यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यावी, उमेदवारीबाबतचे निकष कोणते इत्यादी बाबी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचे मनोगत जाणून घेतल्यानंतरच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची व मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकेल, अशी माहिती काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष  आमदार माणिकराव ठाकरे यांनी दिली.
त्यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याच्या वृत्ताबाबत ठाकरे म्हणाले की, निवडणूक असली म्हणजे अनेक कार्यकर्त्यांची नावे चच्रेत असतात त्यापकी राहुलचे नाव चच्रेत असू शकते, मात्र कोणाच्याही उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या पोटनिवडणुकीमुळे राज्य सरकारच्या स्थर्याचा प्रश्नही उद्भवत नाही. निवडून येणाऱ्या उमेदवाराला वर्ष-सव्वावर्षांचा कार्यकाळ मिळणार असला तरी २०१४ ची निवडणूक लक्षात घेता काँॅग्रेस ही निवडणूक गांभीर्यानेच लढणार आहे.
काँॅग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांचे २७ जानेवारी २०१३ ला झालेल्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे पारवेकर घरण्यातील व्यक्तीला उमेदवारीबाबत प्राधान्य मिळावे, याबाबत सुरू असलेली चर्चा स्वाभाविक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मान्य केले. लवकरच  पक्षश्रेष्ठींचे मनोगत समजल्यावर उमेदवारींबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही ठाकरे म्हणाले.

उमेदवारी लवकर द्या !
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी कुणालाही द्या, पण त्या उमेदवारांचे नाव लवकर जाहीर करा म्हणजे कार्यकर्त्यांना प्रचार कार्य करण्यास धडाक्याने कार्य करता येईल, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याजवळ धरला. ठाकरे यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडाच पडला होता. त्या सर्वाचे म्हणणे ठाकरे यांनी अत्यंत शांततेने किंवा संयमाने ऐकून घेतले. धीर धरा, वेळ येताच सर्व सुरळीत होईल आणि जोमाने कामाला लागा, असा  पोक्त सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना देऊन त्यांचे समाधान केले. संध्या सव्वालाखे, बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब मांगुळकर या दिग्गज नेत्यांसह विदर्भातील अनेक भागातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याशी दोन तास चर्चा केली. लवकरच एक वक्ता प्रशिक्षण मेळावा यवतमाळात घेण्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.