सोनसाखळी चोरटय़ांचेही खबरी असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.  सोनसाखळी चोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबई, पुणे, ठाणे येथे पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.  नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मुंब्रा व कल्याण येथील आंबिवली भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. सात सोनसाखळी चोर सध्या कोठडीची हवा खात आहेत. या गुन्ह्य़ात इराणी मुस्लीम तरुणांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे आढळून आले आहे. एक-दोन तोळे सोनेदेखील पाच पन्नास हजार रुपये सहज देऊन जात असल्याने गुन्हेगारांनी या गुन्ह्य़ाकडे जास्त लक्ष दिले आहे. त्यात सणासुदीला व लग्नसराईच्या काळात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
मुंब्रा, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, कल्याण (आंबिवली) या भागांतील सोनसाखळी चोरटय़ांच्या सेवेत सध्या खबरीलाल असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सोनसाखळी चोरी करण्यासारखी ठिकाणे, नेहमी मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या महिला, मॉल्स, लग्नांचे हॉल, लग्न श्रीमंताचे की गरिबाचे त्यांचा ऐटबाज, या सर्वाची मोबाइलवर माहिती देणारे खबरी आता तयार झाले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या खबऱ्यांना लुटीतून मिळणाऱ्या पैशातील पाच ते सात टक्के रक्कम दिली जात आहे. मोबाइलवरून आखों देखा हाल सांगितल्यानंतर हे सोनसाखळी चोर हातसफाई करून जात असल्याचे दिसून येते. पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी या खबरीलालच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. तपासात अद्याप अशी बाब उघड झाली नसल्याचे ते म्हणाले.  
नागरिकांनी दक्ष राहावे यासाठी पोलीस पत्रक, फलक, जाहिरात यांनी प्रबोधन करीत आहेत, पण सोने घालून रस्त्याने जाणाऱ्या महिला मात्र याबाबत अधिक सतर्कता बाळगताना दिसून येत नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान सोन्याने मढलेल्या एका आगरी महिलेला प्रचारात इतके सोने घालून कशाला येता, असे एका उमेदवाराने सांगितले. त्यावर सोने आम्ही नाही घालायचे तर कोणी, असे उत्तर देणाऱ्या त्या महिलेला नंतर ऐरोली सेक्टर तीनमध्ये लुटण्यात आले.