आघाडी आणि महायुती संपुष्टात आल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनासह अनेक अपक्ष उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौक ते तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या, शनिवारी शेवटचा दिवस असल्यामुळे आज भाजपसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर, सुधाकरराव देशमुख यांनी पश्चिम, विकास कुंभारे यांनी मध्य, उत्तर नागपुरातून डॉ. मिलिंद माने आणि पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे यांनी शक्तिप्रदर्शन करीत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, खासदार अजय संचेती आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे आणि सुधाकर देशमुख यांनी अर्ज भरल्यानंतर संविधान चौकात एकत्र जमा झाले आणि तेथून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घोषणांनी संविधान चौक दुमदुमन गेला. कामठीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीमधील तहसील कार्यालयात ढोल ताशांच्या निनादात तर मनसेचे रमेश पुरुषोत्तम गडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
बहुजन समाज पक्षाकडून उत्तर नागपुरातून माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये आणि दक्षिण नागपूरमधून सत्यभामा लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. गजभिये आणि लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शक्तिप्रदर्शन केले. बसपचे अन्य उमेदवार उद्या, शनिवारी अर्ज दाखल करणार आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत पवार यांनी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. पक्षाचे चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनची प्रतिमा तयार केलेल्या वाहनावर अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात आले. यावेळी मोठय़ा संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय वेलफेअर ऑफ इंडियाकडून तल्लन मेहता यांनी पश्चिम नागपूर, भारती अरविंद मेश्राम यांनी दक्षिण पश्चिम या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले. काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी काटोल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघाचे आतापर्यंत तीनवेळा प्रतिनिधित्व केले असून यावेळी चौथ्यांदा ते निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून प्रमोद चाफले, राहुल वीरेंद्र देशमुख यांनी पिझन्टस अ‍ॅन्ड वर्कस पार्टी ऑफ इंडिया कडून अर्ज दाखल केले. हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग, चमदेव तुकाराम आत्राम गोंडवाणा गणतंत्र पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमरेड मतदारसंघातून संध्या जगदीश गजभिये, प्रशांत वासुदेव ढाकणे यांनी अर्ज दाखल केले.