहेत. पण, अनेक थांब्यांवर बसगाडय़ा थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
काही वर्षांपूर्वी शहर बससेवेसाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेले प्रवासी निवारे मोडकळीस निघाले आहेत. जुने प्रवासी निवारे तोडून टाकण्यात आल्याने तो खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. आता नव्याने निवारे बांधण्याच्या हालचाली देखील नाहीत. चार वर्षांपूर्वी शहरात २८ बसेस धावत होत्या. दररोजचा प्रवास ३ हजार ९६३ किलोमीटरचा होता आणि १.१० रुपये प्रती किलोमीटर या दराने महापालिकेला महसूल मिळत होता. आता बसगाडय़ांची संख्या ३३ झाली आहे. हाच तो फरक आहे. महापालिकेला सुमारे २५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या बससेवेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. शहर बससेवेसाठी जी वाहने उपलब्ध आहेत त्यांची आसन क्षमता केवळ ३० ते ३५ आहे. एक मोठी अडचण मानली जात आहे. मुख्य मार्गावरून देखील याच बसेस आहेत. गर्दीच्या वेळी प्रवाशांनी खच्चून भरल्या जाणाऱ्या बसगाडय़ांचे दृश्य नित्याचे बनले आहे. अनेक वेळा कारवाई होऊनही हे प्रकार थांबलेले नाहीत. बससेवेचा वापर वाढावा, अशी इच्छाशक्तीच दिसत नसल्याने आहे त्या स्थितीत ही बससेवा चालवण्याचा महापालिका प्रशासनाचा कल दिसून येत आहे. महिलांसाठी स्वतंत्र बसेस ही कल्पकता सोडली तर, गेल्या अनेक वर्षांत बससेवेत काहीच सुधारणा झालेली नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या स्वतंत्र बसगाडय़ांसाठी देखील भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी प्रस्ताव मांडला होता.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
अमरावती शहर बससेवेला कमी फेऱ्यांचे ग्रहण
अमरावती महापालिकेने शहर बससेवेत खास महिलांसाठी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशंसा मिळवली खरी.

First published on: 24-07-2013 at 09:46 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati suffers with low rate bus rounds