मुळा डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी धरणातून पाणी सोडले जाईल, अशी ग्वाही देवळाली पाटबंधार उपविभागाचे उपअभियंता मुकुंद शेकटकर यांनी दिली. त्यावर पाणी सुटले नाहीतर उद्या सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिला.
डाव्या कालव्यातून पाणी सोडावे आणि मुसळवाडी तलाव पूर्णक्षमतेने भरावा या मागणीसाठी पाटबंधारे खात्याच्या देवळाली प्रवरा येथील कार्यालयावर संतप्त शेतकऱ्यांनी आज दंडुके मोर्चा नेला. सुमारे पाच तास मोर्चेकऱ्यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. तनपुरे म्हणाले, शेती सिंचनासाठी यापूर्वी सोडलेल्या आवर्तनातून वाचवलेले पाणी आम्ही मागत आहोत. हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागले हे दुर्दैव आहे. यापूर्वी सहज मिळत होते. त्यामुळे तालुक्याला संघर्ष करावा लागत नव्हता. आता तरुण पिढीने संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. डावा कालव्याला आवर्तन देणार असा शब्द पाटबंधारे व महसूल खात्याने दिला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले, तर सर्वोच्च न्यालयाच्या आदेशानंतर पाणी बंद झाले. आता डाव्या कालव्याचे हक्काचे पाणी सोडले पाहिजे. मुसळवाडी तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे तळाचे पिवळसर पाणी पिण्यासाठी येत आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा. हा भंडारदरा धरणाचा टेलटँक असल्याने या तलावासाठी भंडारदराच्या पाण्यावरील हक्क सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी तनपुरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, रस्त्यावर उतरून जेलमध्ये जाण्यास घाबरत नाही. राहुरी तालुक्यातील ३२ गावांना कोणी वाली नाही, असा अपप्रचार केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन जायकवाडीला सोडलेले पाणी बंद केले. श्रेय घेण्याचे राजकारण करीत नाही. डावा कालव्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पाणी सोडणे गरजेचे आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, सुरेश करपे, बाळासाहेब जाधव, गणपत डावखर, ताराचंद तनपुरे, बाळासाहेब गाडे, ज्ञानदेव पवार, कैलास तनपुरे, सचिन भिंगारदे, शिवाजी डौले, श्रीराम गाडे आदींसह मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.